
संदीप गायकवाड
Solapur, 28 April : जे लोक बाहेरच्या पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झाले आहेत, ते पक्षाचा हिताचा काय निर्णय करणार? सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमच्यामुळे विजय झाला आहे, असं त्यांना वाटत असेल. पण ते तसं नाही, असा टोला माजी पालकमंत्री तथा भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी लगावला आहे. देशमुख यांनी हा टोला नेमका कोणाला लगावला आहे, याची चर्चा मात्र सोलापूरच्या राजकारणात होताना दिसून येत आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Solapur Bazar Samiti) निवडणुकीत आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने १३ जागा जिंकून बाजार समितीवर वर्चस्व मिळविले आहे. विरोधातील सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख यांच्या पॅनेलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. या पॅनेलचे नेतृत्व सचिन कल्याणशेट्टी यांनी केले आहे, त्यामुळे विजयकुमार देशमुख यांचा रोख त्यांच्यावर तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे.
सचिन कल्याणशेट्टी यांचे वडील पंचप्पा कल्याणशेट्टी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसचे सिद्धाराम म्हेत्रे यांचे विधानसभा निवडणुकीत त्यांनी काम केले होते. तसेच कल्याणशेट्टीही त्यावेळी म्हेत्रे यांच्या प्रचारात होते. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने ते भाजपत परतले. याशिवाय, सचिन कल्याणशेट्टी यांच्या पहिल्या विजयात लाखमोलाची कामगिरी बजावल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विजयकुमार देशमुखांचा (Vijaykumar Deshmukh) रोख कल्याणशेट्टींवर तर नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
देशमुख म्हणाले, ग्रामपंचायत मतदारसंघात मिळालेले यश हे अपेक्षितच होते. कारण, शेतकऱ्यांचा पाठिंबा आमच्या मागे आहे. सोसायटी मतदारसंघात वर्षांनुवर्ष काही नेत्यांच्या स्वतःच्या कुटुंबातीलच सदस्य हे संचालक आहेत, यामुळे तेथील निकाल असाच लागणार होता. विरोधी पक्षातील निवडून आलेले संचालक एकत्र राहावेत आणि त्यांनी बाजार समितीत चांगले काम करावे, अशी अपेक्षा आहे, मात्र त्यांची प्रवृत्ती पाहता, तसे होणे शक्य नाही.
कल्याणशेट्टींसोबत जाण्याबाबत आज तरी निर्णय नाही : मनीष देशमुख
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक मनीष देशमुख विजयानंतर म्हणाले, आतापर्यंत मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. निवडणुकीत पउद्यामागची बाजू सांभाळत आलो आहे, पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलो होतो. बाजार समितीच्या निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे आत्मविश्वास वाढला आहे. सोसायटी मतदारसंघात अपेक्षित यश मिळाले नाही. बाजार समितीच्या राजकारणाची पुढील दिशा नेतेमंडळी ठरवतील. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत जाण्याबाबत आज तरी कुठला निर्णय नाही, त्याबाबतचा निर्णय सुभाषबापू घेतील.
ही भविष्य काळातील नांदी : बळीराम साठे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला बिनशर्त पाठिंबा दिला होता. निकालाबाबत ते म्हणाले, ग्रामपंचायत मतदारसंघात पहिल्यांदाच सत्ताधारी पॅनेलच्या विरोधात मतदान झाले आहे. ही भविष्यकाळातील नांदी असून उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत मतदार संघातून आम्ही पाठिंबा दिलेल्या गटाला मतदारांनी पसंती दिली आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.