Cabinet Expansion : सोलापूरमधून मंत्रिपदाची संधी कोणाला...देशमुख, कल्याणशेट्टी की बबनदादा?

Solapur Mahayuti Leader : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होण्याची शक्यता आहे.
Mahayuti  Leader
Mahayuti Leader Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 17 June : पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाराज नेत्यांना खूष करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच, त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुतीच्या कालावधीतही सोलापूरला मंत्रिमंडळात संधी मिळू शकलेली नाही. आता होऊ घातलेल्या विस्तारात तरी सोलापूरला संधी मिळेल आणि ती भाजपकडून मिळणार की मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून याची उत्सुकता आहे.

सोलापूर (Solapur) जिल्ह्यात भाजपचे (BJP) पाच आमदार निवडून आले आहेत, तर बार्शीचे राजेंद्र राऊत हे भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आले आहेत. याशिवाय रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे आमदार आहेत. मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन आमदार असून करमाळ्याचे आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) हे पक्षाचे सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे या दोन पक्षांकडून विस्तारात कुणाला संधी मिळते आणि पालकमंत्रिपद सोलापूरच्या लोकप्रतिनिधीकडे येणार का, हे पाहावे लागले.

भाजपला भरभरून देऊनही महायुती सरकारच्या काळात सोलापूरला मंत्रिपद मिळू शकलेले नाही. वास्तविक, सोलापूरमधून मंत्रिपदासाठी आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या नावाची चर्चा मागील विस्ताराच्या वेळी होती. मात्र, कोणालाही संधी मिळू शकलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याचे बबनराव शिंदे आणि मोहोळचे यशवंत माने पक्षाचे आमदार होते. त्यात बबनराव शिंदे हे सहा वेळा निवडून आलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीने सोलापूर मंत्रिपद दिले तर ज्येष्ठत्वानुसार बबनराव शिंदे यांना संधी मिळू शकते.

लोकसभा निवडणुकीत भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या दोघांच्या मतदारसंघातूनच भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे लोकसभा उमेदवाराला मताधिक्य देण्याचा निकष लावला तर विजयकुमार देशमुख आणि कल्याणशेट्टी हे मंत्रिपदासाठी पात्र ठरू शकतात. मात्र, दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख यांना डावलणे पक्षाला परवडेल असाही प्रश्न आहे. त्यामुळे विस्तारात दोन देशमुखांपैकी एकाला संधी मिळते की नव्या दमाचे म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांना संधी मिळणार, याकडे सोलापूरकरांचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून 36 हजारांचे मताधिक्य राम सातपुते यांना दिले आहे, तर अक्कलकोटचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी 9 हजार 297 मतांचे लीड दिले आहे. आमदार सुभाष देशमुख यांना मात्र सातपुते यांना मताधिक्य देण्यात अपयश आले आहे.

विधानसभा उमेदवारीचा निकषही भाजपने मताधिक्य ठरविला होता. मात्र, अनेक दिग्गजांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार पिछाडीवर आहेत. त्यामुळे हा निकष भाजपने बाजूला ठेवल्याची माहिती आहे. मात्र, मंत्रिपदासाठी मताधिक्याचा निकष लावल्यास सुभाष देशमुख यांची संधी जाऊ शकते. पण भाजप ते धाडस दाखवेल का, हा खरा प्रश्न आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com