

Satara, 09 June : सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत गाठीभेटी आणि गुप्त बैठकांना वेग आला आहे. सर्वाधिक अटीतटीची निवडणूक म्हणून सांगली सातारा मतदारसंघाची सध्या चर्चा आहे. दोन्ही जिल्ह्यातील भाजप आणि महायुतीचे संख्याबळ पाहता भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांचा विजय सोपा मानला जातो. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीत दुखावलेले ‘मित्र’ विधान परिषद निवडणुकीत भाजपचा गेम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, विजयाचे गणित हे सांगलीच्या हाती असून तिथून आघाडी घेणारा उमेदवार बाजी मारण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाने सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत भाजपचे सातारचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना रिंगणात उतवले आहे. त्यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उद्योजक अभयसिंह जगताप यांना तिकिट देऊन पक्षाने मोठा जुगार खेळल्याचे मानले जात आहे. जगताप यांच्यासारखा सर्वार्थाने बलाढ्य उमेदवार देऊन लढतीत रंगत आणली आहे.
या मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष १ असे राजकीय पक्षांचे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे.
धैर्यशील कदम यांच्या विजयासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्या दिवसापासून पुढाकार घेत रणनीती आखली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार उदयनराजे भोसले आणि महायुतीचे आमदार प्रयत्न करत आहेत. मात्र, खरी मेख साताऱ्यामध्येच आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपने ज्या खेळ्या केल्या, त्याची जखम अजून ताजी आहे. ते घाव अजूनही भरून आलेले नाहीत. खुद्द पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेली धक्काबुक्की हे दोन्ही पक्ष अजूनही विसरलेले नाहीत, त्यामुळे दुखावलेल्या ‘मित्रां’ची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. सध्या तरी शांतता असली तरी वादळापूर्वीची ठरू नये, याची काळजी भाजपला घ्यावी लागणार आहे.
महायुती म्हणून पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी धैर्यशील कदमांच्या विजयासाठी पहिल्या दिवसापासून पुढाकार घेतला आहे. दोन्ही जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही वेगवेगळी आहेत, त्यामुळे महायुतीचे नेते कसा समन्वय घडवून आणतात, यावरच विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. कारण भाजप उमेदवाराच्या विजयाचा फैसला हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतांवरच होणार आहे, त्यामुळे या पक्षाच्या सदस्यांना कमालीचे महत्व आले आहे.
सांगली जिल्ह्याची भूमिका निर्णायक
दोन्ही उमेदवार सातारा जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे मते मिळविताना जिल्ह्यात सर्वाधिक चुरस होईल. पण विजयाचे गणित सांगलीवर अवलंबून असणार आहे. सांगली झेडपीत महायुतीपेक्षा महाविकास आघाडी वरचढ आहे. याशिवाय काँग्रेस आमदारांची भूमिका विजयाचे गणित ठरविणारी असणार आहे. सांगलीत माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील असे मातब्बर नेते महाविकास आघाडीकडे आहेत, त्यामुळे सांगलीतून कोण आघाडी घेणार, तोच उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे निश्चित आहे.
भाजपची झेडपी निवडणुकीतील भूमिका ठरतेय कळीची
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढविण्याऐवजी भाजपने ‘एकला चलो’चा नारा दिला होता. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून महायुती म्हणून लढण्याचा प्रस्ताव असतानाही भाजपने स्वबळ अजामवले होते. त्यानंतर अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांमध्ये केलेली फोडाफोडी सर्वाधिक घाव करणारी ठरली आहे. त्यामुळे झेडपी निवडणुकीतील भाजपची भूमिका कळीची ठरण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी आमचीच : महायुती-महाआघाडीचा दावा
अजित पवारांच्या आदेशानुसार दोन्ही जिल्ह्यांत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे लढल्या होत्या. तसेच सातारमध्ये तर त्यांच्यासोबत शिवसेनाही होती, त्यामुळे या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची गेल्या काही महिन्यांत भाजपपेक्षा महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत जवळीकता निर्माण झालेली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते राष्ट्रवादी आमचीच असा दावा करत आहेत. महाविकास आघाडीप्रमाणे भाजपकडून महायुतीचे सदस्य म्हणून राष्ट्रवादी आमचा मित्र असल्याचे सांगत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.