पुणे : राज्यात महाविकास आघाडीसोबत सत्तेत असलो तरी जिल्ह्यात शिवसैनिकांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण केले जात असल्याची तक्रार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात पुण्यात रविवारी केली.विरोध केल्याचा परिणाम भोगतोय अशी थेट कबुली शिवतारे यांनी यावेळी दिली. त्यांचा रोख अजित पवार यांच्याकडे होता.मात्र, एवढं ऐकल्यानंतरही अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्यापलिकडे पर्याय नसल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी त्याच व्यासपीठावरून अप्रत्यक्षपणे बजावल्याने माजी मंत्री शिवतारे यांची मोठी अडचण झाली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राज्य पातळीवर अजित पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याशिवाय सध्यातरी पर्याय नाही. याउलट पुणे जिल्ह्यातील चित्र आहे. मुंबईत मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी जुळवून घ्यायचे आणि जिल्ह्यात शिवसेना आणि शिवतारे यांचे राजकीय खच्चीकरण करायचं अशी दुहेरी निती अजित पवार राबवत आहेत. या नितीचा सर्वात मोठा बळी शिवतारे ठरत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांना कट्टर विरोध असतानाही शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातून दोनदा आमदारकी खेचून आणली.
फडणवीस सरकारच्या काळात शिवतारे राज्यमंत्री झाले. हाती सत्ता आल्याने शिवतारे यांची ताकद वाढली. त्यांनी अजित पवार यांना जिल्ह्यात आव्हान देण्यास सुरवात केली.पवार कुटुंबिय आणि विशेषत: अजित पवार यांच्यावर शिवतारे यांनी सतत चौफेर टीका केली. शिवतारे यांची टीका अजित पवार यांनी चांगलीच मनावर घेतली. लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांनी जाहीर भाषणात शिवतारेंना जाहीर दिले.
पुढच्या वेळी शिवतारे आमदार कसे होतात तेच पाहतो असे अजित पवार यांनी त्यांच्या ‘स्टाईल’मध्ये जाहीरपणे सांगितले. अजित पवार यांनी एकदा ठरवले की ते कुणाचेही ऐकत नाहीत हे साऱ्या राज्याला माहिती आहे, असा इशारा त्यांनी लोकसभा निवडणुकीत सासवडच्या सभेत दिला. लोकसेभेनंतर आठमहिन्यात विधानसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत शिवतारे यांच्याबाबत केलेली गर्जना अजित पवार यांनी खरी करून दाखविली. विधानसभा निवडणुकीत व्हायचं तेच झालं. पवार यांची संपूर्ण ताकद कॉंग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांच्या मागे उभी राहिली आणि शिवतारे यांचा पराभव झाला.
गेल्या दहा-बारा वर्षातील या राजकीय संघर्षाच्या पाश्र्वभूमीवर आता अजित पवार यांच्याशी जुवळून घेण्याचा सल्ला पक्षनेतृत्वच देत असल्याने शिवतारे यांची मोठी अडचण झाली आहे.राज्यात आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना त्याच पक्षाची एखाद्या जिल्ह्यात अशी अवस्था असणे खरंतरं त्या पक्ष संघटनेसाठी अत्यंत वाईट आहे.
शिवतारे यांनी कालच्या मेळाव्यात हेच सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, पक्ष नेतृत्व त्यांची अडचण ऐकूण त्यात मदत करण्यास तयार नसल्याचे खासदार संजय राऊत यांच्या कालच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. उलटपक्षी शिवतारे यांनाच अजित पवार यांच्या जुळवून घेण्याचा सल्ला खासदार राऊत यांनी दिला आहे. जिल्ह्याच्या राजकारणात अजित पवार यांच्याशी जुळवून घेणं म्हणजे ते सांगतील ते ऐकणं हेच करावं लागतं हे शिवतारे जाणून आहेत. शिवतारे यांचा एकुण स्वभाव पाहता त्यांच्या स्वभावला हे मानवणारं नाही.त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात होणाऱ्या राजकीय घुसमटीतून नजिकच्या काळात शिवतारे कार्य मार्ग काढतात हे पाहणं उत्सुकतेचं असेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.