Solapur News : आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. जगताप यांना एकच सांगतो. तुम्ही आता सोलापूरला आला आहात, इथून परत जायचं नाही. आता इथंच काम वाढवायचं. येथील हाताला काम द्यायचे. सोलापूरच्या कष्टकरी जनतेच्या पाठिंब्यावर तुमच्या उद्योगाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योजक जगताप यांना सूचित केले. (You have come to Solapur now, there is no going back: Sharad Pawar's advice to entrepreneurs)
सोलापूर शहराजवळील डोणगाव रस्त्यावर आयटी पार्कचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते आज (ता. १३ ऑगस्ट) झाले. या वेळी ज्येष्ठ उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर, महेश कोठे, मुकुंद जगताप, स्मिता जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व इतर मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले की, उजनी धरणानंतर सोलापूरचे चित्र बदलले. ऊस, डाळिंब, द्राक्ष शेतीत सोलापूरने नाव कमावले. उजनी धरणाच्या पाण्यावर आज सोलापूर जिल्ह्यात उसाचे मळे फुलेले दिसत आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. सोलापूर हे वस्त्रोद्योगात मोठे नाव होते. मी सोलापूर पालकमंत्री होतो, त्यावेळी लक्ष्मी विष्णू, जाम मिल, नरसिंग गिरजी आदी मोठ्या मिल्स हे सोलापूरचं वैशिष्ट्य होतं. पण आज दुर्दैवाने एकही मिल चालू नाही. कापडी कारखान्यांबरोबरच किर्लोस्कर यांचं एक युनीटही सोलापुरात होतं.
जगताप यांनी सोलापुरात एक ग्रुप सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मी जगतापांना एकच सांगतो की, आता सोलापुरातून जायचं नाही. आता इथं काम वाढवायचं आणि इथल्या हाताला काम द्यायचं. तुम्हाला नक्की समाधान मिळेल की सोलापूरच्या कष्टकरी नागरिकाने एक जबाबदारी हाती घेतली तर कोणतेही आढेवेढे न घेता कष्ट करण्यासाठी सोलापूरकर कधी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. तुमच्या उद्योगाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरला तुम्ही साथ द्यावी, सोलापूरकर तुमच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवारांनी सूचविले.
पवार यांनी म्हटले आहे की, आजचा दिवस सोलापूरच्या भवितव्याच्या आणि तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याची संकल्पाना महेश कोठे यांनी मांडली. आर्यन ग्रुपला निमंत्रित केले आणि त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली. आर्यन ग्रुपला विचारत होतो की, तुम्ही हे आयटी पार्कचे काम कधी सुरू करणार आहात, हे आम्हाला सांगा. तेव्हा जगताप यांनी सांगितलं की, एका महिन्याच्या आत कामाला सुरुवात करण्यात येईल आणि वर्षभरात प्रकल्पाला सुरुवात होऊन काही तरुणांच्या हाताला काम मिळेल.
सोलापूरच्या दृष्टीने जगताप यांनी मोठी जबाबदारी घेतली आहे. पुणे विद्येचे माहेरघर होते, सोलापूर हे उद्योगाचे माहेरघर होते. पण मधल्या काळात चित्र बदललं. आज पुणे विद्येचे माहेरघर तर आहेच. पण उद्योग क्षेत्रातही आज पुण्याने मोठे बदल केले आहेत. आयटीच्या क्षेत्रातही देशात आणि जगभरात नाव कमावले आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले की, सोलापूरचा चेहरा औद्योगिक क्षेत्रात बदलायचा असेल तर या ठिकाणी आयटी क्षेत्राचे काम सुरू करण्यात आले आहे. काही वाटेल ते झाले तरी त्यात यश मिळालेच पाहिजे. जगताप, कोठे यांनी मोठे काम हाती घेतली आहे. आता मागे जायचं नाही. ज्या पद्धतीने पुणे, नाशिकचे अर्थकारण बदललं, तीच अवस्था आज सोलापूरला कशी येईल, या काळजी धेतली पाहिजे. महेश कोठे यांनी सतिश मगर आणि अतुल चोरडियांना आमंत्रित केले. बदलत्या औद्योगिकरणाशी सोलापूरचं नातं जोडलं जातंय, याचा आम्हाला आनंद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.