Mumbai News : शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटक केली होती. शिवसेनेत एकनाथ शिंदे गटाने बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावर केलेली ही पहिलीच मोठी कारवाई होती.
या गुन्ह्यात संजय राऊत यांना 9 नोव्हेंबरला जामीन मिळाला आहे. परंतु या प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी गंभीर आरोप केले आहे.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी अतिरिक्त संचालक (पश्चिम क्षेत्र) आणि ईडी यांना पत्र लिहिलं आहे. यात बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव घेण्यासाठी धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप स्वप्ना पाटकर यांनी केल्याची माहिती समोर येत आहे.
पत्राचाळ प्रकरणाच्या तपासादरम्यान दिलेली विधाने बदलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. या प्रकरणात आपल्या जीवाला धोका असल्याचेही, या पत्रात स्वप्ना पाटकर यांनी म्हटले आहे. एका पत्रावर सही न केल्यास बलात्कार करण्याची आणि शरीराचे तुकडे करू, अशी धमकी कॉलवर मिळाल्याचा दावा स्वप्ना पाटकर यांनी केला आहे.
पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात दिलेलं स्टेटमेंट हे देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे दिल्याचं सांगणाऱ्या पत्रावर सही करण्यासाठी ही धमकी दिल्याचा स्वप्ना पाटकर यांचा आरोप आहे. तसंच या प्रकरणातील आरोपी संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांच्या काही जमिनी आणि मालमत्तांच्या टायटल बाबतही माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही स्वप्ना पाटकर यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोप असलेले संजय राऊत जामिनावर बाहेर आल्यानंतर माझ्या बाबतीत अनेक प्रसंग घडल्याचं स्वप्ना पाटकर यांनी पत्रात लिहिलं आहे.
मुंबईतील गोरेगाव येथे सिद्धार्थ नगरमध्ये 672 घरांच्या पुनर्विकासासाठी रहिवाशांनी म्हाडा आणि बिल्डरसोबत करार केला आणि 2008 साली पत्राचाळ पुनर्विकास हा प्रकल्प सुरू झाला. म्हाडा, गुरूआशिष बांधकाम कंपनी आणि रहिवाशांमध्ये या घरांच्या पुनर्विकासासाठी तीन पार्टी करार झाला. 13 एकरपैकी साडेचार एकरवर मूळ रहिवाशांना घरं दिली जातील आणि उर्वरित भागात म्हाडा आणि बिल्डर विक्री करेल असंही ठरलं. पण या जमिनी गुरुआशिष बिल्डर आणि अधिकाऱ्यांनी परस्पर खासगी बिल्डरांना विकल्याचं समोर आले आणि आणि हा प्रकल्प रखडला. 1 हजार 34 कोटी रुपयांची फसवणूक संबंधित बिल्डरने केल्याची तक्रारही दाखल झाली. पत्राचाळ रहिवाशांनी यासंदर्भात म्हाडाकडे तक्रार केली. म्हाडा आणि खेरवाडी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. ईडीकडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. ईडीने 2 फेब्रुवारी 2022 रोजी अटक केलेले प्रवीण राऊत हे गुरुआशिष बांधकाम कंपनीचे माजी संचालक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.