Maratha Reservation: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजानेही आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे दोन्ही समाजातील नेतेमंडळीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून मराठा व ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा,अशी मागणी मागणी केलीय. याला शिवेंद्रराजे यांनी ही पाठिंबा दिला यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी राजेंना सल्ला दिला असून हे राजे आहेत, त्यांच्याकडे आम्ही आदराने बघतो आणि हे स्वराज्य मिळवताना आमच्याही पूर्वजांचे रक्त सांडले असल्याची आठवण करून दिली आहे.
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असून प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राजेंना सल्ला दिला आहे. आमच्याही पूर्वजांचे रक्त सांडले असल्याने त्यामुळे आमचाही अधिकार या स्वराज्यावर तितकाच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही अठरापगड जमातीला सोबत घेतले म्हणून स्वराज्य मिळाले, असेही शेंडगे म्हणाले.
'मराठा समाजाने आंदोलन केंद्राच्या विरोधात करावीत'
येत्या काळात या अठरापगड जातीचे गोरगरीबांच आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही राजेंची ही आहे. त्यामुळे त्यांनी केवळ गादीचे वारस न होता विचारांचे वारस व्हावे, असे मत शेंडगे यांनी व्यक्त केलय. मराठा समाजाने आंदोलन केंद्राच्या विरोधात करावी, हे सगळं आमच्या विरोधात चाललय, असेही यावेळी बोलताना शेंडगे यांनी स्पष्ट केले.