
Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर राज्यातील महायुती सरकारने 'मुख्यमंत्री लाडकी बहीण'योजना आणून महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करायला सुरुवात केली. ही योजना इतकी यशस्वी ठरली की महायुतीच्या 200 हून अधिक जागा निवडून आल्या. बहुमतासह सत्ता मिळवल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि महायुतीच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 देऊ, या आश्वासनाचा मात्र सत्ताधाऱ्यांना विसर पडला.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबत कुठलीच घोषणा करण्यात आली नाही. यावरून महायुती सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र 'सगळी सोंग आणता येतात, पैशाची नाही सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ' असे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आम्ही सांगितले होते, परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही योग्य वेळी घोषणा करू, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार? असा प्रश्न अजित पवारांना माध्यमांकडून वारंवार विचारला जातो. यावर आज पुन्हा एकदा अजित पवारांनी सविस्तर भूमिका मांडत आर्थिक परिस्थिती नसल्यामुळेच 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला नसल्याचे कबूल केले. ज्या कुटुंबातील महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सुरू केली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दीड हजार रुपयांप्रमाणे नऊ हप्ते जमा करण्यात आले.
दरम्यान विरोधकांनी निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार, अशी टीका करायला सुरुवात केली होती. यावर महायुतीने मात्र ही योजना बंद पडू देणार नाही, असे सांगत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करणे सुरूच ठेवले. यावर निवडणुकीआधी जाहीर केल्याप्रमाणे मतदारांनी विशेषत: लाडक्या बहिणींनी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. मग जाहीर केल्याप्रमाणे त्यांना 2100 रुपये कधी देणार? असा प्रश्न विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून वारंवार विचारण्यात आला.
अर्थसंकल्पात 2100 रुपये देण्याची तरतूद केली जाते का? याकडेही सगळ्यांचे लक्ष होते. मात्र 2100 रुपयांप्रमाणे अर्थसंकल्पात तरतूद न करण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड झाला. तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. याशिवाय नियम व अटींकडे बोट दाखवत राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना योजनेतून बाद करण्याचा सपाटा सरकारने लावला. निवडणुकीआधी सरसकट सर्व अर्ज मंजूर केल्यानंतर आता ते बाद कसे करता? असा सवालही विरोधकांकडून केला जात आहे. मात्र अजित पवार यांनी स्पष्टपणे राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यावर लाडक्या बहिणींना 2100 देऊ असे, नवे आश्वासन दिले आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.