
Mumbai, 17 March : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज (ता. 17 मार्च) लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजना गरीब कुटुंबासाठी आहे. कधी कधी योजना येतात. पण, काही गोष्टी लक्षात आल्यानंतर त्या योजनांमध्ये दुरुस्ती केली जाते, त्यानुसार आम्ही लाडकी बहीण योजनेत दुरुस्ती करणार आहे, ही योजना बंद करणार नाही. गरीब महिलांवर आम्ही कुठेही अन्याय करणार नाही. ज्याला गरज आहे, त्यांना आम्ही शंभर टक्के देणारच, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) भाष्य केले. ते म्हणाले, विरोधक लाडकी बहीण योजनेबाबत इतकं बोलत होते की लाडकी बहिण अजूनही त्यांच्या मनात ठाण मांडून बसलेली आहे. अर्थात, लाडकी बहीण आमची आहे, त्यामुळे तुम्ही दोडके झालात आणि तुम्ही तिकडं (विरोधी बाकावर) बसलात.
विरोधी बाकांवरून ‘कठोर उपाय योजना कराव्यात, लोकांना खूश करण्यासाठी आश्वासनं देऊ नका,’ असेही सांगण्यात येत होते. पण, अध्यक्ष महोदय, गांडूळ असतं ना. ते इकडंन चालतं की तिकडंन चालतं तेच कळत नाही. ते दोन्ही बाजूंनी चालतंय असं सगळ्यांना वाटत असतं. तसं काही जण, सन्मानीय सदस्य दोन्ही बाजूंनी बोलतात, असा टोलाही अजित पवारांनी (Ajit Pawar) लगावला.
लाडक्या बहिणीविषयी आम्हाला जो आदर आहे, त्याविषयी आम्हाला जशी जाणीव आहे, तशी लाडक्या बहिणींनाही आहे. आईनंतर भावासाठी सर्वाधिक त्याग करणारी बहीण असते. बापाचंही प्रेम पोरापेक्षा मुलींवर जादा असतं. त्यामुळे बहिणींची भावावर खूप माया असते. भाऊ कठीण परिस्थितीत असेल तर तिला काळजी असते. त्यामुळे ती कधीही आपल्या भावाला अडचणीत आणणारी मागणी करत नाही, असे भावनिक भाष्यही अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केले.
आम्ही बजेटमध्ये सांगितलं आहे...तेवढ्यात विरोधी बाकावरून 2100 रुपये देणार होता, त्याचं काय झालं असा सवाल वडेट्टीवार यांनी केला. त्याला उत्तर देताना वडेट्टीवारसाहेब, जाहीरनामा हा पुढच्या पाच वर्षांचा असतो ना, असा सवाल करून अजित पवार म्हणाले, ‘आम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिलं आहे, आम्ही देणार आहोत. आम्ही कधीच कोणी नाही म्हटलेलं नाही. तुम्ही तर कोर्टात गेला होता. काहीजण म्हणाले बंद करा, काही जण चुनावी जुमला आहे, असंही म्हणाले होते. चुनावी जुमला असता ना...अहो काल होळीला तीन हजार रुपये दिले, ही गोष्ट लक्षात ठेवा.
लाडकी बहीण योजना आणत असताना दोन जीआर काढले आहेत. पहिल्यांदा ६० वय होतं, दुसऱ्या जीआरमध्ये 60 चं 65 केलं. ही योजना गरीब घटकांसाठी आहे. त्यासंदर्भात आमच्या घाईगडबडीत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, अशा काही लाडक्या बहिणी यादीत आल्या होत्या असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.