MNS Raj Thackeray on Marathi Abhijat Bhasha : आजच्या घटस्थापनेच्या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. याबद्दल सर्वप्रथम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या बाहेर पसरलेल्या तमाम मराठी जनांचं अतिशय मनापासून अभिनंदन. अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या आहेत.
याचबरोबर केंद्र सरकारने घेतल्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले आहेत. शिवाय, राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी लोकसभा निवडणुकीआधी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देताना नरेंद्र मोदींकडून या निर्णयाची अपेक्षाही जाहीरपणे व्यक्त केली होती, ती आठवणही राज ठाकरे यांनी सांगितली आहे आणि एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळतो, हे देखील सांगितले आहे.
''मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला हवा ही मागणी मी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात, नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यासमोर केली होती. तेंव्हा नरेंद्र मोदी हे २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या सभेत नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान व्हावेत यासाठी जो पाठींबा मी दिला होता, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी ही 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा' ही होती. ''
''माझा पाठींबा बिनशर्त आहे असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. अर्थात बिनशर्त म्हणजे माझ्या पक्षाला हे द्या ते द्या यापेक्षा माझ्या राज्यासाठी, माझ्या भाषेसाठी काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. त्यातल्या एका मागणीची आज पूर्तता झाली. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम केंद्रीय मंत्रिमंडळाचे देखील खूप आभार. ''
''मुळात एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो म्हणजे काय होतं हे समजून घ्यायला हवं आणि ते मिळण्याचे निकष काय होते हे देखील समजून घेऊया. ''
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचे सर्वसाधारण निकष काहीसे असे आहेत...
• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
• या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
• भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.
''२०१२ साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पाठारे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारला अहवाल देण्यासाठी एक समिती नेमली गेली होती. त्या समितीने आपला अहवाल २०१३ साली प्रकाशित केला होता. हा अहवाल माझ्या ग्रंथसंग्रहालायत दर्शनी भागात मी मुद्दामून ठेवला आहे. आणि काही महिन्यांपूर्वी रंगनाथ पाठारे यांच्याशी झालेल्या भेटीत देखील या अहवालावर चर्चा झाली होती. असो... तर, आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर काय नक्की गोष्टी घडतील... ''
•मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करायला अधिक चालना मिळेल.
•भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल.
•प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला प्रोत्साहन मिळेल.
•महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालये सशक्त होतील.
•मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत येईल.
* प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन होईल.
* अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येईल.
या सर्व गोष्टी अभिजात भाषेचा दर्जा न मिळता देखील होतीलच की, असा युक्तिवाद येऊ शकतो. पण आपली भाषा ही इतकी प्राचीन भाषा आहे, जी संतांची भाषा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा होती, ही भाषा पराक्रमाची, सर्वोत्तम साहित्याची भाषा आहे , अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळू नये हा माझ्या पक्षाचा मुद्दा होता.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची खूप जुनी आहे. आम्ही २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राचा जो विकास आराखडा सादर केला होता, त्यात देखील ही मागणी होती. आणि वेळोवेळी यासाठी आमचा पाठपुरावा देखील सुरु होता.
''जवळपास १२ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा दर्जा मिळाला, हाच माझ्यासाठी आणि माझ्या पक्षासाठी आनंदाचा क्षण. आज हा जो दर्जा मिळाला आहे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने(MNS) निःसंशय अविश्रांत पाठपुरावा केला आहे आणि त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन.''
तसेच ''प्रत्येक माणूस जन्माला येताना त्याची भाषा घेऊन येतो, आपण सगळे जणं मराठी ही भाषा जन्माला घेऊन आलो आहोत. ही भाषाच आपली ओळख आहे, आपली अस्मिता आहे. या भाषेला आता ज्ञानाची, व्यापारउदीमाची आणि जागतिक विचारांची भाषा बनवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगाकडे बघण्याची चौकट मराठी असली पाहिजे, ही माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आहे आणि हेच आमचं अंतिम ध्येय आहे. पुन्हा एकदा मराठी जनांचे अभिनंदन...'' अशा शब्दांमध्ये राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.