Mumbai News : केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. त्यासोबतच पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत गुरुवारी यावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्र सरकार व पीएम नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके ॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!”, असं ट्विट मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.
“अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. 'आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो. हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला.
लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.