Navi Mumbai Airport Naming: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय पाठबळ मिळू लागले आहे.
कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच भूमिपुत्रांच्या न्याय्य मागणीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे ठोस पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
उपोषणाच्या आठव्या दिवशी आमदार मोरे यांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उपोषणकर्त्या रश्मिता पोपटा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अनेक दिवसांच्या आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली असली, तरी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांचा संघर्ष कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर चिंचपाडा पुलाखाली सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
आमदार मोरे म्हणाले, "लोकनेते स्व. दि. बा. पाटील हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही, तर भूमिपुत्रांच्या संघर्ष, त्याग आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. नवी मुंबईच्या उभारणीत स्थानिक शेतकरी आणि भूमिपुत्रांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा सन्मान होणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे."
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून भूमिपुत्रांच्या भावना केंद्र सरकारपर्यंत पोहोचविण्यात येतील आणि विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असताना शिवसेनेने या आंदोलनाला उघड पाठिंबा दिल्याने या विषयावरील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भूमिपुत्रांच्या अस्मितेशी जोडलेल्या या प्रश्नावर राज्य सरकारची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.