
संजय शिरसाट विरुद्ध संजय राऊत हा वाद अधिक उफाळला असून आता कोर्टात जाणार आहे. शिरसाट आता संजय राऊतांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहेत. माझा व्हिडिओ मॉर्फ करून बनवला आहे असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. मी आज अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार आहे. राऊतांनी नोटीसला उत्तर दिलं नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करणार असा इशारा संजय शिरसाटांनी दिला आहे.
बदनामी करण्यासाठी इतक्या नीच पातळीवर गेल्याचे मी पहिल्यांदा पाहतोय असं शिरसाट यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या काही दिवसांआधी जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन मुक्त करा, अशी मागणी केली होती.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. असं सांगतानाच राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला एक आठवण करुन दिली आहे.
ते म्हणाले, फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोने जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्कोसारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं, याची आत्तापर्यंतची दोनच उदाहरणं आहेत पण ती आहेत हे विसरू नका. एक उदाहरण आहे ओमान मधल्या अरेबियन आवरिक्स अभयारण्याचं आणि दुसरं उदाहरण आहे ड्रेस्डन व्हॅलीचं... जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅलीला जागतिक वारसा दर्जा मिळाला पण निकष न पाळल्याने तो २००९ ला काढून घेतला. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. तसेच सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका ! त्यात जात - धर्म पहाण्याची गरज नाही !
जनसुरक्षा कायद्यावरुन शिवसेना(उबाठा)खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, काल पाशवी बहुमताच्या आधारे सरकारने जनसुरक्षा कायदा मंजूर करून घेतला. अनेक सामाजिक संघटनांनी, बुद्धीजीवींनी या कायद्यातील तरतुदींविषयी चिंता व्यक्त केली आहे. आमचा पक्ष व विरोधकांचा या कायद्याला विरोध आहे. आजही आदिवासी पाड्यांवर सोयी-सुविधा नाहीत. तिथे झोळीतून गरोदर मातांना न्यावे लागते. त्यामुळे हा जनसुरक्षा कायदा नाही तर भाजपा सुरक्षा कायदा असल्याची प्रखर टीका संजय राऊत यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.