
Mumbai News : राज्याच्या राजकारणात शिवसेना फुटीनंतर भूकंप आला होता. यानंतर आजही शिवसेना का फुटली यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे शिवसेनेकडून आरोप- प्रत्यारोप होत असतात. दरम्यान काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठीच आपण उठाव केल्याचं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं होते. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घेतलं नसतं तर शिवसेना फुटली नसती असेही विधान शिंदे यांनी पुन्हा केल्याने वादाला तोंड फुटले आहे. या वादावर शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत यांनी शिंदे यांनी मुख्यमंत्री करण्याला कोणाचा विरोध होता. याचेच आता स्पष्टीकरण दिलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे यांचेच नाव आघाडीवर होते. तर तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरू होत्या. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना ज्युनिअर ठरवत त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता. तसेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद आपल्याकडे घ्यावे असा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी फक्त भाजपला रोखण्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. भाजपने शब्द पाळला नाही, असे राऊत यांनी अनेकदा सांगितलं होते.
दरम्यान शिवसेना बंडाच्या वाद थंड झाला होता. जो आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती, असे म्हणत वादाला सुरूवात केली आहे. शिंदे यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याचा धागा धरत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला तर पक्ष फुटीला त्यांचे मुख्यमंत्री होणे कारणीभूत असल्याची टीका केली होती. तसेच खरा वाघ कोण असेल तर त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे होते. मी त्यांचाच चेला आहे. मी शब्द देताना दहावेळा विचार करतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी आपण शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेची काँग्रेस होऊ दिली नाही, अशी टीका केली होती.
आता या टीकेवर संजय राऊत यांनी पलटवार केला असून तुम्ही धनुष्यबाण चोरला आणि आता कोणाच्या दावणीला लावला आहात? ते योग्य आहे का? दिल्लीत जाऊन का उठाबशा काढत आहात? हे बाळासाहेबांना मान्य होईल का? यामुळे आता त्यांना आत्मचिंतनाची गरज असल्याचं म्हणाले. तर यासाठी त्यांनी कामाख्या मंदिरात किंवा कुठेतरी जावे. आम्ही काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधली नाही. पण आज तुम्ही ज्या भाजपबरोबर बसला आहात, त्यांनी बेईमानी केल्याचा टोला देखील राऊत यांनी लगावला.
महाविकास आघाडीच्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे सहभागी होते. त्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. पण आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ते शिंदे ज्युनिअर आहेत म्हणून विरोध केला होता. ते ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, असा पवित्रा त्यांच्या बाजूला बसणाऱ्या अजित पवार यांनी घेतला होता.
जेव्हा राज्यात युतीचे सरकार होते तेव्हा शिंदेंना विधिमंडळाचे नेतेपदही देण्यात आलं होतं. पण तेंव्हा सरकार आल सरकार स्थापन होऊ शकलं नाही. मविआच्या काळातही शिंदेंना विरोध झाला. आज जे ज्यांच्याबरोबर बसले आहेत असे अजित पवार यांनी आणि दिल्लीत ज्यांनी सत्कार केला असे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले नाही. शिंदे फारच ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका मांडली होती, असा दावा राऊत यांनी केला आहे.
भाजपनेही शब्द पाळला नाही
मविआचे सरकार का आले कसे आले याची माहिती सगळ्यांना आहे. त्यावेळी जनतेचा कौलहा युतीच्या बाजूने होता. पण भाजपने शब्द पाळला नाही. आम्हाला शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं होत. तसं करायचं नसतं तर त्यांची विधीमंडळाच्या नेतेपदी निवड केली नसती. भाजपने 50-50 चा शब्द पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते, असाही दावा राऊत यांनी केला आहे.
राऊत यांनी शिंदे मुख्यमंत्री का झाले नाही याचे स्पष्टीकरण देताना पुन्हा एखदा बोट शरद पवार यांच्याकडे दाखवले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता असून पुन्हा एकदा शिवसेना राष्ट्रवादीत वाद होऊ शकतो. काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेल्या सत्कारावरून राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.