
पन्हाळ्यावर 13D थिएटरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाला मुख्यमंत्री पोहोचण्याआधी कार्यक्रम स्थळी साप आढळल्याने काहीसा गोंधळ उडाला. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या एक सर्प मित्रांने साप पकडला. पकडलेला साप वनअधिकारीकडे सुपूर्द केला.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. जवळपास दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे.
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मागील आठवड्यातच त्यांनी पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.तसेच त्यांनी अनेकदा पक्षालाही अडचणीत आणलं आहे. आता त्यांनी थेट माजी पंतप्रधान राजीव गांधींबाबतच मोठं विधान करत नवा वाद ओढवून घेतला आहे. दोनदा नापास झाल्यानंतरही राजीव गांधींना पंतप्रधान केल्यामुळे आश्चर्य वाटलं,असं अय्यर यांनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी (ता.8 मार्च) रोजी बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात येणार होता. पण या मोर्चाची तारीख बदलली आहे. आता हा निषेध मोर्चा रविवारी (ता.9) काढण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी अमरसिंह जगताप यांनी दिली आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 3 महीने पूर्ण होत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे.
औरंगजेबाची स्तुती केल्यानंतर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमींवर टीकेची झोड उठवण्यात आली होती.तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. आता परत एकदा आझमींनी आपण कोणत्याही महापुरुषाबद्दल कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही जे काही भाषणं ऐकतो, त्यावरुन मी वक्तव्य केलं.यावर वाद तयार करण्याची काय गरज आहे? असा प्रश्न सपाचे आमदार अबू आझमी यांनी विचारला. भाजपचा ज्या मुद्द्यांवरून मतं मिळतात त्याच मुद्द्यांवर वाद निर्माण केले जातात असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईत येणार्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही, असं विधान केल्यामुळे नवा वाद ओढावला आहे. मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विरोधक भाजपवर चांगलेच ताशेरे ओढत आहेत.पण भैय्याजी जोशी यांनी मराठीचा अपमान केला नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटलंय. जोशींनी मराठीला दुय्यम समजलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणतायत. काही लोक राजकारण करतात त्यांनी आता राजकारण थांबवावं असं एकनाथ शिंदेनी असा टोलाही शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे.
आपल्या विरोधात अविश्वास ठराव आहे. नैतिकतेला धरून आपण या खुर्चीवर बसणार नाही असे आम्हाला वाटले होते. कारण सकाळी सभागृहात आपण येऊन सभापतींच्या खुर्चीवर न बसता सभागृहात बसलात. कदाचित आपण नैतिकतेला धरून सभापतींच्या खुर्चीवर अविश्वास ठराव निर्णय होत नाही तोपर्यंत बसणार नाहीत असे आम्हाला वाटले. परंतु आता आपण खुर्चीवर बसला आहात. मला सचिवालयाला विचारायच आहे की नेमके अविश्वास ठरावाबाबत काय नियम आहेत? असे म्हणत शिवसेनेचे अनिल परब यांनी आक्षेप घेतला.
ज्ञानराधा घोटाळ्यामुळे आत्तापर्यंत मारठवड्यातल्या 26 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. ज्ञानराधाच्या सुरेश कुटेच्या बायकोच्या सुरक्षेसाठी पुढे तीन गाड्या आणि मागे तीन गाड्या असतात. आलिशान गाड्यांमध्ये हे लोक फिरत होते. मराठवाड्यात कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली आहे. परिस्थिती भयंकर आहे. याबद्दल मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करून आरोपींच्या जप्त केलेल्या मालमत्तेतून सभासदांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी सभागृहात केली.
माझा भाऊ भाजपाचा बूथ प्रमुख होता. तरीही पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर काहीही प्रतिक्रिया देऊ नये याची मला खंत वाटते. मुख्यमंत्री चांगले असले तरी इतर नेत्यांनी देखील त्यात खारीचा वाटा घेतला पाहिजे, प्रजेमुळे राजा असतो. एवढीच वेदना असल्याचे धनंजय देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले.
मी भैय्याजी जोशींचे वक्तव्य ऐकलेले नाही, त्यामुळे ते पूर्ण ऐकून मी त्यावर बोलेन. पण, आमची, सरकारची भूमिका काय आहे तर, मुंबईची, महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र शासनाची भाषा ही मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे आणि खरं म्हणजे माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैय्याजींचं देखील काही दुमत असेल असे मला वाटत नाही.
मराठीविषयी वादग्रस्त विधान केलेले आरएसएसचे भय्याजी जोशी यांनी याबाबत आज स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, मुंबईत राहणाऱ्याला मराठी आलीच पाहिजे. माझ्या विधानामुळे गैरसमज निर्माण झाला आहे. महाराष्ट्र आणि मुंबईची भाषा मराठीच, यात दुमत नाही. सांस्कृतिक दृष्टीने अभ्यास करावा, अशी आपली भाषा असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे नामांतरण करावे, अशी मागणी भाजप आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. शिवाजी विद्यापीठाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे करावे, महाराजांच्या नावाचा सन्मानपूर्वक उल्लेख व्हावा, अशी मागणी महाडिक यांनी केली आहे.
मराठी भाषेबाबत आरएसएसचे भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मविआच्या आमदारांकडून मुंबईतील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित आहेत.
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयीही आक्षेपार्ह विधान केले होते. पोलिस त्याचा शोध घेत असून त्याचा मोबाईल आढळून आला आहे. त्यामुळे त्याचा ठावठिकाणा लागू शकतो.
बीड आणि जालन्यातील तरूणांना मारहाणप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहे. या घटनांच्या निषेधार्थ त्या उद्या विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत.
अमरावती विमानतळाला गुलाबराव महाराजांचे नाव देण्याची चर्चा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे समजते. याबाबतचा प्रस्ताव विधिमंडळात मांडण्याबाबतही चर्चा झाली आहे. बैठकीत अन्य काही महत्वाच्या मुद्यांवरही चर्चा झाली.
संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना यांच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. संशयित आरोपीच्या फोटोला काळे फासत त्यांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी, अशी मागणी या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात ‘मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे,’ असे काही नाही, असे विधान केले. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं अभिनंदन करण्यासाठी उठलेल्या आदित्य ठाकरेंना सत्ताधाऱ्यांनी बोलू दिले, त्यामुळे वाढलेल्या गोंधळामुळे सभागृह तहकूब करावे लागले
संतोष देशमुख यांचे व्हायरल फोटो पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी नगरसेवक वसंत मोरे हे आज प्रचंड आक्रमक झाले होते. या खूनप्रकरणातील सर्व आरोपींचे पुतळे बनवून त्यांना पुण्यातील कात्रज चौकात एकाच वेळी फाशी देण्यात आली. राज्यभरातील चौकाचौकात या आरोपींचे पुतळे बनूवन त्यांना फाशी द्यावी. एवढे दिवस अजित पवार झोपले होते का, असा सवाल मोरे यांनी केला.
मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे, असे काही नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात केले होते. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले मुंबईची, महाराष्ट्राची , महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे. त्या संदर्भात भय्याजी जोशी यांचं दुमत असेल असं मला वाटत नाही
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी देणारे डॉ. प्रशांत कोरटकर यांना अटक करा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉ. प्रशांत कोरटकर यांना अंतरिम जमीन मिळाला आहे. मात्र याबाबत कोल्हापूर पोलिसांची उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोरटकर अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस नागपूरला रवाना झाले होते, पण कोरटकर मध्य प्रदेशात फरार झाले होते. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरटकर याला 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला पंढरपुरात फाशी देण्यात आली.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पंढरपुरात आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी साडेबारा वाजता विधानभवनात ही बैठक होईल. धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा आणि माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाल्यानंतक मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक होत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार याकडे बघणं महत्त्वाचं असेल.
भैय्याची जोशी यांचे मराठी भाषेविषयी केलेले विधान हा महाराष्ट्राचा अपमान नाही का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईची भाषा ही मराठी नाही, असे विधान भैय्याची जोशी यांनी केले आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धिक्कार करणार का? असा खडा सवाल राऊतांनी केला आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो समोर आल्यानंतर आता संतापाची लाट राज्यभर उसळली आहे. याप्रकरणी आज (ता.6) बुलढाण्यात सर्व पक्षीय धरणे आंदोलनं करण्यात आले आहे. वालमिक कराडसह सर्व आरोपीना फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. तसेच धनंजय मुंढेंची देखील सीआयडीने सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
महिलेला फोटो पाठवल्याच्या आरोपानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी काल (ता.5) विधीमंडळाबाहेर स्पष्टीकरण दिले होते. तसेच मला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. पण आता काही लोक मला बदनाम करत असत आहेत. यामुळे आता त्यांचाविरोधात हक्कभंग दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. तो आता त्यांनी दाखल केला आहे. जयकुमार गोरे यांच्याकडून संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी युट्यूब चॅनल विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे.
बीड हत्याकांडामुळे अडचणी आलेल्या मंत्री धनंजय मुंडेंना आपला राजीनामा द्यावा लागला आहे. यामुळे त्यांच्या जागी आता नवा चेहरा कोण? कोणाला संधी मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या असतानाच मुंडेंच्या खात्याचा कारभार अजित पवारांनी आपल्याकडे घेतला आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा कारभार आपल्याकडे घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर असून प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात याच मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा मविआच्या नेत्यांनी दिला होता. पण आता फडणवीस येण्याआधीच मविआच्या नेत्यांची धरपकड पोलिसांकडून केली जातेय.
धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आता काँग्रेस नेते राहुल गांधी येथे भेट देणार आहेत. आज ते मुंबईत येणार असून धारावीला भेट देतील.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून विरोधकांनी सरकारला गेल्या तीन दिवसात विविध मुद्द्यावरून घेरलं आहे. अशातच महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वड्डेटीवर यांच्या उपस्थितीत होणार असून सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर ही बैठक सायंकाळी 4 वाजता वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. न्यायालयाने त्यांच्या शिक्षेस स्थगिती दिली असलीतरीही त्यांच्यावर आरोप सिद्ध झाला आहे. यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची आज लावून धरली जाऊ शकते.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 रोजी सुरू झाले असून ते 26 मार्च रोजी संपणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार सादर करतील. पण आजच्या चौथ्या दिवशीही . अबू आझमी निलंबन आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.