
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्यात जगभरातील मान्यवरांची उपस्थिती होती. अशाप्रकारे अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प पर्वास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मोठा राजकीय दावा केला आहे. २३ जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर ठाकरे गटाचे १५ आणि काँग्रेसचे १० आमदार संपर्कात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
मेळावे घ्यायचे घ्या, मात्र आमच्या नादाला लागायचं नाही. आमच्यातील शिवसैनिक जिवंत आहे. पालकमंत्री कसा असतो हे आता मी जिल्ह्याला दाखवून देतो. असं म्हणत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माजी मंत्री अब्दुल सत्तारांना टोला लगावल्याचे आज दिसून आले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाल्यानंतर काँग्रेस एकटी पडली, आघाडीत बिघाडी निर्माण झाली, शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेना एकत्रित राहणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्व वावड्या असल्याचे स्पष्टीकरण दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मला फोन आला असून उद्या मंगळवार महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. यात विधिमंडळ समित्यांसह सर्वच विषयावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेतले जात आहे. असाच एक मोठा निर्णय फडणवीस सरकारनं निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मेपर्यंत हटवण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे. पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून दक्षता समितीची नियुक्त करण्यात आली आहे.
कल्याणमध्ये अल्पवयी मुलांवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. हा एन्काऊंटर फेक असल्याचे आज न्यायालयात सांगण्यात आले. दरम्यान,आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर जप्तीची नोटीस आली आहे. अक्षयच्या वडिलांनी खासगी बँकेकडून घेतलं होतं अडीच लाखांचं कर्ज घेतले होते.कर्जाचे हप्ते थकल्यानं बँकेने घरावर लावली जप्तीची नोटीस दिली आहे.
दिनेश वाघमारे राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त म्हणून निुयक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनेश वाघमारे यांच्या नावाची शिफारस केली होती. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवर राज्यपालांचे शिक्कामोर्तब केले.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण डवळून निघाले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हाचा दाखल करण्याची मागणी संतोष देशमुख यांचा भाऊ, मुलगी करत आहे. आज (सोमवारी) देशमुख कुटुंबीयांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. या भेटी दरम्यान संतोष देशमुख यांचा कुटुंबीयांनी संतोष देशमुख यांच्या हत्येविषयी माहिती दिली.
बदलापूर प्रकरणात आरोपी असलेल्या अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पाच पोलीस जबाबदार असल्याचा निष्कर्ष न्यायालयाच्या चौकशीत समोर आला आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. फेक एन्काऊंटरची जबाबदारी जितकी पोलिसांची आहे तितकी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदावरून वाद सुरू असतानाच गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना मोठा मान मिळणार आहे. त्यांच्याच हस्ते अनुक्रमे नाशिक आणि रायगडमध्ये ध्वजारोहण होणार आहे. रविवारी दोघांची पालकमंत्रिपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी राज्य सरकारने ध्वजारोहणाबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहा. पालकमंत्रिपदासाठी हावरटपणा सुरू आहे. जाळपोळ करून पालकमंत्रिपद मिळत असेल तर चुकीचे आहे. जाळपोळ करणारे मंत्री राज्याला नकोत. मंत्र्यांचा स्वार्थीपणा बरा नाही, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.
नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. नाशिक रोड गंधर्वनगरी परिसरात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या मुलाला इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. हा मुलगा गतिमंद होता. आरोपी पसार झाला असून नाशिक पोलिस शोध घेत आहेत.
भंडारा जिल्ह्यातील सातही पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. आज या निवडणुका पार पडल्या. भंडारा, तुमसर, मोहाडी, लाखांदूर, साकोलीमध्ये भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले. तर महाविकास आघाडीला केवळ लाखनी आणि पवनीमध्येच विजय मिळवता आला.
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. चौकशीदरम्यान त्याने सैफच्या घरात कसा शिरला, याची माहिती दिली आहे. इमारतीमध्ये अपुरी सुरक्षाव्यवस्था मागील बाजूला सीसीटीव्ही नसल्याचा त्याने फायदा घेतला. आपत्कालीन स्थिती बाहेर पडण्याचा मार्गाने तो अकराव्या मजल्यापर्यंत पोहचला. त्यानंतर डक्टमधून त्याने बाथरूमध्ये प्रवेश केल्याचे समोर आले आहे.
वाल्मिक कराडप्रकरणी भाजपचे पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची आज सीआयडीकडून चौकशी करण्यात आली. पुण्यात वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे जागा खरेदी करण्यात आली आहे. या खरेदीमध्ये खाडेंनी मध्यस्थी केला असल्याचा संशय सीआयडीला आहे.
कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्री पद कोणाला द्यायचे हे मुख्यमंत्री ठरवतात. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात कोणी काहीही बोलत असले तरी त्यात काही तथ्य नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनात बीडची लॉबी काम करत असल्याची माहिती माझ्याजवळ असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. बीड जिल्ह्याचे नाव वापरून इथे कोणी दादागिरी करत असेल तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोहचू, असा इशाही राणे यांनी दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर दोषींवर कारवाई व दोन्ही कुटुंबाना न्याय देण्याच्या मागणीसाठी 25 जानेवारी रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या जामिना अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता 23 जानेवारीला होणार आहे. केज कोर्टात कराडच्या वकिलांनी विनंती केली होती. यानंतर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय.
कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या सियालदाह न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. बलात्कार-हत्येप्रकरणी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा तसेच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. दीड तास झालेल्या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर खल करण्यात आला. आदित्य ठाकरे हे देखील बैठकीला उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडमध्ये एका कंपनीच्या मालकावर अज्ञातानी गोळीबार केला आहे, ही घटना पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. एका दुचाकीवरून हेल्मेट घालून आलेल्या दोन अज्ञातांनी कंपनी मालकावर गोळीबार केला आहे.
आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरूनच माझे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. देवस्थान जमिनीचे आणि वक्फ बोर्डाच्या जमिनी प्रकरणी सुरेश धस यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. संतोष देशमुख खूनप्रकरणी ते मीडियापुढे येऊन मला जमीन गैरव्यवहार प्रकरणी क्लिनचीट दिलेली आहे.. आरोपीच मीडियापुढे येऊन न्यायालयाचा अवमान करतात. तसेच देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करण्याचे पापसुद्धा सुरेश धस करीत आहेत. सुरेश धस यांच्यामुळे माझे पोलिस संरक्षण काढून घेण्यात आलेले आहे, त्यामुळे माझ्या जिवितास धोका निर्माण झालेले आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी केला आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार आहेत. त्यामुळे नाशिकचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला मिळावं, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त त्यांना त्या जिल्ह्यात पालकमंत्रिपद मिळावं, अशी आमची अपेक्षा आहे. आमची ही अपेक्षा असली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, त्यामुळे ते निर्णय घेतील. नाशिकच्या पालकमंत्रिपदाची मी मागणी केलेली नाही. माझ्या पालकमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे निर्णय घेतील, असेही कोकाटे यांनी स्पष्ट केले.
मालेगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. मंत्री दादा भुसे यांनी अद्वय हिरे यांच्या ताब्यात असलेली बाजार समिती हिसकावून घेतली आहे. मालेगाव बाजार समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या भुसे गटाचे चंद्रकांत शेवाळे आणि उपसभापतिपदी अरुणा सोनजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे मालेगाव बाजार समितीतील अद्वय हिरे यांची सत्ता संपुष्टात आली असून मंत्री भुसे यांचा या निवडणुकीत करिष्मा दिसून आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या रायगडच्या पालकमंत्रिपदाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे. रायगडमध्ये शिवसेनेकडून आंदोलन झालं. टायर जाळून निषेध करण्यात आला. असं घडणं चुकीचं आहे. जी भाषा वापरण्यात आली, त्याचा जाहीर निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडमध्ये असं करत असतील तर हे चुकीचं आहे. अदिती तटकरे यांचं काम खूप आहे. पालकमंत्रिपद देऊन त्यांचा सन्मान केला. महायुतीमध्ये महिलांचा सन्मान केला जातो, पण त्यांच्याविरोधात जे आंदोलन झालं त्याचा निषेध करते. रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत आंदोलनमधला शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ दाखवला.
बदलापूर येथील शाळेत एका विद्यार्थिनीशी गैरकृत करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला होता. त्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलिस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलेले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई होणार हे, आता निश्चित मानले जात आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल झारखंडमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने मानहानीच्या कारवाईला स्थगिती दिली आहे. हे प्रकरण २०१८ चे आहे, जेव्हा गांधी यांनी तत्कालीन भाजप अध्यक्ष शाह यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे.
नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाच्या घोषणेला काल रात्री स्थगिती देण्यात आलीय! हे नक्की काय चाललंय? मुख्यमंत्री परदेशी असताना अशी स्थगिती येणं आणि पालकमंत्री म्हणून जाहीर केलेल्या मंत्र्यांचा अपमान होणं हे विचित्र आहे.
पहिल्यांदाच ‘सह पालकमंत्री’ आणि मग स्थगिती ही संकल्पना मंत्रिमंडळात आली आहे. मंत्रिपद मिळवून देखील काही स्वार्थी गद्दार मंत्री मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत. पालकमंत्री पद, बंगले ह्यावर भांडण्यापेक्षा जनतेची सेवा करा, थोडीतरी लाज बाळगा! आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढं संख्याबळ असूनही मुख्यमंत्री ही दादागिरी का सहन करत आहेत?
थोड्याच वेळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिल्व्हर ओकवर घेणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष शरद पवार यांची भेट .
अकोल्यातल्या जनआक्रोश मोर्चाला मनोज जरांगे पाटील आणि आमदार धस यांची अनुपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांच्या ताफ्याला भोकरदन येथे काळे झेंडे दाखवले.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गाव असलेल्या दरे येथे निघाले आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीतील नाराजी उफाळून आली आहे.शिंदे हे वैयक्तिक कारणासाठी चार दिवस दरे गावी रवाना झाल्याचं बोललं जात असलं तरी पालकमंत्रिपद वाटपावरून ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी हेलिकॉप्टरने दरे गावाला निघाले आहेत.
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या पुढे आहे, त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण ही योजना गरजवंत महिलांसाठी आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता.२०) जालना येथे म्हटले.
अभिनेता सैफ अली खान याच्यावरील बांगलादेशी नागरिकाचा हल्ला हा मुंबई पोलिसांचा राजकीय दावा असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. गेल्या दहा वर्षांपासून बांगलादेशी देशात घुसत आहेत, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहे, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.
अभिनेता सैफ अली खान याच्या हल्ल्यात बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी अटक केली असून, मुंबई (Mumbai) पोलिसांनी हल्ल्यापूर्वी हल्लेखोराने कसे नियोजन केले होते, याचे पुरावे जुळवण्यास सुरवात केली आहे. सैफ अली खान याची पत्नी करिना कपूर-खान हिचा यासाठी पुन्हा पुरवणी जबाब घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीतील मृत्यूप्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात आक्रोश मोर्चा. वैभवी संतोष देशमुख, धनंजय देशमुख, आमदार सुरेश धस, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील मोर्चाला मार्गदर्शन करणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज जालना दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच जालना दौऱ्यावर आले आहेत. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या दर्शना या निवस्थानी अजित पवार दाखल झाले आहेत.
'बीडचं पालकत्व मिळालं असतं, तर आनंदच झाला असता', अशी प्रतिक्रिया भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. महायुतीकडून (Mahayuti) जी जालन्याची जबाबदारी मिळाली, त्यावर अधिक काम करणार आहे. ही संधी अनुभव म्हणून पाहत आहे. अजित पवार आम्हाला पूर्ण सहकार्य करतील, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी म्हटले.
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबधीत आरोपी वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणावर आज सुनावणी आहे. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यासह आठ जणांना मोक्का लावण्यात आला आहे. एक आरोपी फरार आहे.
राज्य सरकारने रविवारी रात्री उशिरा नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द केली. नाशिक आणि रायगड पालकमंत्रिपदाला स्थगिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महायुतील सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. येत्या 26 जानेवारी पालकमंत्री म्हणून राष्ट्रध्वज कोण फडणवणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.
Donald Trump Live : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची आज शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्या शपथविधीची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे. जगभरातील अनेक दिग्गज या शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि रिलायन्स फांऊडेशच्या अध्यक्षा नीता अंबानी हेही हा शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.