
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं, मला वाटत नाही. कारण त्या भागाचा जो इतिहास आहे, त्या भागात जे घडतं त्यावरून मला तसं वाटत नाही. पवार गटाच आमदार संदीप क्षीरसागर यांनी मोठं विधान केलं आहे.
1000 कोटी रुपयांच्या 'टोरेस' घोटाळा प्रकरणात कंपनीचे सीईओ तौसीफ रियाजला लोणावळ्यात अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 फेब्रुवारी पोलिस कोठडीत सुनावण्यात आली.
एकनाथ शिंदे यांचा ताफा पूर्व द्रुतगती महामार्गावरून मुंबईतील घाटकोपर जवळ आला असता अचानक रस्त्यावर त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचे दिसले. तत्काळ एकनाथ शिंदे यांनी आपला ताफा रस्त्याच्या बाजूला घेत गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस करत मदत केली.
अंजली दमानिया यांच्याकडून मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिला आहे का? असा प्रश्न दमानियांकडून उपस्थित करण्यात आला आहे. दरम्यान दुसरीकडे वाल्मिक कराड प्रकरणात त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आणि डॉक्टरांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कायमच गरजूच्या मदतीला धावून जातात. त्यांच्या या संवेदनशीलपणाचा प्रत्यय अनेकदा पहायला मिळाला आहे. मात्र आज प्रजासत्ताक दिनी पुन्हा एकदा मुंबईकरांना पहायला मिळाला. मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघालेअसताना अचानक त्यांना एका दुचाकीचा अपघात होऊन तरुण जखमी झाल्याचं दिसलं. तत्काळ त्यांनी गाडीतून उतरून या तरुणाची विचारपूस केली. दुचाकीवरून पडल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ इतर तरुणांच्या साथीने त्याला उचलून रुग्णालयात न्यायला सांगितलं.
उत्तराखंडमध्ये उद्यापासून यूसीसी म्हणजे समान नागरी संहिता या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची भेट घेतली. दमानिया यांच्याकडून सातत्याने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे.
जीबीएस या दुर्मिळ आजाराचा समावेश आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात आला आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना जीबीएस आजारासाठी योजनेंतर्गत मोफत उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात या आजाराचे शनिवारी सायंकाळपर्यंत ७३ रुग्ण होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावर केलेल्या विधानावर अवघ्या काही तासातच 'यु-टर्न' घेतला. "गरीब जिल्ह्यात मला गरिबाला पालकमंत्री केलं, याचा अर्थ मी ते टोचून बोललो नाही. तर माझ्यावर एक चॅलेंज दिले आहे. त्यासाठी मी बोललो. माझी कधीही नाराजी राहणार नाही. झिरवळ आणि नाराजी हे सूत्र कधीही जमलेलं नाही", असेही नरहरी झिरवळ यांनी म्हटले.
जालना इथं ध्वजवंदनानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनावर माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली. 'जरांगे यांच्या आंदोलनाला यश मिळावं. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सन्मान आहे. त्यांनी जर सकारात्मकता दाखवली, तर मी नक्कीच त्यांना भेटायला तयार आहे', असे मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले.
काँग्रेस (Congress) हायकमांडने दिल्ली इथं 29 तारखेला वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून, त्यात महाराष्ट्रातील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी असणार आहे. नाना पटोले यांचा हा दिल्ली दौरा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाच्या हालचालीबाबत असल्याची चर्चा आहे.
पुण्यापाठोपाठ मुंबईतही (Mumbai) गुइलेन-बॅरे सिंड्र्रोम (जीबीएस) रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यात या आजारांच्या रुग्णांची वाढती संख्येमुळे रुग्णांसाठी कमला नेहरू हाॅस्पिटलमध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुण्यात आतापर्यंत या रुग्णांची संख्या 73 वर पोचली असून, यातील 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे पुण्यात राहणाऱ्या सोलापूरच्या एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. पुण्यातील धायरी येथील डीएसके विश्व या ठिकाणी तो तरुण राहत होता. त्या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. त्यानंतर तो सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होता व या आजारातून सावरला होता. मात्र श्वसनाचा त्रास झाल्याने प्रकृती खालावल्यामुळे त्याला पुन्हा पुण्यात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना महायुतीने (Mahayuti) निवडणुकीत सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यावरून विरोधक आक्रमक आहेत. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी फेब्रुवारीमध्ये केंद्राचा, तर त्यानंतर मार्चमध्ये राज्याचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पाची मांडणी करताना, त्यात काय ठेवाचे अन् काय नाही, याचा विचार होईल, असे सांगून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आताच काही बोललो, तर माझ्याविरुद्ध हक्कभंग होईल, असे सांगितले.
महायुती सरकारने केलेल्या एसटी भाडेवाढीचे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी समर्थ केले आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात जवळपास पाच हजार नवीन बसेस येणार आहेत, त्यामुळे प्रवाशांनी दहा ते पंधरा टक्के भाडेवाढ सहन करावी, असे विधान शिवसेनेचे मंत्री पाटील यांनी केले आहे. आपल्याला ई बसेस आणायच्या असतील किंवा खासगी आरामदायी बसबरोबर स्पर्धा करायची असेल किंवा आपल्या अधिक दर्जेदार सुविधा पाहिजे असतील प्रवाशांनी एसटीची भाडेवाढ सहन करावी, असा सल्लाही गुलाबरावांनी दिला आहे.
पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते गोंदिया येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन करण्यात आले. येत्या पाच वर्षांत सहकार चळवळीपासून एकही माणूस सुटणार नाही, असे प्रकारचे काम आम्हाला करायचे आहे. नवीन गोष्टी करा; आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहे. केवळ रस्ते, मोठमोठे गोडावून, सभागृह बांधणे म्हणजे प्रगती नाही. प्रत्येक आर्थिक ऐपत वाढली म्हणजे विकास झाला आणि तो आम्हाला करायचा आहे.
जालन्यात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन न केल्याने शिवसेनेचे आमदार अर्जून खोतकर आणि भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्यावर संतापले. जालना शहरातील पोलिस मुख्यालयासमोर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज प्रजासत्ताक दिनानिमित्त धजवंदन करण्यात आले.
राज्यात भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जालन्यात ध्वजवंदन कार्यक्रम झाला. पोलीस पथक, स्काऊट गाईड पथक, एनसीसी पथक यांनी पथसंचलन केलं आहे. वर्धा येथे तब्बल ११ वर्षांनंतर जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी ध्वजवंदन केले. पालकमंत्री पंकज भोयर यांनी ध्वजवंदन केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ध्वजवंदन केले. प्रजाकसत्ताक दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या भाग्यश्री फंड हिने मानाची चांदीची गदा पटकावली आहे. भाग्यश्री फंड हिने कोल्हापूरच्या अमृता पुजारीला चितपट करत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. तिला मानाची गदा आणि महिला महाराष्ट्र केसरी किताब प्रदान करण्यात आला. माजी खासदार व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघांचे अध्यक्ष रामदास तडस यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी स्पर्धेला आवर्जून उपस्थिती लावली.
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले आहेत. कर्तव्य पथावर होणाऱ्या संचलनात इंडोनेशियाचे मार्चिंग पथक आणि बँड पथकदेखील सहभागी होणार आहे.
आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. यानिमित्त आपण त्या सर्व महान व्यक्तिमत्वांना अभिवादन करतो, ज्यांनी आपलं संविधान बनवून, आपला विकास हा लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकतेवर आधारित आहे. हा राष्ट्रीय उत्सव आपल्या संविधानाच्या मूल्यांचे जतन करेल आणि एक मजबूत आणि समृद्ध भारत निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नांना आणखी बळकटी देईल अशी आशा आहे, असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या.
देशभरात आज 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने अनेक नेत्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री यांनीही प्रजाकसत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. देशाचं स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, देशाचं संविधान, देशातली लोकशाही, देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहूती दिली. अशा भारतमातेच्या सुपुत्रांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे, असं म्हणत त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.