
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे,त्यात त्यांनी जितेंद्र आव्हाडांनाच अथवा कर्जत-जामखेडच्या आमदाराला प्रदेशाध्यक्ष व्हायचं आहे का? असा सवाल केला आहे. जयंत पाटील यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेणारे अनेक दुर्योधन तिकडे आहेत असा टोलाही मिटकरींनी लगावला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींगद्वारे न्यायालयासमोर आले. त्यानंतर पुणे सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजुर केला. या खटल्याची पुढची सुनावणी 18 फेब्रुवारीला होणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारी जालन्यातल्या आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना थकवा जाणवू लागल्यामुळे, रक्दाब कमी झाल्यामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील एका कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी आगामी काळात होत असलेल्या महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके हे गेल्या 5 दिवसांपासून उपचारासाठी मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत.पाठीच्या मणक्याचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पुण्यातून (Pune) राज्यमंत्री पदी संधी मिळालेल्या माधुरी मिसाळ या आता आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'अॅक्शन मोड'वर आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी पुणे महानगरपालिका अंतर्गत विकास कामे, प्रकल्पांचा आढावा घेणेबाबत नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास व वक्फ बोर्ड यासंबंधी राज्यमंत्री मिसाळ यांनी पुणे मनपात शुक्रवारी मनपा आयुक्त राजेंद्र भोसले आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची घेतली भेट घेतली. ही भेट भुजबळांचे आशीर्वाद घेण्यासाठी होती, असं मंत्री मुंडेंनी म्हटलं आहे.
बीडमधील (BEED) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा म्हणून जालना इथं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चातील गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी 'हाथ की सफाई' केली. मोर्चेकरांचे मोबाईल, पाकिटांवर चोरांनी डल्ला मारला. मोर्चातील 12 ते 15 मोर्चेकऱ्यांनी जालन्यातील कदीम पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत.
कुर्ला बेस्ट बस अपघातप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. बसचालक संजय मोरे याचा जामीन अर्ज मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. संजय मोरे याच्या वकिलांनी अपघाताला बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचा दावा करत जामिनाची मागणी न्यायालयाकडे केली होती. संजय मोरे पळून जाऊ शकतो, असा युक्तिवाद करत सरकार पक्षाच्यावतीनं तपासी पोलिस अधिकाऱ्यांनी जामिनाला विरोध दर्शवला होता. 9 डिसेंबरला कुर्ला इथं बेस्ट बस अपघातात 9 जणांचा मृत्यू, तर 42 जण जखमी झाले होते.
पुण्यातील (Pune) धायरी भागात रखडलेल्या डीपी रोडवरून आता राजकारण तापलं आहे. "डी पी रोड न होण्यास कोण जबाबदार" या विषयावर अनोखी निबंध स्पर्धा भरवण्यात आली आहे. यासाठी पहिले बक्षीस 3 हजार, दुसरे 2 हजार आणि तिसरे 1 हजार ठेवण्यात आले आहे. तर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अगा धायरीचे ग्रामस्थांकडून ही अनोखी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना 15 जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी कामगार मंत्रालय मंत्री सुरेश खाडे यांनी यांनी मिरज मतदारसंघावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्या मतदारसंघातून चार वेळा निवडूण आले त्याच मतदार संघाला त्यांनी मिनी पाकिस्तान म्हटले आहे. त्यांनी हे वक्तव्य हिंदू गर्जना सभेत केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी पटोले यांच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. त्यानंतर फडणवीस यांनी आज साकोली येथे पटोले यांची भेट घेतली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर एस. आय. टी. चौकशी सुरु असून तपास केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आधीच सांगितलं आहे की कोणालाही यात सोडलं जाणार नाही. मी यावर बोलणं योग्य नाही. सध्या चौकशी सुरू असून संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय नक्की मिळेल', असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते.
नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्यात असून निवडणुकीत महाविकास आघाडीला समन्वय ठेवता आला नाही. उलट महायुतीने जोरदार मुसंडी मारत सत्ता कायम ठेवली. आता राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र या दरम्यान निवडणुकीच्या पराभवावर मविआच्या नेत्यांनी एकसुद्धा बैठक घेतलेली नाही किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. यावरून जेष्ठ नेते शरद पवार नाराज असल्याच्या चर्चांना उत आला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन तेली यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. तेली हे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. विधानसभा निवडणुकीआधीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, तेली यांनी ही भेट कामानिमित्त असल्याचे म्हटले आहे.
चंद्रपूर हा वार आणि वाघांचा जिल्हा आहे. आम्ही वार आडनाव असलेल्या लोकांचा नेहमी सन्मान करतो. आम्ही हेगडेवारांचे अनुयायी आहोत, सर्व वारांचा सन्मान करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा असून ते या कार्यक्रमालाही गैरहजर आहेत. त्यामुळे फडणवीस यांच्या या वक्तव्याला महत्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याची चर्चा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरी केलेल्या किंवा इतर पक्षांत गेलेले नेतेही परतण्यासाठी उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सतर्क केले आहे. या नेत्यांना पुन्हा पक्षात घेताना विचार करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची आज 125वी जयंती आहे. त्यानिमित्त चंद्रपुरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. भाजप आमदार किशोर जोरगेवार हे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आजी-माजी खासदार-आमदार उपस्थित आहेत. पण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती तीन वर्षांपासून थांबवण्यात आल्याचा दावा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी एका वृत्ताच्या हवाल्याने केला आहे. तीन वर्षांत स्कॉलरशिपसाठी 40 कोटी खर्च झाले असते. पण या तीन वर्षांत पंतप्रधान मोदींच्या परीक्षा पे चर्चावर 62 कोटी खर्च करण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती बंद झाल्याने लाखो युवकांचा उज्ज्वल भविष्याचा रस्ता बंद झाला, पण पंतप्रधानांचा पीआर बंद झाला नाही, अशी टीका प्रियांका गांधीनी केली आहे.
भाजपने महाराष्ट्रातील सदस्य नोंदणी अभियान आजपासून सुरू केले आहे. भाजपने दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या काळातच भाजपमध्ये विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्त्या केल्या जाणार आहेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना झाला असला तरी यातील काही आरोपी फरार आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे आज जालन्यात जनआक्रोश मोर्चा होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज स्मारकापासून या जनआक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अंबड चौफुली येथे सभा होणार आहे. या मोर्चामुळे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
निलेश राणेंकडून किरण सामंत यांच्या कन्येचे कौतुक केलं आहे. अपूर्वा सामंत तुमच्या किंगमेकर आहेत, किरण सामंत तुम्हाला तुमच्या मुलींनी निवडून आणण्यासाठी जे काही काम केलं ते खरंच मोठं आहे. निलेश राणे म्हणाले,'बाबांना निवडून आणण्यामध्ये तुझा मोठा हात खरंच तुझे कौतुक आहे. तुझ्या वयाचे आम्ही असताना आम्ही स्टेजवर यायचोच नाही.माझ्या वडिलांचा मला किंगमेकर कुणी सांगितले नाही पण तुमची मुलगी तुमच्यासाठी किंगमेकर आहे.
महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचा घोळाचा फटका बसला आहे. त्यामुळे विधानसभेत मविआला पराभवाचा सामना करावा लागला. असे विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
पुण्यात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'जमत नसेल तर सांगावं हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. दुसरे अधिकारी आणून गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम करू,अशा कडक शब्दात अजित पवारांनी पुणे पोलिसांना फटकारलं आहे.
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र सादर केले आहे. त्यांची हत्या कशामुळे झाली, याचे स्पष्टीकरण पोलिसांनी आरोपपत्रात दिले आहे. पोलिसांच्या तपासावरच बाबा सिद्दीचे यांचे चिंरजीव, माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी वरिष्ठ पोलिसांनी भेट घेत तपासातील त्रुटी सांगितल्या. पोलिसांच्या तपासावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
धाराशिव येथे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. युवा सेना विभागीय सचिव, युवा सेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी राजीनामा दिला आहे. युवा सेनेच्या विभागीय सचिवाने स्थानिक गटबाजीला कंटाळून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे अक्षय ढोबळे यांनी राजीनामा पाठवला आहे. अक्षय ढोबळे हे वरूण सरदेसाई यांचे निकटवर्तीय होते.
Beed News: मस्साजोगचे सरपंच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना झाला असला तरी यातील काही आरोपी फरार आहेत. हत्या आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेला आरोपी विष्णू चाटे याला आज दुपारी एक वाजता केज न्यायालयात हजर करण्यात येण्यात आहे. या सुनावणी त्याला बेल होणार जेल, हे दुपारी समजेल.
धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या तक्रारीनंतर उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढव्हळे यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर उपजिल्हाधिकारी संजयकुमार ढव्हळे यांनी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या विरोधात निवडणुकीत जाणीवपूर्वक दूजाभाव केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याबाबतची चौकशी आता विभागीय आयुक्तांकडून सुरू आहे.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले संजयकाका पाटील पुन्हा भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी बुधवारी (ता.8) झालेल्या भाजप सदस्य नोंदणी अभियानासाठी पूर्ण ताकदीनं काम करण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे ते लवकरच अजित पवारांना धक्का देण्याच्या मानसिकतेत असल्याचं बोललं जात आहे.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यातील विविध शहरांत मोर्चे काढले जात आहेत. काल पैठणमध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता. तसाच मोर्चा आज जालन्यात काढला जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.