
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणत बहुमताच्या काठावर असलेल्या भाजपामध्ये महापौर पदाच्या नावावरून एकमत होताना दिसत नाहीये. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत काल कोअर कमिटीची बैठक पार पडली, पण यात मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिरीष बोराळकर, बसवराज मंगरुळे या सदस्यांना एक नाव ठरवता आले नाही. हे चित्र पाहून प्रदेशाध्यक्ष वैतागले, तुम्ही नाव ठरवून प्रदेशाकडे पाठवा असे सांगत त्यांनी बैठक आटोपती घेतली.
चंद्रपूर महापालिकेचे महापौरपद आपल्या समर्थकाला देण्यासाठी अडून बसलेल्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांना दिल्लीतील बड्या नेत्यांनी मोठा झटका दिला. उपमहापौरपद देऊन त्यांची बोळवण केली तर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला महापौरपद देण्यास बजावले आहे. सत्तास्थापनेसाठी उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांना चंद्रपूरमध्ये सोबत घेण्यात येणार आहे. त्यांना महापालिकेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी स्थायी समिती देण्यात येणार आहे. यावरून दिल्लीत वजन कुणाचे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दुसरीकडे दिल्लीपर्यंत वाद घेऊन जाणाऱ्या आणि आपल्याच पक्षातील नेत्यांच्या विरोधात उभे राहणारे वडेट्टीवार तोंडघशी पडले आहेत.
मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मुंबईच्या महापौरपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता आहे. सर्व राजकीय पक्षांनी नगरसेवकांना या कालावधीत मुंबई न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामतीमध्ये आहेत. ते अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठाण संस्थेमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शरद पवारांसह पार्थ पवार, जय पवार आणि अजित पवारांची बहीण विजया पवार या उपस्थित आहेत. मागील एका तासपासून ही बैठक सुरू आहे. कौटुंबीक बैठक असल्याचे सांगितले जात आहे.
सांगली महापालिकेतील अखेर महापौर आणि उपमहापौर पदाचा तिढा सुटला असून महापालिकेत भाजपचे धीरज सुर्यवंशी महापौर तर राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलं आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचे ७ फेब्रुवारीला मतदान आणि ९ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतून प्रशासन काही प्रमाणात मोकळे होईल. तेथून पुढे जिल्ह्यातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या 'गोकुळ'ची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा पहिला टप्पा म्हणून याद्या तयार करण्याचे काम सुरू होणार आहे.
भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसाठी लातूरमधील जानवळ गावात आलेल्या पंकजा मुंडे यांनी सभेपूर्वी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला. शिवाय सभेनंतर जेव्हा मुंडे या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेल्या तेव्हा स्थांनिकांनी त्यांना रोखलं. यावेळी ग्रामस्थांचा वाढता विरोध आणि संताप पाहता मुंडेंनी अभिवादन न करताच घटना स्थळावरून काढता पाय घेतला. सध्या, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मजबूत करणार आहोत. 2019, 2022 मध्ये भाजप-एनसीपीचं सरकार व्हावं ही दादांची इच्छा होती. शरद पवारांच्या भूमिकेवर बोलण्याचा विषयच नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. दादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आज ट्रॅफिक कायम राहणार आहे. त्यामुळेच पर्यायी मार्ग वापरावा असं आवाहन महामार्ग सुरक्षा पथककडून करण्यात आलं आहे.
1.चांदणी चौक ते घाट रायगड मार्गे मुंबई.
2.आळे फाटा माळशेज घाट ठाणे मार्गे मुंबई.
हे मार्ग वापरावेत असं सांगण्यात आलं आहे.
शरद पवार आज सकाळीच विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले आहेत. या सभागृहात पार्थ पवार, जय पवार उपस्थित असून त्यांची शरद पवारांबरोबर बैठक सुरु असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर उलटला आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत अजित पवारांनी मला सांगितले असते मात्र तसे काही सांगतिल नव्हते, असे वक्तव्य केले होते. या बाबात पत्रकारांनी शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, 'चर्चेत ते (देवेंद्र फडणवीस) कुठेच नव्हते. त्यांना विलिनीकरणाच्या चर्चेबाबत भाष्य करण्याचा अधिकार काय हे मला माहीत नाही.'
लोकसभेत माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकावर सत्ताधीरी विरोध भिडले होते. त्याबाबत शरद पवारांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नरवणेंच्या पुस्तकावर चर्चा करण्याची संधी द्यायला हवी होती. लष्करप्रमुखांनी लिहिलंय याचा अर्थ चिंतेंची सिधी होती तर चर्चा व्हायला हवी होती.
अजित पवार यांनी अपघातापूर्वी फोनद्वारे शेवटचा संवाद कोणसोबत साधला होता. ते नेमके काय म्हणाले होते याची उत्सुकता नागरिकांना होती. दरम्यान, आता अजित पवारांचा फोनवरील शेवटचा संवाद पुन्हा ऐकता आला. श्रीजीत पवार यांच्याशी अजित पवारांनी संवाद साधला. आपण सर्वजाती धर्माच्या लोकांनासोबत घेऊन पुढे जातो, असे ते म्हणाले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या कामकाजाकरिता पुणे जिल्ह्यात १३ तालुक्यात एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. बारामती तालुक्यात १ हजार ९४५, मावळ १ हजार ६१२, मुळशी १ हजार ४९५, शिरुर २ हजार १९०, हवेली १ हजार ८००, दौंड २ हजार ६० , इंदापूर २ हजार ६३२ , पुरंदर १ हजार ५३८, भोर १ हजार १९०, वेल्हे ४५०, आंबेगाव १ हजार ५७५, जुन्नर २ हजार ४११ आणि खेड २ हजार २१६ तालुक्यात असे एकूण २३ हजार ११४ मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.