Maharastra Update : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 27 Jan 2026: मुंबईच्या महापौरपदासाठी अर्ज करण्यासाठीची दोन दिवसांची मुदत आजपासून सुरु होत आहे. राज्यमंत्रीमंडळाची बैठकही होणार आहे. या घडामोडींबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे अपडेट्स वाचा
Live Update
Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

शेतकऱ्यांच्या लॉन्ग मार्चच्या मागण्यांच्या अंमलबजावणीची हमी मुख्यमंत्र्यांनी घेतली  

वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करावी, समुद्राला वाहून जाणारे पाणी स्थानिकांसाठी तसेच महाराष्ट्रातल्या कोरडवाहू भागासाठी वापरावे, पेसा भरती सुरू करून रोजगार उपलब्ध करावा, आदि मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या लॉन्ग मार्चच्या पार्श्वभूमीवर आज अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयातील बैठकीत शेतकऱ्यांची बाजू मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, वन मंत्री गणेश नाईक, यांच्यासह मुख्य सचिव व विविध खात्यांचे अधिकारी यांच्यासोबत दोन तास किसान सभेच्या शिष्टमंडळाने विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

महाजनांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधवांच्या भेटीसाठी आलेल्या जोगेंद्र कवाडेंना विरोध

मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांच्या भेटीसाठी आलेले पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांना विरोधाचा सामना करावा लागला आहे. यावरुन परस्परविरोधी कार्यकर्त्यांची आपापसात बाचाबाचीही झाली. जोगेंद्र कवाडे हे भाजपमध्ये सत्तेत असल्याने त्यांचा पाठिंबा नको भूमिका आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मांडली आहे.

तर संविधानासाठी लढणाऱ्या प्रत्येकासोबत आम्ही स्वतः लढणार अशी भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी यावेळी मांडली. त्यामुळं जोगेंद्र कवाडेंनी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रकरणी लेखी स्वरूपात माफी मागावी अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे.

मुंब्रा शहरात जितेंद्र आव्हाडांचा नागरी सत्कार, बाईक रॅलीद्वारे शक्तिप्रदर्शन

जितेंद्र आव्हाड यांचा आज त्यांच्या मतदार संघातील मुंब्रा भागात जाहीर नागरी सत्कार आणि बाईक रॅलीचे आयोजन केले आहे..

मुंब्रा परिसरात जागो जागी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठं मोठे पुष्पहार लावले आहेत, जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे..

या नागरी सत्काराच्या माध्यमातून आव्हाड निवडणुकीनंतर प्रथमच मुंब्रा परिसरात शक्तिप्रदर्शन करणार आहेत..

MIM पक्षाचे पाच उमेदवार मुंब्रा भागातून निवडून आल्यानंतर या नगरसेवकांनी आव्हाडांवर टीकेची झोड उठवली होती.

जितेंद्र आव्हाड आज (ता.२७) सभेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष आहे.

 PMC News : पुण्याच्या महापौर पदाचा मुहर्त ठरला  

पुण्याच्या महापौर निवडीला अखेर मुहर्त ठरला आहे 11 फेब्रुवारीला महापौर निश्चित होणार असल्याची माहिती आहे. आज ता. 27 रोजी नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांची महत्त्वाची बैठक होत आहे, गटनेत्याची निवड आज मंगळवाही (ता.27) केली जाणार आहे. पण महापौर निवडीसाठी अजून वेळ लागणार आहे.

महापौर पदासाठी रंजना टिळेकर, मानसी देशपांडे, ऐश्वर्या पठारे, रत्नमाला सातव आणि मंजुषा नागपुरे यांची नावे चर्चेत आहेत.

पुणे येथे वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन, गिरीश महाजनांचा केला निषेध

Summary

वंचित बहुजन आघाडीचे पुण्यात महाजनांविरोधात निषेध आंदोलन

सोमवारी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला नाही म्हणून मंत्री गिरीश महाजन यांचा जाहीर निषेध करण्यात आला.

महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करावा यासाठी तीव्र आंदोलन

वंचित बहुजन आघाडी व सर्व विंग्स पुणे शहर, विधानसभा, प्रभागातील आजी–माजी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.

पुणे स्टेशन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर हे आंदोलन

Farmer Long March : शेतकरी लॉग मार्चबाबत सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल

शेतकऱ्यांचा जो लॉग मोर्चा निघालेला आहे. त्यासंदर्भात मंत्र्यांची एक शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात आला होती. त्या समितीला चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. त्यानुसार ती समिती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेत आहे. शेतकरी मोर्चाबाबत सन्मानजनक तोडगा काढण्यात येईल. शेतकरी, आदिवासींबाबत सरकार सकारात्मकच राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Mumbai Corporation : भाजप-शिवसेनेची नोंदणी एकत्र करायची की स्वतंत्रपणे यावर चर्चा सुरू आहे : मुख्यमंत्री फडणवीस

आज शिवसेनेच्या गटाची स्थापना होणार होती. मात्र, ती नोंदणी आज झालेली नाही, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही गट एकत्रित नोंदणी करायची की स्वतंत्रपणे करायचं, यावर आमचा अंदाज घेणे चालू आहे. त्याबाबतचा फायदा आणि तोट्याचा निर्णय करूनच गटाची स्थापना करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले

Devendra Fadnavis : मुंबई, नवी मुंबई विमानतळ मेट्रोद्वारे जोडणार : देवेंद्र फडणवीस

मुंबई आणि नवी मुंबईचे विमानतळ हे मेट्रोद्वारे जोडण्यात येणार आहे. एकूण ३३ किलोमीटरपैकी ९ किलोमीटर ही मेट्रो भुयारी मार्गे असणार आहे. या नव्या मेट्रोसाठी १७ ते १८ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

BJP : चंद्रपुरात भाजपचाच महापौर होणार : चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा

राज्यातील २९ महापालिकांपैकी २५ महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेनचा महापौर होईल. चंद्रपूर महापालिकेत भाजप सर्वांत मोठा पक्ष असून बहुमताचा आकडही पक्षाकडे आहे, त्यामुळे चंद्रपुरात भाजपचाच महापौर होईल, असा विश्वास महसूल मंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

Vijay Vadettiwar : चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरेंना भेटले

चंद्रपूर महापालिकेतील सत्तास्थापनेबाबत काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेटली. त्यात अडीच वर्षांचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युलावर चर्चा झाली. त्यात महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापतिपदाबाबत चर्चा झाल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Long March : मंत्रालयात सरकारसोबत किसान सभेच्या शिष्टमंडळाची चर्चा; निर्णयाकडे लक्ष

आदिवासी शेतकरी बांधवांचा नाशिकहून निघालेला मोर्चा मुंबईकडे कूच करत आहे. त्या मोर्चाने कासारा घाट ओलांडला आहे, त्या अगोदर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. सरकारसोबत चर्चा करण्यासाठी किसान सभेचे शिष्टमंडळ मंत्रालयात दाखल झाले आहे. बैठकीला अजित नवले, जे. पी. गावीत, मंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके उपस्थित आहे. मागील वर्षी काढण्यात आलेली मोर्चातील आश्वासने पाळली गेली नाहीत, त्यामुळेच आज हा लॉग मार्च काढावा लागला आहे, असेही अजित नवले यांनी स्पष्ट केले.

Baramati : बारामतीच्या नगराध्यक्षांवर शाई फेकली

बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावल्याने नगराध्यक्ष सातव यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे.

सिंधुदुर्गात भाजपाची बाजी; ठाकरे गटाला निवडणुकीत मोठा धक्का

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी-कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपाचे प्रमोद रावराणे हे बिनविरोध विजयी झाले. ठाकरे गटाचे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी आपला अर्ज माघारी घेतला. तसेच कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचायत समितीत ठाकरे गटाच्या धनश्री मेस्त्री आणि अपक्ष नीरज मोर्ये यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या हर्षदा वाळके यांचा मार्ग मोकळा झाला.

मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर? 

भाजप आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांची अधिकृत गटस्थापना अद्याप पूर्ण न झाल्यामुळे महापौरपदाची निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता वाढली आहे. गटनोंदणी झाल्यानंतरच निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक ठरेल. महापौर व उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा घेतली जाते, ज्याची तारीख सचिव आयुक्तांशी चर्चा करून ठरवतात.

दीप्ती चौधरी; हुंडाबळी प्रकरणात SIT स्थापन

पुण्यातील उरळी कांचन येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. अभियंता दीप्ती चौधरी यांनी हुंड्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लग्नात मोठ्या प्रमाणावर सोनं व रक्कम दिल्यानंतरही सासरच्यांचा छळ सुरूच राहिला. गर्भवती असताना तिच्यावर लिंगतपासणी व गर्भपाताचा आरोप आहे. प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात आले असून आतापर्यंत सासरच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Sanjay Raut : 'आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे, नाक घासलेलं आहे, आता फार विषय ताणू नये'

नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त दिलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्यामुळे भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यांच्या भाषणावर आक्षेप नोंदवणाऱ्या वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणावर शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी, ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल, तर त्या विषयावर पडदा पडला पाहिजे. भारत प्रजासत्ताक झाला, अशा वेळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानेच त्या सोहळ्याची सुरुवात व्हायला पाहिजे हे सत्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झाला म्हणून गणवेशामध्ये निषेध व्यक्त केला, मी त्यांचे देखील कौतुक करतो. पण, आता मंत्र्यांनी माफी मागितली आहे. नाक घासलेलं आहे. आता फार विषय ताणू नये.'

Nandurbar Rain : अवकाळी पावसामुळे आंब्याचा मोहर गळला, नंदूरबारमधील शेतकऱ्यांना मोठा फटका

काल रात्री नंदुरबार इथं झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठं नुकसान झालं. सातपुडा पट्ट्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. या पावसामुळे काही दिवसापूर्वी मोहरांनी बहरलेली आंब्याची मोहर जमिनीवर घडून पडला. यामुळे आंब्याचे मोहर गळून पडल्याने उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. याशिवाय रब्बी हंगामातील गहू, पपई आणि आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने वातावरणात बदल गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आहे.

Dombivli Crime : डोंबिवलीत अन्न व औषध प्रशासन मोठी कारवाई, बनावट औषध कंपनीवर छापा, पाच जणांना अटक

डोंबिवलीतील सोनारपाडा परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या बनावट औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे औषध बनावटगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

Solapur ZP Election : पवारांना धक्का, ऐनवेळी जिल्हा परिषदेतून ढवळे यांची माघार

माढ्यात पंचायत समितीच्या माजी सभापती यशोदा ढवळे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेनेच्या उमेदवार सविता कोकाटे यांना पाठिंबा दिला आहे. यशोदा ढवळे यांनी बेंबळे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केला होता. ऐनवेळी ढवळे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Girish mahajan nashik : मंत्री महाजनांविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा

प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणावर वनविभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी आक्षेप घेतला होता. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच नाव भाषणाच्या दरम्यान का घेतलं नाही, असे म्हणत या महिला कर्मचाऱ्यांनी तीव्र शब्दात आपला संताप व्यक्त केला. माधवी जाधव यांनी गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांनीही माधवी जाधव यांच्याशी फोनवरुन संवाद साधल माहिती जाणून घेतली.

Kisan Sabha Morcha : मंत्री महाजनांची शिष्टाई निष्फळ, किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

आदिवासींना वनहक्क कायद्याअंतर्गत हक्क मिळावेत, वनजमीन आणि गायरान जमिनीचे स्वतंत्र सातबारा उतारे देण्यात यावेत, तसेच विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने नाशिक ते मुंबई असा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. नाशिकच्या वेशीतून मोर्चा ठाण्याच्या दिशेने सरकत असताना कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारीही उपस्थित होते. मोर्चा पुढे नेऊ नये, आंदोलनकर्त्यांनी सध्या जिथे आहेत, तिथेच थांबावे आणि सरकारसोबत चर्चा करावी, अशी विनंती मंत्री गिरीश महाजन आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली. मात्र, ही शिष्टाई अपयशी ठरली असून, सरकारची विनंती झुगारत मोर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

नाशिकच्या तपोवनमधील झाडं राहणार की तोडणार याबाबत आज न्यायालयात सुनावणी आहे. तपोवन वृक्षतोड प्रकरणी होत असलेल्या उच्च न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. अॅड नितीन पंडित यांनी तपोवन येथील वृक्षतोडी प्रकरणी दाखल केली आहे. न्यायाधीश चंद्रशेखर व गौतम अखंड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

Mumbai live: किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

किसान सभेचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे, शिष्टमंडळाच्या सदस्याची सरकारसोबत चर्चा होणार असून मोर्चो आज ठाण्यात धडकणार आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही . याबाबत माधवी जाधव यांनी आक्षेप घेतला आहे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com