Pune News : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलं तापल आहे. या हत्या प्रकरणामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाली असल्याचं बोललं जात आहे.या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबतची भूमिका मांडली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस(Suresh Dhas) आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी विविध ठिकाणी मोर्चे देखील काढण्यात येत आहेत.
मात्र या मोर्चादरम्यान केलेल्या वक्तव्यांमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप ओबीसी(OBC) नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान सध्याच्या राज्यातील वातावरणावर भाष्य केलं आहे.
शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले, 'गेले काही दिवस राज्यात अस्वस्थ करणारी स्थिती दिसत आहे. दिवसातील माझे सहा- सात तास बीड कसे नॉर्मल करता येईल. परभणीचा इशू कसा सोडवता येईल. आणखी कुठे काय करता येईल या संदर्भातील संभाषण करण्यात जात आहे.'
'जिवाभावाने एकत्र राहणारी माणसं आज शत्रूपणाने वागत आहेत. काही गावांमध्ये अत्यंत दहशतीचे वातावरण आहे. आजच माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्याशी यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. राजकारणात काही मतभेद असतील नसतील मात्र हे चित्र महाराष्ट्रात होऊ द्यायचं नाही. काही झालं तरी लोकांमध्ये ऐक्य करायचं. लोकांमधली ही द्वेषाची भावना कशी जाईल याची काळजी घ्यायची आहे.'
'पण महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच. एकट्या मुख्यमंत्र्यांची ती नाही. चांगले विचार शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवले तर महाराष्ट्रातील सद्यस्थिती बदलायला वेळ लागणार नाही.त्यामुळे महाराष्ट्राला पूर्वस्थितीत आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.