

गेल्या काही दिवसांपासून देशभरात मतदारयादीतील अनियमितता आणि कथित ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातही हा वाद वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करता हा विषय अधिक संवेदनशील बनला आहे. अशातच पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गटाचे पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांच्या पालकांची नावे मतदारयादीतून हटवल्याचा मुद्दा तापला आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा गंभीर प्रकार उघड केला असून निवडणूक आयोगावर थेट आरोप केले आहेत.
इम्रान शेख यांचे वडील युनूस शेख आणि आई राबिया शेख हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मधून लढण्यास इच्छुक आहेत. दोघेही प्रबळ दावेदार मानले जात असताना अचानक त्यांच्या नावांची मतदारयादीतून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे कोणताही अर्ज किंवा पत्ता बदल न करता या दोघांची नावे अनुक्रमे इंदापूर आणि शिरसुफळ-बारामतीच्या मतदार यादीत वर्ग करण्यात आली आहेत.
'३५ वर्षांपासून पिंपरी-चिंचवडमध्ये मतदान करणाऱ्या या दाम्पत्याची नावे अचानक हटवली जाणे ही मोठी विचित्र व संशयास्पद बाब आहे,' असे डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रशासनावर ‘सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले’ असल्याचा आरोप करत, निवडणूक आयोग लोकशाही प्रक्रियेचा अवमान करीत असल्याचा घणाघात केला.
“निवडणूक आयोग केवळ वोटचोरीच करत नाही, तर आता मतदारांची पळवापळवीही सुरू झाली आहे,” असा आरोप करत त्यांनी लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत आयोग उत्तर देणार नसले तरी सत्ताधारी गट त्याचे समर्थन करणार, अशी टीकाही आव्हाड यांनी केली.
या प्रकरणामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, मतदारयादीतील संशयास्पद बदलांची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.