Mumbai : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुतळा प्रकरणावरून विरोधकांकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला जात आहे. तर आव्हाडांनी मात्र संभाजी भिडेंना या प्रकरणातून ओढून आणले आहे. त्यांनी ‘एक्स’वर एक कार्टून पोस्ट केले आहे. हे कार्टून संभाजी भिडे यांचे असल्याचे स्पष्टपणे दिसते.
एवढेच नाही तर आव्हाडांनी एरवी बोलणारे आज शांत आहेत, असे म्हणत भिडेंना डिवचले आहे. त्यांना सांगा मालवणला शिवाजी महाराजांचा पुतळा आडवा पडला आहे, असेही आव्हाडांनी म्हटले आहे. आव्हाडांच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा आव्हाड विरुध्द भिडे असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.
आव्हाडांनी मूर्तीकार जयदीप आपटे यांचे सनातन प्रभातमध्ये प्रसिध्द झालेल्या मनोगतावरूनही जोरदार टीका केली आहे. ‘‘नौदल अधिका-यांच्या सूचनांनुसार बनवलेली शिल्पे निवडली न जाता अचानक घडलेले शिल्प निवडले गेले", छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मूर्तीकार जयदीप आपटे यांनी दिलेली ही कबुली असल्याचे आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
ज्या पुतळ्याच्या कामाला तीन वर्षे लागतात, तो पुतळा अवघ्या सहा महिन्यात बनवला गेला असेल तर कामाचा दर्जा काय असेल, हे सांगण्यासाठी कुठल्याही तज्ज्ञाची आवश्यकता नाही. जे काही करायचे ते निवडणूक प्रचारासाठी हे या सरकारचे सुरूवातीपासूनचे धोरण आहे. परंतु आज त्यांच्या या धोरणाने महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसला आहे. ज्यांच्या नावाने आणि कर्तृत्वाने मराठी माणूस जगभर ताठ मानेने हिंडतो आज त्याच छत्रपतींच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पापाला कुठलंही प्रायश्चित नाही, अशी टीका आव्हाडांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.