
पुणे : शिवसेनेचे (Shivsena) माजी खासदार आणि भाजपचे (BJP) नेते गजानन बाबर (Gajanan Babar) यांचे आज पिंपरी-चिंचवड येथे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांना मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज दुपारी ३ वाजून २५ मिनीटांनी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी राजश्री बाबर आणि २ मुले असा परिवार आहे.
मुळचे सातारा जिल्ह्यातील असलेल्या गजानन बाबर यांनी १९९० साली वाई मतदारसंघातून विधानसभा लढविली होती. त्यावेळी त्यांना मदनराव पिसाळ यांच्या विरोधात २० हजार ५१७ मते मिळाली होती. त्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी पिंपरी - चिंचवडच्या राजकारणात स्थान निर्माण केले होते. एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांनी ओळख मिळवली होती. पिंपरी चिंचवडमधील काळभोरनगर येथे शिवसेनेची पहिली शाखा देखील त्यांनीच सुरु केली होती, यानंतर पिंपरीमधील पारंपरिक प्रस्थ काळभोर यांना हादरा देत बाबर यांनी पहिल्यांदा भगवा फडकवला.
छोटे व्यावसायिक, दुकानदार, व्यापारी आदींच्या ४० संघटनांवर बाबर यांचे वर्चस्व होते. याच ताकदीवर ते ३ वेळा नगरसेवक, हवेली मतदार संघातून २ वेळा आमदार झाले. मात्र २००४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलास लांडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पण त्यातूनही हार न मानत २००९ ते २०१४ या दरम्यान ते मावळ मतदारसंघातून शिवसेनेकडून लोकसभेवर निवडून गेले. "किराणा दुकानात काम करणाऱ्या पोराला बाळासाहेबांनी आमदार-खासदार केले", असे बाबर यांच्याबद्दल बोलले जायचे.
मात्र २०१४ साली शिवसेनेने त्यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना दिले. त्यामुळे तेव्हा पासूनच ते पक्षावर नाराज होते आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. मात्र तिथे फार काळ ते रमले नाहीत. महापालिका निवडणूक तोंडावर आल्यानंतरही शिवसेनेकडून विशेष जबाबदारी दिली जात नसल्यामुळे ते पक्षावर नाराज हाेते. त्यानंतर २०१७ साली त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपला जवळ केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.