MLA Disqualification Result : निकालानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Rahul Narvekar : राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल केला जाहीर...
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA Disqualification Sarkarnama

निकाल टिकणार नाही

सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांचा निकाल टिकणार नाही. त्यांचा हा निकाल सर्वोच्च नाही. न्यायालयाने सुनील प्रभूंची नियुक्ती ग्राह्य धरली आहे, असे ठाकरे म्हणाले.

आम्हाला अपात्र का केले नाही?

नेता दिशा दाखवण्याचे काम करतो. घटना ग्राह्य धरली नाही तर मग आम्हाला अपात्र का केले नाही, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. शिंदेंची शिवसेना ही खरी शिवसेना होऊच शकत नाही. कारण त्यांचे शिवसेनेशी नाते तुटले आहे, अशी टीका ठाकरेंनी शिंदेंवर केली.

निर्लज्जपणाचा कळस

निवडणूक आयोगाचा निकालच त्यांनी ग्राह्य धरला आहे. निर्लज्जपणाचा कळस गाठला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यांनी गैरफायदा घेतला आहे, अशी टीका ठाकरेंनी नार्वेकरांवर केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्वही शिल्लक राहणार की नाही, हे न्यायालयाने आता ठरवायचे आहे, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया...

लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचे कटकारस्थान चालले असल्याचे मी कालच म्हणालो होतो. नार्वेकरांनी आरोपीची दोनदा भेट घेतली. आजच्या निकालाने त्यांनी लोकशाहीची हत्या केली. पक्षांतराचा राजमार्ग कसा असावा, हे त्यांनी दाखवून दिले. - उद्धव ठाकरे

घराणेशाही मोडीत निघाली

कुणा एकाचा निर्णय म्हणजे पक्षाचा निर्णय नसतो. घराणेशाही मोडीत निघाली, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.

हा राजकीय विचारांचा निवाडा

हा न्यायाचा निवाडा नसून राजकीय विचारांचा निवाडा असल्याचे आम्ही जनतेला सांगू. सर्व पक्ष म्हणून जनतेत जाऊ. शिवसेना कुणाची हे लोकांना माहिती आहे. या संघटनेचे नेतृत्व कुणी केले, हे सर्वांना माहिती आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या हयातीत शिवसेनेचे नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे सोपवले - शरद पवार

व्हीप देण्याचा अधिकार पक्ष-संघटनेला

व्हीप देण्याचा अधिकार पक्ष-संघटनेला आहे. सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन पूर्णपणे डावलण्यात आल्याचे निकालात दिसते. पक्ष-संघटना महत्त्वाची असे कोर्टाने म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही वेगळा निकाल दिला असता, हे कोर्टाचे भाष्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे न्यायासाठी उद्धव ठाकरेंना कोर्टात जावे लागेल. - शरद पवार

अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व : शरद पवार

सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच माहिती होती. त्यांनी आधीच यावर भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिलं.

- शरद पवार

हिंदुस्तानच्या इतिहासातील हा काळा दिवस...

बेकायदा विधानसभाध्यक्षांनी हा बेकायदा निर्णय दिला आहे. शिवसेनेची घटना एकनाथ शिंदे की भरत गोगावलेंनी लिहिली आहे. महाराष्ट्रातील जनता गद्दारांना क्षमा करणार नाही. रामाचं नाव घेण्याचा शिंदे गटाला अधिकारही नाही. या निकालाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ. हिंदुस्तानच्या इतिहासातील हा काळा दिवस. - संजय राऊत

निवडणूक आयोग चोरांचे सरदार

भाजपचे स्वप्न होते की, बाळासाहेबांची शिवसेना मातीमोल करण्याचे काम गुजरात मॉडेलने केले आहे. निवडणूक आयोग चोरांचे सरदार असल्याची टीकाही राऊतांनी केली.

आजचा निर्णय भाजपचे षड्यंत्र : संजय राऊत

आजचा निर्णय भाजपचे षड्यंत्र असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला. शिवसेना महाराष्ट्राच्या रगारगातआमचा लढा सुरूच राहणार. निर्णय देणाऱ्यांनी पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना मातीमोल करण्याचा प्रयत्न मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अघोरी प्रकार. आता निवडणूक घेतली तर खरी शिवसेना कुणाची हे समजेल

- संजय राऊत

दोन्ही गटांच्या याचिका फेटाळल्या

शिंदे व ठाकरे गटाकडून आमदार अपात्रतेबाबत करण्यात आलेल्या याचिका फेटाळून लावल्या आहेत. अविश्वास ठरावावेळी व्हीप न पाळल्याच्या कारणास्तव संबंधित आमदारांना अपात्र करण्याबाबतच्या याचिका दोन्ही गटांकडून करण्यात आल्या होत्या.

ठाकरे गटाचे आमदार पात्र

उद्धव ठाकरे गटाच्या १४ आमदारांविरोधात भरत गोगावले यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली होती. अविश्वास ठरावासाठी गोगावले यांनी व्हीप बजावला होता. त्यांना अपात्र करण्याबाबत कोणातेही ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. त्यामुळे त्यांना अपात्र करता येणार नाही, असे नार्वेकरांकडून स्पष्ट करण्यात आले.

ठाकरे गटाला निकाल मान्य नाही

राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल ठाकरे गटाला मान्य नाही. आदित्य ठाकरे यांनी कायदेशीर लढाई लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा व्हीपही अवैध

२ जुलै २०२२ रोजी अध्यक्षांच्या निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेला व्हीप अवैध ठरविण्यात आला. व्हीपचे पालन केले नाही, म्हणून १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिकाही फेटाळण्यात आली. शिंदे गट खरी शिवसेना असल्याने सुनील प्रभू यांना व्हीप बजावण्याचा अधिकार नव्हता.

पक्षविरोधी कारवाया केल्याचेही अमान्य

शिंदे गटातील आमदारांनी पक्षविरोधी केलेल्या कारवायांचा आरोपही नार्वेकरांनी फेटाळला. याबाबत ठाकरे गटाकडून कोणतीही ठोस माहिती सादर करण्यात आली नाही. भाजपशी संधान बांधलं, या आरोपाबाबतही पुरावे न दिल्याने आरोप अमान्य केले.

आमदारांच्या उपस्थितीपत्रकावर शंका

२२ जून रोजी घेण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेल्या आमदारांच्या सह्यांची माहिती सुनावणीदरम्यान सादर करण्यात आली होती. पण याबाबतही नार्वेकरांनी साशंकता व्यक्त केली. एका कागदपत्रावर १७, तर एका कागदपत्रावर १५ सह्या होत्या. त्यामुळे अपात्रतेची याचिका फेटाळण्यात आली.

सुनील प्रभूंना बैठक बोलावण्याचा अधिकार नाही

सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप व्हॉट्स अॅपवरून पाठवला होता. पण त्याचे केवळ स्क्रीनशॉट सादर करण्यात आला. याबाबत ते काहीही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत. बैठक बोलावताना ते प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांना अधिकार नव्हता. त्यामुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणास्तव १६ आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.

शिंदेंचे आमदारही पात्र

शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याने त्यांचे आमदार अपात्र ठरवता येणार नाहीत. सुनील प्रभू यांना बैठक घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे १६ आमदारांना अपात्र करण्याची याचिका फेटाळली.

शिंदे गटच खरी शिवसेना

शिवसेनेत दोन गट पडले त्यावेळी शिंदे गटाकडे ३७ आमदार होते. त्यामुळे त्यांचा गट खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले. भरत गोगावले यांचा व्हीप वैध असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.

R...

ठाकरे गटाच्या कागदपत्रांवर आक्षेप

राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा प्रतिनिधी सभेची बैठक झाल्याचे ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत गंभीर निरीक्षण. अशी बैठक झाली किंवा नाही हे कागदपत्रांवरून स्पष्ट होत नाही. कार्यकारिणी सदस्यांच्या सह्या नाहीत. त्यामुळे बैठक झाली किंवा नाही याबाबत साशंकता.

हकालपट्टीसाठी कार्यकारिणीत चर्चा आवश्यक

कुणाचीही हकालपट्टी करण्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा करणे आवश्यक आहे. त्यामुळे शिंदेंना काढण्याचा निर्णय मान्य करता येणार नाही.

शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार नव्हता

एकनाथ शिंदे यांना पदावरून हटवण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नव्हता. ते कुणालाही पक्षातून काढू शकत नाहीत. मनात आल्यानंतर कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार त्यांना नाही. पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार देणे लोकशाहीसाठी घातक.

ठाकरे गटाचा दावा फेटाळला

पक्षप्रमुख कुणालाही पक्षातून काढू शकत नाहीत. राष्ट्रीय कार्यकारिणीशी चर्चा करणे आवश्यक. पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावा फेटाळला.

पक्षप्रमुखांचे मत अंतिम नाही

पक्षप्रमुखाचे मत अंतिम याच्याशी सहमत नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांचे मत पक्षाचे मत असू शकत नाही. पद रचनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम.

पदांच्या रचनेवर प्रश्नचिन्ह

२०१८ च्या घटनेनुसार पदांची रचनेतून कोणता गट खरा पक्ष हे निश्चित सांगता येणार नाही. ही रचना घटनेनुसार नव्हती.

पदांच्या रचनेबाबत माहिती

शिवसेना पक्षप्रमुख हे पद सर्वोच्च असेल असे २०१८ च्या घटनेत नमूद करण्यात आले आहे. पण त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च असेल असेही म्हटले आहे. २०१८ च्या पदाच्या रचना नार्वेकरांनी वाचून दाखवली.

यादिवशी अधिकृत दोन गट पडल्याची नोंद

२१ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडले. पण २२ जून २०२२ रोजी शिवसेनेत दोन गट पडल्याचे विधिमंडळ सचिवालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. खरी शिवसेना कुणाची हे ठऱवण्याचा अधिकार मला.

२०१८ मध्ये निवडणुका झाल्या नाहीत

२०१८ मध्ये पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे सुधारित पदांची रचना ग्राह्य धरले जाणार नाही.

युक्तीवादाची माहिती

शिवसेना कुणाची, यावर दोन्ही गटांकडून करण्यात आलेल्या युक्तीवादाची माहिती नार्वेकरांकडून दिली जात आहे.

१९९९ ची घटनाच मान्य

१९९९ साली निवडणूक आयोगाकडे दाखल झालेली शिवसेनेची घटना मान्य करण्यात आली. उद्धव ठाकरे गटाकडून देण्यात आलेली सुधारित घटनेची माहिती आयोगाकडे नाही. दोन्ही गटांकडून घटना मिळाली नाही. - राहुल नार्वेकर

२०१८ ची घटनादुरूस्ती मान्य केली नाही

शिवसेनेने २०१८ मध्ये घटनेत केलेली सुधारणा अमान्य करत निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली घटनाच गृहित धरली. हीच शिवसेनेची खरी घटना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केलं. निवडणूक आयोगाकडून घटना मिळवण्यात आली.

शिवसेनेच्या घटनेचा विचार

शिवसेनेच्या २०१८ च्या घटनेतील बदलाचा विचार करण्यात आला. निवडणूक आयोगाचा निकाल आणि पक्षाची घटना विचारात घेऊन निकाल. विधिमंडळातील बहुमताचाही विचार. - राहुल नार्वेकर

पक्ष कुणाचा?

सुभाष देसाई विरूध्द महाराष्ट्र शासन या याचिकेवर पहिला निकाल. शिवसेना पक्ष कुणाचा याबाबत नार्वेकरांनी पहिला निकाल दिला. दोन गट पडल्यानंतर पक्ष कुणाचा, व्हीपचा अधिकार कुणाचा लागू होणार याबाबत वाचन सुरू. त्यानंतर अपात्रतेबाबत निकाल.

निकाल वाचनाला सुरूवात

राहुल नार्वेकरांनी निकाल वाचण्यास सुरूवात केली आहे. याचिकांचे सहा गट करण्यात आले आहेत. सुरूवातीलाच सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार.

निकालाची प्रतिक्षा...

आज दूपारी 4.30 वाजता राहुल नार्वेकरांकडून निकालाचे वाचन सुरू केले जाणार होते. पण 4.50 वाजूनही अद्याप नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये आलेले नाहीत. महाराष्ट्र विधानसभेच्या यु ट्युब चॅनलवरून थेट प्रक्षेपण होणार आहे.

सेंट्रल हॉलमधून निकाल होणार जाहीर

शिंदे व ठाकरे गटाचे आमदार सेंट्रल हॉलमध्ये. वरिष्ठ अधिकारी, दोन्ही गटाचे वकीलही उपस्थित. निकालाचे थेट प्रक्षेपण

ठाण्यात पोलिस अलर्टवर

अपात्रता निकालाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातही पोलिस अलर्टवर आहेत. आनंद आश्रमाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आमचं पुढचं पाऊल जोरदार - तेजस ठाकरे

निकाल काहीही लागू द्या आमचं पुढचं पाऊल जोरदार असेल, अशी सूचक प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी निकालाआधी दिली आहे.

अनुराग ठाकूर फडणवीसांच्या भेटीला

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. सागर बंगल्यावर दोघांची बैठक सुरू.

नार्वेकरांच्या बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शिवगिरी बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवली. थोड्याच वेळात नार्वेकर करणार निकाल जाहीर.

दोन सत्ताधारी आमदारांनी सांगितलं निकाल विरोधात जाणार - वैभव नाईक

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार गट आणि शिंदे गटातील प्रत्येकी एका आमदार मला भेटले. त्यांनी तुम्ही अपात्र ठरणार असल्याचे सांगितल्याचा दावा नाईक यांनी केला आहे. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता राहिली नाही, असेही नाईक म्हणाले.

निकाल लाईव्ह पाहता येणार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून जाहीर केला जाणार निकाल आज लाईव्ह पाहता येणार आहे. निकालाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. विधिमंडळाकडून याबाबतची तयारी सुरू आहे. नार्वेकर सकाळीच विधानभवनात दाखल.

MLA Disqualification Result : आजही व्हीप त्यांना लागू - मुख्यमंत्री

आजही त्यांना व्हीप लागू आहे. त्यामुळे निकाल आमच्याबाजूने लागायला हवे. आमच्याकडे ५० आमदार आहेत. बहुमतावर निवडणूक आयोगाने आम्हाला मूळ पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. धनुष्यबाण आम्हाला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील पॅरा 204 त्यांनी वाचायला हवा. त्यानुसार नार्वेकरही आम्हाच्या बाजूने निकाल देतील. काही जण आम्हाला बेकायदेशीर म्हणतात. पण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना पराभव दिसत असल्याने आरोप करत आहेत. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी मांडलं लॉजिक

शिवसेना पक्ष म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिली. निकाल आल्यानंतर अधिकृत भूमिका मांडू. नार्वेकर हे आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील काही कामे होती. त्यासाठी अधिकाऱ्यांसोबत अधिकृत आमची बैठक झाली. त्यामुळे त्यांच्या बोलण्यात काही तथ्य नाही. बहुमत आमच्याकडे असल्याने आमचाच पक्ष अधिकृत आहे. मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे, कारण पक्ष आम्ही आहोत, धनुष्यबाण आमच्याकडे आहे. मॅचफिक्सिंग झाली असती तर रात्री गाठीभेठी झाल्या असत्या. - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुपारी तीन वाजता आमदार बाळासाहेब भवनात...

शिंदे गटाच्या आमदारांना दुपारी तीन वाजता बाळासाहेब भवनात बोलावलं. सर्वजण एकत्रितपणे निकालासाठी विधानभवनात जाणार.

MLA Disqualification Result : जो निकाल येईल तो मान्य - दीपक केसरकर

सत्याचा नेहमी विजय होतो. कायद्याच्या चौकटीत राहूनच निकाल दिला जातो. मंत्रिमंडळ बैठक आणि निकालाचा काहीही संबंध नाही. साडेचार वाजता पक्षाच्या कार्यालयात आम्ही सर्वजण एकत्र येऊ. जो निकाल येईल, तो मान्य करायचा. आमच्या विरोधात निकाल गेला तर अपील केले जाईल. देशाप्रमाणे पक्षातही लोकशाही. - दीपक केसरकर

MLA Disqualification Result : नार्वेकरांनी पदाची बदनामी करू नये - आदित्य ठाकरे

पक्षासाठी नव्हे तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे. नार्वेकरांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये, संविधानानुसार निर्णय द्यावा. संविधानानुसार 16 आमदार अपात्र झालेच पाहिजेत. - आदित्य ठाकरे

MLA Disqualification Result : घटनेनुसार निकाल दिल्यास...

घटनेनुसार निकाल दिल्यास शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतील, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

MLA Disqualification Result : संजय गायकवाड यांची राऊतांवर टीका

संजय राऊतांना कायदा कळत नाही. पागल अवलाद आहे. मनात येईल त्याप्रमाणे नालायक माणूस बकवास करत असतो - आमदार संजय गायकवाड

MLA Disqualification Result : निकालाआधी राहुल नार्वेकरांचं सूचक विधान...

सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारावर कायद्याला धरून निकाल असेल. दहाव्या परिशिष्टातील काही बाबींचाही निकालात आढावा घेण्यात आला असल्याने बेंचमार्क ठरेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल, असे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

MLA Disqualification Result : मॅच फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा आरोप

आमदार अपात्रतेच्या निकालाचे मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. विधानसभा अध्यक्ष आज केवळ औपचारिकता म्हणून निकाल जाहीर करणार असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

MLA Disqualification Result : शिंदे की ठाकरे?

MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला काही तास शिल्लक राहिले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी 4 वाजता अंतिम निकाल देणार आहेत. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Shivsena MLA Disqualification Result in Marathi)

MLA Disqualification Result : शिंदे गटातील या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

1. एकनाथ शिंदे, 2. अब्दुल सत्तार, 3. संदीपान भुमरे, 4. संजय शिरसाट, 5. तानाजी सावंत, 6. यामिनी जाधव, 7. चिमणराव पाटील, 8. भरत गोगावले, 9. लता सोनवणे, 10. प्रकाश सुर्वे, 11. बालाजी किणीकर, 12. अनिल बाबर, 13. महेश शिंदे, 14. संजय रायमूलकर, 15. रमेश बोरणारे, 16. बालाजी कल्याणकर (Shivsena 16 MLA Disqualification Case)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com