
दीपा कदम
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील पाच वर्षात राजकीय अपरिहार्यता ही वारंवार दिसून आलेली आहे. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने पहाटेची शपथ उरकून दीड दिवसांचे सरकार स्थापन केले होते. त्यानंतरच्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथीने कळस गाठला. फोडाफोडीची एकापाठोपाठ एक श्रृंखलाच तयार झाली.
पक्ष स्थापनेपासूनच काँग्रेस विरोधात राजकारण करणाऱ्या शिवसेनेने 2019साली चक्क महाविकास आघाडीत सामील होत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जुळवून घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ स्थापन केली. अजित पवार यांनी 2023मध्ये शरद पवारांचा हात सोडून ‘राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार’ पक्ष स्थापन करत भाजपसोबत सत्तेत गेले. आता याच ‘अपरिहार्यतेच्या’ श्रृंखलेतला पुढचा टप्पा म्हणजे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या शक्यतेची चाचपणी आहे.
उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. जर अटीशर्ती मान्य झाल्या, तर हे दोघे एकत्र येतील, अशी दाट शक्यता आहे. यापूवी जे काही झाले ते विसरून भविष्यात गुण्यागोविंदाने एकत्र राहण्याविषयी शिवसेना आणि मनसेत विचार चालू आहे. राजकारणात भूतकाळात घडलेल्या गोष्टी पटकन विसरून जाण्यासाठी ‘अपरिहार्यता’ हे सबळ कारण आहेच. समान वैचारिक पातळीवर असणाऱ्या भाजपचा (BJP) हात सोडून शिवसेना काँग्रेससोबत जावू शकते, तर मग मनसे हा तर उजव्या विचारसरणीचा शिवसेनेला अधिक जवळचा पक्ष आहे. वैचारिकदृष्ट्या शिवसेनेला मनसे जवळची वाटतेच. जमिनीवर लढणाऱ्या शिवसैनिक आणि मनसैनिकात ‘दिलजमाई’साठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत. मात्र इथे प्रश्न सैनिकांचा नसून दोन नेत्यांचा आहे. हे दोन्ही पक्ष एकखांबी, एका नेत्याच्या खांद्यावर उभे आहेत. सर्वसाधारण माणसांप्रमाणे षडरिपूंच्या काही अवगुणांची लागण त्यांनाही झालेली आहे. षडरिपूंवर मात करण्यास ठाकरे बंधू यशस्वी झाले, तर या युतीची गाडी भरधाव सुटू शकते. पण त्यात बरेच अडसर आहेत. ते कोणते?
भूतकाळात घडलेल्या घटना विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असला, तरी शिवसेना पक्षाचे नेतृत्व कुणी करायचे या प्रश्नाचे उत्तर बाळासाहेबांनी ते हयात असताना ‘उद्धव’ असे दिले होते. त्यानंतर कुणाच्या नेतृत्वाखाली काम न करता स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे ठरवून राज ठाकरेंनी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (MNS) स्थापन केली होती. ज्याकडे भूतकाळ म्हणून पाहिले जात आहे तोच वर्तमान घेऊन हे दोन्ही पक्ष आजही उभे आहेत. नव्हे तीच त्यांची ओळख बनली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत जाताना शिवसेनेने किमान समान कार्यक्रमाच्या आधारे आघाडी केली गेली, त्याच धर्तीवर मनसेसोबत अटीशर्थींसह युती करणार का, हा प्रश्न आहे. अशा प्रकारच्या युत्या, आघाड्या या तत्कालीक असतात. त्या निवडणुका आणि सत्ता डोळ्यासमोर ठेवून केल्या जातात. त्यात वावगं असं काहीच नसतं. पण इथे पाठीला पाठ लावून वाढलेले दोन भाऊ एकत्र येतायत. त्यांच्यातली युती ही कितपत ‘प्रोफेशनल’ राहिल0 दोन पक्ष एकत्र आले तर ती युती पुढे जाण्यास वाव आहे, परंतु दोन भावांमध्ये झालेल्या युतीचे यश हे मात्र काळाच्या कसोटीवरच ठरेल.
उद्धव आणि राज यांच्याकडे नेतृत्व करण्याची उपजत कला आहे. दोन्ही भावांकडे जन्मजात कलात्मक नजर आणि परिस्थितीतील व्यंग टिपण्याची नजर आहे. राजकारणात आवश्यक असणारी लवचिकता आहे, दोघांमधील व्यवस्थापनाचे कौशल्य वादातीत आहे. दोघेही कुटुंबवत्सल आहेत. पण दोघांनाही त्यांच्या पक्षाची मजबूत बांधणी करणे आणि पक्षाचा विस्तार कायम ठेवणे जमलेले नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे नेत्यांची एक फौज होती. त्यांच्याकडे पक्षाच्या शाखा बांधणींचाही अनुभव होता. हे नेते व्यासंगी देखील होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या दोन हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे काही नेते सोडले आणि राज ठाकरेंकडे एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या नेत्यांव्यरिक्त बाकी मोकळ माळराण दिसतं. त्यामुळे मुंबई सोडली तर या दोन्ही नेत्यांना पक्ष बांधणी आणि विस्ताराबाबतच्या मर्यादा आहेत. शिवाय सभा असल्याशिवाय देखील स्वत: जिल्ह्या जिल्ह्यांत फिरून पक्ष बांधणी करावी लागते हे या दोन्ही ठाकरे बंधूच्या गावीही नाही. राजकारण हे दिवसाचे चोवीस तास आणि आठवड्याचे सातही दिवस करण्याचा प्रकार आहे याचे धडे ठाकरे बंधुंना शरद पवार किंवा भाजपकडे पाहून शिकावे लागेल.
तुफान गर्दी खेचणारे राजकीय भाषण करण्यात राज ठाकरेंचा हातखंडा आहे. तर उद्धव ठाकरे यांची काही भाषणं सोडली, तर बरीचशी तीच ती आणि रटाळ असतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे राजसारखी अमोघ वक्तृत्वशैली नसली तरी, भाषणातून टोमणे आणि हजरजबाबीपणामुळे विरोधकांना ते घायाळ करत असतात. अशा परिस्थितीत शिवसेना-मनसे युती झालीच, तर सभांमध्ये शेवटचे भाषण राज करणार की उद्धव, हा प्रश्न असेल.
दोन्ही ठाकरे बंधुंचा डोळा हा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर आहे, हे स्पष्ट आहे. असे असले तरी दोघांचे मुख्य लक्ष्य हे मुंबई महापालिका निवडणूक हेच आहे. विधासभा निवडणुकीत शिवसेना- उद्धव ठाकरे पक्षाला 9.96 टक्के तर मनसेला 1.55 टक्के मते पडली होती, हे वास्तव आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हिताच्या आणाभाका सध्या घेतल्या जात असल्या तरी शिवसेना - मनसेसाठी या निवडणुकीत मुंबईचे रिंगणच महत्वाचे आहे. सध्या शिवसेना- ठाकरे गटासाठी शिवसैनिकांची मते विभाजन करणारा पक्ष हा शिंदेंची शिवसेना आहे. त्यामुळे मनसे सोबत आली तर शिंदेंना रोखण्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच होवू शकतो. विधानसभेत मनसेचा एकही आमदार नसताना सुद्धा दोन्ही शिवसेनेला मनसेची भूरळ पडण्याचे ते एकमेव कारण आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे हा ‘डार्क हॉर्स’ आहे. मात्र शिवसेना शिंदेंची आणि मनसेचे रिमोट कंट्रोल हे केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या हातात आहे, हे विसरूनही चालणार नाही.
एका म्यानात दोन तलवारी बसत नाही हे इतिहासात आणि पुराणातही सिद्ध झालेलंच आहे. एकमेकांना सांभाळून घेऊन युती करून शिवसेना-मनसेला एका म्यानात बसण्याचा प्रामाणिक प्रयत्न दोन्ही ठाकरे बंधू करतीलही. पण तत्पूर्वी दोघांनाही वारंवार एकमेकांची नियत तपासत पुढे जावं लागणार आहे.
यापुढच्या काळातही राजकीय अपरिहार्यता म्हणूनच अटीशर्थींसह सूर जुळवण्याचा प्रयत्न होईल. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणे, शिवसेना ठाकरे आणि मनसे युती होणे या घडामोडी घडत असताना आपली जमीन राखण्यासाठी एकनाथ शिंदेंना भाजपचे शेपूट घट्ट पकडून ठेवण्याची धडपड करणे अशाप्रकारच्या उलटसुलट युती - आघाड्यांची अपरिहार्यता महाराष्ट्राच्या जनतेला स्वीकारावी (सहन) करावी लागणार, हे स्पष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.