

राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, अद्याप सुमारे 3000 शाळांनी आवश्यक माहिती शिक्षण विभागाकडे सादर केलेली नाही. यामध्ये माध्यमिक विभागातील जवळपास 2500 आणि खासगी प्राथमिक शाळांपैकी सुमारे 500 शाळांचा समावेश आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने कठोर भूमिका घेतली असून, ठराविक मुदतीत माहिती न दिल्यास संबंधित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन मार्चपासून रोखले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सध्या शाळांची संचमान्यता ही पटसंख्येच्या आधारे केली जात आहे. 15 मार्च 2024 रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयानुसार संचमान्यता पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. त्यानंतर खासगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. याच कालावधीत राज्यातील जिल्हा परिषदांच्या 65000 शाळांतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्ह्यांतर्गत बदल्याही पार पडतील. या सर्व प्रक्रिया 15 जूनपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
मात्र, अनेक शाळांनी अद्याप अनुदानाचा प्रकार, शाळेचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदांची संख्या तसेच सध्याची विद्यार्थी पटसंख्या याबाबतची माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे संचमान्यतेची प्रक्रिया रखडण्याची शक्यता आहे. शिक्षण संचालकांनी संबंधित शाळांना तातडीने माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. या आठवड्यातही माहिती न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय अंमलात आणला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सुमारे 17000 शाळांपैकी जवळपास 2500 शाळांची माहिती अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व संस्थांना अंतिम सूचना दिली आहे. वेळेत माहिती सादर न केल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
दरम्यान, नववी व दहावीच्या वर्गांसाठी किमान 20 विद्यार्थ्यांची अट कायम ठेवण्यात आली आहे. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयानुसार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या वर्गांना किंवा शाळांना मान्यता मिळणार नाही. ही अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र न्यायालयाने शासनाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे 20 किंवा त्यापेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या वर्गांनाच पुढे मान्यता दिली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.