

Mumbai News: राज्यात विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. सततच्या हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा भार आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अजूनही संकटात सापडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांना प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारकडून कृषी विभागाद्वारे राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स आत्महत्येस कारणीभूत घटकांचा अभ्यास करणार आहे. यासाठी स्वतंत्र ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे.
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी या निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे अभ्यास करण्याचा उद्देश या टास्क फोर्सचा आहे. या टास्क फोर्सच्या कामकाजाला मानवी संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळेल, अशी आशा सरकारला आहे.
विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी हे या या टास्क फोर्सचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन सुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यनित शितोळे आणि सोनाली शिळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत विविध विभागांचा समन्वय साधून काम केले जाणार आहे.
शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना आधीच सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणे आणि मानसिक आधार देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले.
या टास्क फोर्समध्ये सरकारी अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर थेट काम करण्याचा अनुभव असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचा यात समावेश आहे. ‘शिवार फाऊंडेशन’मधील कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुष्टी डोईजड हे विशेष सदस्य आहेत.
आपत्तीपूर्व तयारी, आपत्तीच्या काळातील तातडीच्या उपाययोजना आणि आपत्तीनंतरच्या पुनर्वसनासाठी विशेष कृती कार्यक्रमाची निर्मिती करणे आहे.
शेतीचे तंत्रज्ञान, आर्थिक साहाय्य, सामाजिक आधार आणि मानसिक आरोग्यावर आधारित एकात्मक पद्धती विकसित करणे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या घटकांचा अभ्यास आणि संशोधन करणे.
हवामान बदलामुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेत त्यावर उपाय योजना सुचवणे.
विभागीय आणि जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करणे.
विविध शासकीय, निमशासकीय आणि स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधासाठी धोरणात्मक उपयोजना करणे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.