Akola News : राजकारणातील युवा नेते आदित्य ठाकरे, सुजात आंबेडकर हे त्यांच्या लाईफ स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात. हे दोघेही युवा पिढीचे आयकॉन आहेत. त्यामुळेच त्यांच्या लाईफ स्टाईलची चर्चा युवा पिढीत मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे नेहमीच आदित्य व सुजात यांच्या लग्नावरून चर्चा रंगत असते. या दोघांचे लग्न कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
गेल्या काही दिवसापासून मीडियात सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या लग्नाची चर्चा मात्र जॊरात सुरु आहे. अभिनेते संदीप कुलकर्णी आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची मुलाखत घेतली. या मुलाखतीवेळी प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकरही उपस्थित होत्या. यावेळी सुजात आंबेडकर यांनी त्यांच्या लग्नाबाबत भाष्य केले आहे.
यावेळी अभिनेते संदीप कुलकर्णी, दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी वर्ष 2024 मध्ये सुजातसाठी 'यंदा कर्तव्य आहे' का? असा प्रश्न या मुलाखतीदरम्यान विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना सुजात आंबेडकर म्हणाले, 'माझ्यासमोर पहिलं कर्तव्य अकोला लोकसभेचं आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं न थकता आतापर्यंत आई-बाबांनी उत्तरं दिले आहेत. त्यामुळेच मी घडू शकलो.' असे स्पष्ट केले.
मतदार संघातील गाठीभेटीवर दिला भर
यावेळी सुजात आंबेडकरांनी (Sujat Ambedkar) लग्नापेक्षा लोकसभा निवडणुकीला महत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता त्यांचे 'यंदा तर कर्तव्य नाही' असेच म्हणावे लागेल. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी त्यांनी सुरु केली असून गेल्या काही दिवसापासून सुजात आंबेडकरांनी अकोला लोकसभा मतदार संघातील गाठीभेटीवर भर दिला आहे. त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत वातावरण निर्मिती आतापासूनच सुरु केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी मुलाखतीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अंजली आंबेडकर म्हणाल्या, "ज्या दिवशी वंचित घटकातील महिला मुख्यमंत्री बनेल तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत आनंदाचा दिवस असेल". याप्रसंगी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) व त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनीही अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
(Edited By Sachin Waghmare)