

Municipal elections Maharashtra : मुंबईत महापालिका निवडणुकीसाठी युती करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नव्याने प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महापालिका निवडणुकीत जागावाटपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरात योग्य वाटा मिळावा, अशी मागणी करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 29 महापालिकांच्या निवडणुका महायुतीतून लढायच्या आहेत. त्यासाठी तटकरे यांची नुकतीच भाजपचे प्रभारी आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी चर्चा झाल. ते आता मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटणार आहेत. महायुतीचा पुढील आराखडा निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक होणार असून या बैठकीत 29 महापालिकांसाठी धोरण निश्चित करून महायुतीचे सर्व घटक एकत्र लढतील, या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
‘‘ज्या ठिकाणी एखादा पक्ष सत्तेत आहे, तिथे अधिक जागांची मागणी होणे स्वाभाविक आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस चर्चा करून समन्वयाने मार्ग काढण्यास तयार आहे, ’’ असे तटकरे यांनी सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून मुंबई महापालिका तसेच अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या प्रभारी नेत्यांच्या संपर्कात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्ह्णूनच निवडणूक लढविण्याच्या बाजूने असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
पक्षाध्यक्ष अजित पवार प्रत्यक्ष परिस्थितीवरील अहवालांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात तटकरे आणि पटेल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागाबाबत चर्चा केली होती. या निवडणुका महायुती म्हणूनच लढाव्यात, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय गृहमंत्र्यांनी मांडली असून त्याबाबत महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वालाही त्यांनी सूचना दिल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तटकरे यांनी समन्वयक, शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याने युतीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शुक्रवारच्या बैठकीस विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि ठाणे-मुंबई विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली आदी प्रमुख शहरांतील नेत्यांनी स्थानिक राजकीय परिस्थितीचे अहवाल यावेळी प्रदेशाध्यक्षांकडे सादर केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.