Onion Export ban Issue : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निर्णयावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून टीका सुरू आहे, तर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय झाला असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांदा निर्यातबंदी संदर्भात केलेल्या एका ट्विटवरून त्यांच्यावर टीका करत, त्यांना आकडेवारी जाहीर करण्याचं आव्हान दिलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी 'कांद्याची निर्यातबंदी उठविली हे खरे असेल, तर त्यासंदर्भातील अधिकृत 'नोटिफिकेशन' अजून का निघाले नाही? जर हे खरे असेल तर गेल्या दोन दिवसांत आतापर्यंत किती टन कांद्याची निर्यात झाली, याची आकडेवारी जाहीर करा,' असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे.
याशिवाय 'केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी मागे घेतल्याचा किंवा अंशतः खुली केल्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, हे आता पूर्णतः स्पष्ट झाले. जर प्रशासकीय अधिकारी कांदा निर्यातबंदी मागे घेतल्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे निःसंदिग्धपणे सांगत असतील, तर या सरकारमधील मंत्री कोणत्या आधारावर निर्यातीला परवानगी दिल्याचा निर्णय झाल्याचे सांगत होते ? याचा अर्थ स्पष्ट होतो की, मंत्री महोदयांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची सपशेल फसवणूक केली. हे अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे,' असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे.
'सरकारने 8 डिसेंबर 2023 रोजी अतिशय अन्यायकारकरित्या निर्यातबंदी लागू केली होती. यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा लाखो टन कांदा आज शिल्लक आहे. जो देशांतर्गत गरज भागवूनदेखील शिल्लक राहू शकतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याला मागणी होती, तेव्हा भाजपने केवळ निवडणुकांचे लाभ डोळ्यांसमोर ठेवून शेतकऱ्यांचा कांदा बाहेर जाऊ दिला नाही. ही निर्यातबंदी मागे घ्यावी, यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव एकजुटीने लढत आहेत,' असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
याखेरीज 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही सर्वांनी संसदेत आवाजदेखील उठविला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारे भाजप सरकार शिवरायांना विसरले आहे. शिवरायांनी 'रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये,' अशी आज्ञा आपल्या लष्कराला दिली होती. भाजप एकीकडे शिवाजी महाराजांचा जयघोष करते आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांना कंगाल करणारे निर्णय घेत आहे.'
केंद्र सरकारला शिवरायांबद्दल आस्था आणि शेतकऱ्यांबद्दल थोडीही तळमळ वाटत असेल, तर त्यांनी निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय तातडीने घ्यावा. नमूद करण्याची बाब म्हणजे कांद्याच्या बाबतीतील आयात-निर्यात धोरणात गेल्या काही वर्षांत भाजप सरकारने केलेल्या धरसोडीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, हे नुकसान भरून येण्यात बराच काळ जावा लागणार आहे,' अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
'केंद्र सरकारचे कोटी कोटी आभार! कांदा निर्यातीवरील बंदी उठविल्याबद्दल केंद्र सरकारचे मनःपूर्वक आभार! कांदा उत्पादकांच्या विविध प्रश्नांबाबत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पीयूष गोयल यांच्या सातत्याने संपर्कात होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,' असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी केलेलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.