

Maharashtra municipal elections : राज्यातील 24 नगरपालिका तसेच विविध 76 नगरपालिकांमदील 154 जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान शेवटच्या टप्प्यात असताना, दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका वेगवेगळ्या कारणास्तव गाजल्या.
मतदानाचा फुटलेला भाव, बोगस मतदार, ईव्हीएम मशीन बंद पडणे, बोगस कर्मचारी, केंद्राध्यक्षांची वादग्रस्त भूमिका, राजकीय कार्यकर्त्यांमध्ये राडा, पोलिसांचा बळाचा वापर, पैसे वाटपाने ही निवडणूक चांगलीच गाजली. एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेत राजकीय राडा झाला. पोलिसांनी इथं बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी नगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्र 4/3 वर ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे मतदान प्रक्रिया रेंगाळली. अकोल्याच्या बाळापूर इथं मतदान केंद्रावरील EVM मशीन बंद पडली. जवळपास 20 मिनिट मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. बाळापूरातील कासारखेड इथल्या मतदान केंद्रावर असाच प्रकार झाला. बंद पडलेल्या मशीनमध्ये 12 जणांचं मतदान झालं होतं.
यवतमाळ नगरपालिका निवडणुकीवेळी (Municipal Elections) ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीस मिनिटांपासून मतदान बंद आहे. त्यामुळे मतदारांची मोठी रांग या ठिकाणी लागली आहे. सातारा इथल्या फलटण नगरपालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनचे बटन दबत नसल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे तात्पुरती मतदान प्रक्रिया थांबवली आणि मतदान यंत्र बदलण्याची उमेदवारांची मागणी केली. वाशिम नगरपालिका निवडणुकीवेळी ईव्हीएम मशीन बंद पडले. ईव्हीएम मशीन 30 मिनिट बंद होती.
अंबरनाथमध्ये 208 संशयित बोगस मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केली. अंबरनाथ पोलिसांनी या बोगस मतदारांना पोलिस ठाणे परिसरातील इमारतीत ठेवलं होतें. सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्ड तपासले जात होते. हे नागरिक मतदानासाठी आले होते का? कोणासाठी मतदान करणार होते, याची चौकशी पोलिस करत होते. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री 200 बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. तसंच भिवंडीवरून आलेले नागरिक कोसगाव परिसरातील सभागृहात आढळले. चौकशीनंतर मतदान प्रक्रियेशी संबंध सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. भाजपकडून पैसे वाटल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आला. त्यामुळे अंबरनाथच्या मातोश्रीनगर परिसरात तणाव होता. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोर आल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला. त्यामुळे परिसरात चांगलीच पळापळ झाली.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी प्रभाग क्रमांक 29 मध्ये अजब प्रकार घडला. या ठिकाणी ईव्हीएम मशीन घेऊन येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेच बोगस ओळखपत्र सापडले. या ठिकाणी evm मशीन बंद पडल्यामुळे दुसरे मशीन मागवण्यात आले. मात्र जे कर्मचारी मशीन घेऊन आले, त्यांच्या ओळखपत्रावर फोटो आणि नाव तसंच सही, शिक्का देखील नव्हता. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.
नांदेडच्या धर्माबाद नगरपालिका निवडणुकीत एका आमदाराने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवण्याचा प्रकार उघडकीस आला. इनानी मंगल कार्यालयात जवळपास हजार ते दीड हजार मतदारांना डांबून ठेवलं होतं. मतदारांना पैशाचे आमिष दाखवून, डांबल्याचा आरोप आहे. मतदारांना डांबून ठेवल्याचा प्रकार हा लोकशाहीची हत्या असून आमदार आणि आमदारांच्या पत्नीला धर्माबाद मधून हद्दपार करा, अशी मागणी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी केली.
नांदेडच्या धर्माबाद नगरपालिका निवडणुकीतील एका मतदान केंद्रावर महिलेला बोगस मतदान करताना काही महिलांनी पकडले. तेलंगणातील मतदार आणून धर्माबादमध्ये मतदान केल्याचा गंभीर आरोप झाला. बोगस मतदान करणाऱ्या महिलेला धर्माबाद मधल्या स्थानिक महिला उमेदवारांनी दिला चोप दिला. यामुळे मतदान केंद्रावर पळापळ झाली.
अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा दोन्हींकडून आरोप झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजू्च्या प्रतिनिधींनी मतदान केंद्रापासून दूर केले. भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि राष्ट्रवादी आमदार आशुतोष काळे यांनी मतदान केंद्रावर धाव घेतली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिका निवडणुकीवेळी अभिनेता सोनू सूद साईसमाधीचं दर्शन घेऊन, मित्र विनोद राक्षे यांच्या भेटीसाठी थेट कोपरगाव इथं पोहोचला. विनोद राक्षे यांच्या पत्नी सुरेखा राक्षे या नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहेत. सोनू सूद याने मतदान केंद्राजवळ जाऊन राक्षे पती पत्नीची भेट घेतली. मी शिर्डीत आल्यावर राक्षे कुटुंबियांच्या भेटीला येत असतो, आज योगायोगाने इथं मतदान पार पडत असल्याची प्रतिक्रिया सोनू सूद याने दिली.
वाशिम नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार सतीश वानखेडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रवीण इढोळे यांच्यात रात्री वाद झाला होता. पण पुन्हा भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर येऊन अधिक वाद उफळला. यात सतीश उर्फ गल्ला वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र भाजपचे आमदार शाम खोडे यांनी सतीश वानखेडे याला पोलिस वाहनातून बाहेर घेतल्याने आमदार श्याम खोडे अन् पोलिसांमध्ये वाद झाला. आमदार खोडे यांना मतदान केंद्राबाहेर काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वसमत नगरपालिका निवडणुकीत पांढऱ्या पिशव्यामधून पैशांचे वाटप करत, मतदारांना प्रसन्न करण्याचा सत्ताधारी नेत्यांचा प्रयत्न असल्याचं समोर आलं. माजी मंत्री जयप्रकाश दांडेकर यांनी हा आरोप केला. मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर जयप्रकाश दांडेगावकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे यांचे नाव न घेता आरोप केला.
हिंगोलीत निवडणूक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून निमयांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आला. मतदान केंद्र सोडून मतदान केंद्राध्यक्ष थेट बाहेर पडले. निवडणूक आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने मतदान केंद्राध्यक्षासह कर्मचाऱ्यांवरही कारवाई होणार, असे सूत्रांनी सांगितले. निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.