Santosh Parmeshwar Joins BJP : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने इतर पक्षातील लोकांना पक्षात घेण्याचा धडाका लावला आहे. अशातच काल तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असणारा आरोपी आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर याचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला आहे.
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात संतोष परमेश्वरने त्याच्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला. मात्र, ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीला पक्षात घेतल्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
अशातच आता याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहित तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशा संदर्भात तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात लिहिलं की, 'तुळजापूर शहरातील काही जणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले.
यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल, असं त्यांनी लिहिलं आहे.
तर यावेळी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना उद्देशून, आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित असल्याचं म्हटलं आहे.
तर समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते. तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा आहे.
असं लिहित सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला कोंडीत पकडल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता कालच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष परमेश्वरवर भाजप काही कारवाई करणार की त्याच्यावरील आरोपांकडे दुर्लक्ष करून त्याला पक्षातच ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.