Mumbai News : लोकसभा निवडणुकीत अनेक ज्येष्ठ नेत्यांना पराभव सहन करावा लागला. त्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्याचा सहभाग आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सर्वाधिक 21 जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणूक लढली होती. त्यापैकी केवळ 9 जागांवरच विजय मिळवता आला. दुसरीकडे ठाकरे गटाच्या 12 उमेदवारांचा पराभव झाला. या पराभूत उमेदवारांनी शनिवारी मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) 12 उमेदवारांचा पराभव झाला. या 12 मतदारसंघात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला. केवळ रायगडमधील एका जागेवर अजित पवारांच्या (Ajit pawar) राष्ट्रवादीचे सुनील तटकरे विजयी झाले. (Uddhav Thackeray News )
लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेला (Shivsena) 9 जागा मिळाल्या. मात्र, उद्धव ठाकरेंचे दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. यामध्ये विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अनंत गिते यासारख्या ज्येष्ठ मंडळींचा समावेश होता. त्यामुळे या पराभवाचं विवेचन 'मातोश्री'वर होत आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गिते, औरंगाबादचे पराभूत उमेदवार चंद्रकांत खैरे, रत्नागिरी सिंधुदुर्गचे पराभूत उमेदवार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांचा समावेश आहे.
सांगलीचे पराभूत उमेदवार चंद्रहार पाटील हे सुद्धा मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी ठाकरेंची भेट घेत पराभवाची कारणे सांगितली. दरम्यान, या बैठकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या पद्धीतीने विश्लेषण केले आहे. त्यामुळे येत्या काळात ठाकरे गटाचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी रणनीती आखली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत सर्वच मुद्द्यावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.