एरंडोल : तालुक्यातील दौलतपुरा येथील पद्मालय साठवण तलाव क्रमांक दोन व उपसा सिंचन कामासाठी सुमारे ३७१ कोटी रुपये खर्चाच्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांनी दिली. यापूर्वी अंजनी मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी २३२ रुपये खर्चाच्या सुधारित प्रस्तावास देखील मंजुरी मिळाली असल्यामुळे पंधरा दिवसात सिंचनासाठी कामांसाठी सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. (Newly form Eknath Shinde sanctions funds for irrgation projects)
एरंडोल आणि धरणगाव तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचाखाली येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, अंजनी प्रकल्प आणि पद्मालय साठवण तलावासाठीच्या कामांसाठी निधी उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
पदमालय साठवण तलाव दोन व उपसा सिंचन योजना दौलतपुरा येथे प्रस्तावित आहे. दौलतपुरा येथे धरण बांधून त्यात या योजनेंतर्गत गिरणा नदीवरील दहिगाव बंधाऱ्यातून पावसाळ्यात वाहून जाणारे पुराचे पाणी एम.एस. पाईपाच्या रायझिंग मेनद्वारे उपसा करून पद्मालय तलावात पाण्याचा साठा करण्यात येणार आहे. तलावात सुमारे ७०.३६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होणार आहे. या तलावातून दोन प्रकारे सिंचन करणे प्रस्तावित आहे. यामध्ये एरंडोल तालुक्यातील १६ गावातील ३ हजार ५३३ हेक्टर तर धरणगाव तालुक्यातील सतरा गावातील ५ हजार ४६७ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
बंदिस्त वितरण प्रणालीद्वारे तालुक्यातील नागदुली, खेडगाव, खडके बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, चोरटक्की, वरखेडी आणि धरणगाव तालुक्यातील पथराड खुर्द आणि बुद्रुक, शेरी या गावाना सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गिरणा प्रवाही कालवा स्थैर्यीकरणाद्वारे तालुक्यातील खर्ची बुद्रुक, रिंगणगाव, दापोरी, खेडी खुर्द, वैजनाथ, रवंजे, पिंपळकोठा प्र.चा., सावदे, कढोली, खर्ची खुर्द तर धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द आणि बुद्रुक, टाकळी, खुर्द आणि बुद्रुक, भोकणी, वंजारी, आव्हाणे, एकालग्न, लाडली, धार, दोनगाव, फुलपाट, चांदासार या गावातील सुमारे नऊ हजार हेक्टर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार चिमणराव पाटील यांची त्यांचे आभार मानले.
या कामांसाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्चाच्या योजनेस देखील प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत शहरातील सर्व भागात नवीन पाईपलाईन टाकून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. आगामी काळात मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले. या वेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, चिंतामण पाटील, आनंदा चौधरी (भगत) यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
---
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.