Nagar Urban Bank News : नगर अर्बन सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेला कर्जदार उद्योजक अविनाश वैकर याने धक्कादायक माहिती तपासी अधिकाऱ्यांसमोर दिली आहे. मंजूर करण्यात आलेल्या कर्जातून भाजपचे दिवंगत माजी खासदार तथा बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख स्वरूपात २० लाख आणि बॅंक अधिकारी घनश्याम अच्युत बल्लाळ ऊर्फ हेमंत याला कर्ज मंजुरीसाठी दहा लाख रुपये दिल्याचे कर्जदार वैकर याने म्हटले आहे. या माहितीमुळे नगर अर्बन बॅंक गैरव्यवहारप्रकरणाची पाळेमुळे कितपत खोलवर आहेत, याची चर्चा रंगलीय.
नगर अर्बन बॅंक गैरव्यवहार प्रकरणात उद्योजक कर्जदार अविनाश वैकर याला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. न्यायालयाने सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. नगर अर्बन बॅंकेतील २९१ कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळ्याचा तपास नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत पोलिसांनी माजी अध्यक्ष, तीन संचालकांसह दहा जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी या गैरव्यवहारात उद्योजक अविनाश वैकर याला अटक केली. पोलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. वैकर याने बॅंकेकडून त्याच्या एव्हीआय इंजिनिअरिंग वर्क्सच्या नावे व्यवसायासाठी खेळते भांडवल म्हणून २ कोटी ६७ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यातील काही रक्कम दुसऱ्या बॅंकेचे कर्ज फेडण्यासाठी, काही रक्कम स्वतःच्या नावे मुदतठेवमध्ये गुंतवली.
तसेच काही रक्कम वैयक्तिक खरेदीसाठई आणि रक्कम रोख स्वरूपात काढून कर्ज रकमेचा गैरव्यवहार केल्याचा पोलिस तपासात आढळले आहे. बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणात फाॅरेन्सिक आॅडिट करण्यात आले आहे. यात पात्रता नसताना, कर्जफेडीची ताकद नसताना आणि बॅंकेकडे तारण रकमेपेक्षा अधिक कर्ज मंजूर केल्याचा ठपका यात ठेवला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यातून वैकर याने मंजूर कर्जाच्या रकमेतून २० लाख रुपये तत्कालीन अध्यक्ष दिलीप गांधी यांना रोख स्वरूपात दिले. तसेच बॅंक अधिकारी घनश्याम बल्लाळ याला त्याच्या बॅंक खात्यावर सहा लाख रुपये आणि रोख स्वरूपात चार लाख रुपये दिल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांसमोर वैकर याने दिली आहे. याच मुद्द्याचा आधार घेत सरकारी वकील मंगेश दिवाणी यांनी पोलिसांच्या वतीने न्यायालयाकडे वैकर याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली, परंतु न्यायालयाने वैकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
Edited By : Umesh Bambare
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.