
Ahilyanagar Akole politics : आर्थिक घोटाळा, जमीन घोटाळा, नोकरभरती घोटाळा असे घोटाळ्याचे एक ना अनेक प्रकार आपण ऐकले आहेत. हे घोटाळे सुरूच आहेत. मात्र आता चक्क पक्ष प्रवेशामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्याने चक्क बोगस यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य अहिल्यानगर जिल्ह्या दौऱ्याच्या आधीच पक्ष प्रवेश घोटाळ्याच्या आरोपाने राजकीय वातावरण ढवळून निघू लागले आहे.
अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील मारुती मेंगाळ हे आदिवासी ठाकर समाजाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. मेंगाळ यांनी तीन महिन्यांपूर्वी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत ठाणे इथं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आपल्या सोबत अकोले तालुक्यातील अनेक ग्रामपंचायचे सरपंच आणि सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते असल्याचा दावा मारुती मेंगाळ यांनी यावेळी केला होता.
मारुती मेंगाळ यांच्यासमवेत पक्ष प्रवेश केलेल्यांची यादी आता समोर आली असून यातील अनेक नावे बोगस असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) खळबळ उडाली आहे. यादीत नाव असणाऱ्या अनेकांनी आपले व्हिडिओ प्रसारित करत, आपण असा पक्ष प्रवेश केलाच नसल्याचा दावा केला आहे.
यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातंर्गत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या सगळ्या प्रकारावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे शिर्डी लोकसभा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, या गोंधळावर मारुती मेंगाळ यांची प्रतिक्रिया अजून समोर आली नाही.
'मारुती मेंगाळ यांच्या पक्ष प्रवेशावेळी पक्षाने आम्हाला कल्पना दिली नाही. काही दिवसांपूर्वी पक्ष प्रवेशाची यादी समोर आल्यानंतर अनेकांनी हरकती घेतल्या. शहानिशा केल्यानंतर यादीतील 40 ते 50 लोकांची नावे बोगस असल्याचे समोर आली आहे. पक्षाची आणि वरिष्ठ नेत्यांची दिशाभूल करण्यात आल्याचं आम्ही नेत्यांना कळवलं आहे. या प्रकारामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असून वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा', असे बाजीराम दराडे यांनी म्हटले.
दरम्यान, 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिनाचे औचित्य साधून मारुती मेंगाळ यांनी अकोले इथं भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वीच मेंगाळ यांच्यावर पक्ष प्रवेश घोटाळा आणि पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप होत असल्याने अकोल्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या सगळ्या प्रकारानंतर एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.