

Shrirampur press conference : श्रीरामपूर इथल्या असलम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागीरदार याच्या हत्येनंतर त्याची 'बॉम्बस्फोटातील आरोपी' अशी खोटी प्रतिमा तयार करून जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्याचे बंधू नगरसेवक रईस जहागीरदार यांनी केला.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोणत्या पुराव्याच्या आधारे, बंटी जहागीरदार याला जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी म्हटले, असा सवालही त्यांनी केला. जहागीरदार यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत रईस जहागीरदार यांनी आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक मुजफ्फर शेख हे उपस्थित होते.
रईस जहागीरदार यांनी पत्रकार परिषदेत बंटी जहागीरदार याच्याशी संबंधित विविध न्यायालयीन खटल्याच्या निकालांचे दाखले दिले. ते म्हणाले की, "पुण्यातील (Pune) 2010च्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींमध्ये बंटी जहागीरदार याचे नाव दुरान्वयानेही नाही. तसेच, 2012 च्या जंगली महाराज रोड बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने 1 ऑक्टोबर 2015 रोजी स्पष्टपणे नमूद केले होते की, बंटी जहागीरदार याच्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे प्रथमदर्शनी दिसून येत नाहीत. असे असतानाही, अहिल्यानगर पोलिस दलाच्या एका कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री विखे पाटील यांनी त्याला आरोपी संबोधणे हे चुकीचे आणि अन्यायकारक आहे."
बंटी जहागीरदार याच्या हत्या प्रकरणाचा स्थानिक पोलिसांकडून (Police) होणाऱ्या तपासावर शंका उपस्थित करत, रईस जहागीरदार यांनी पुढे गंभीर मुद्दे उपस्थित केले. हत्येसाठी विदेशी बनावटीचे पिस्तूल वापरल्याचा संशय असून, अद्याप शस्त्र आणि वाहन जप्त करण्यात आलेले नाही. बेग टोळीवर यापूर्वी 'एमपीडीए' अंतर्गत कारवाई होणार होती. मात्र एका नेत्याच्या सांगण्यावरून ती फाईल दडपण्यात आली. तसेच बंटी जहागीरदार हत्या प्रकरणातील फिर्यादीला कोणतीही कल्पना न देता आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली, हे अनाकलनीय आहे.
"पोलिस ठाण्यामध्ये आम्ही पोहोचण्यापूर्वीच फिर्याद तयार होती. आम्ही संशयित बेग बंधूंची नावे घेतल्याशिवाय फिर्याद देण्यास नकार दिला, तेव्हा बराच वेळानंतर त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली," अशी माहिती रईस जहागीरदार व मुजफ्फर शेख यांनी पत्रकार परिषदेतील दिली.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी 'एसआयटी'मार्फत व्हावी, या मागणीसाठी जिल्हा पोलिस प्रमुख व नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांची भेट घेणार आहोत. न्याय न मिळाल्यास जिल्हाभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असेही रईस जहागीरदार यांनी स्पष्ट केले.
बंटी जहागीरदार याच्या हत्येमागे सागर उर्फ चन्या बेग, आकाश उर्फ टिप्या बेग आणि सोनू उर्फ जयप्रकाश बेग हेच मुख्य सूत्रधार असल्याचा थेट आरोप रईस जहागीरदार यांनी केला. या संदर्भात त्यांनी पोलिस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. बेग बंधूंपैकी दोघांवर संगमनेर इथं एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. संगमनेर सत्र न्यायालयात टिप्या आणि सोन्या बेगविरुद्ध खटला सुरू असून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंटही बजावले आहे. इतके गंभीर गुन्हे दाखल असूनही पोलिस त्यांना अटक करत नाहीत, याकडे लक्ष वेधले.
"गंभीर गुन्ह्यातील आरोपी असलेले बेग बंधू, हे श्रीरामपूरमध्ये उजळ माथ्याने फिरत असून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या सभांना हजेरी लावतात. तसेच निवडणुकाही लढवत आहेत. पोलिस कारवाई करत नसल्यानेच न्यायालयाने आता त्यांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या आरोपींना पोलिस बलात्काराच्या गुन्ह्यात न्यायालयासमोर हजर करू शकत नाहीत, ते बंटी जहागीरदार हत्येप्रकरणात आम्हाला न्याय देतील का?" असा सवाल रईस जहागीरदार यांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.