
Rohit Pawar public meeting : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात प्रलंबित कामासाठी आमसभा चांगलीच गाजली. विशेष करून, रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधलेली भाषा चर्चेत आली.
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी रोहित पवार यांच्या या भाषेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानं राजकीय गदारोळ उडाला. आता या आमसभेवर भाजपने निशाणा साधला आहे. 'ही आमसभा होती की, बोंबसभा होती?' असा सवाल भाजप जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे यांनी केला.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी घेतलेल्या आमसभेवर प्रसिद्ध पत्रक काढून टीका केली आहे. 'आमसभा म्हणजे स्वपक्षीयांचे रडणे, अधिकाऱ्यांना ओरडणे आणि भाजप कार्यकर्त्यांचे गऱ्हाणे, अशी धोबीघाट वाटवी, अशी कर्जत जामखेडच्या आमदारांनी घेतलेली बोंबसभा होती,' असा घणाघात शेखर खरमरे यांनी केला.
'भाजपचे (BJP) तालुका स्तरावरील कार्यकर्ते जनतेची काम करतात आणि आमदारांकडून ती होत नाहीत, असे आमदारांचे अपयश अधोरेखित करणारा सूर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी या आमसभेतून लावला. मग आपलेच अपयश लपविण्यासाठी अधिकाऱ्यांना अरे-तुरे करणे, पूर्वीचा राग मनात धरून त्यांचा अवमान करणे, बैठकीचे सर्व संकेत पायदळी तुडवत वाह्यातपणा हाच आदर्श मानून केलेली आदळआपट आणि जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकी संदर्भात आणलेला खोटा आव, म्हणजे आवसभा, ती आमसभा नव्हे,' अशा शब्दांत शेखर खरमरे यांनी आमसभेवर निशाणा साधला.
आमसभा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रभाग समितीच्या प्रभाग सभा या सर्व जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि थेट जनतेशी संवाद साधण्याचे प्रभावी संवैधानिक साधन आहे. अशा बैठकामधून जनतेचे प्रश्न, अधिकाऱ्यांचा ते प्रश्न सोडवण्या संदर्भातील भूमिका, तांत्रिक अडचणी, सरकारचे धोरणे यासंदर्भात मूलभूत माहिती मिळते आणि प्रश्नाच्या मूळाशी जाण्याचा मार्ग प्रशस्त होतो, त्या संपूर्ण प्रक्रियेला चालना मिळते . धोरण अंमलबजावणी संदर्भातील झारीतले शुक्राचार्य समजतात. ते सर्व अडथळे दूर करणे हे अपेक्षित असताना फक्त बोंब ठोकण्यातच आमदार महोदयांनी धन्यता मानली, असा टोला देखील शेखर खरमरे यांनी लगावला.
आमदारांना आमसभा म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट वाटत होता. प्रत्येक विभागाची अकाउंटॅबिलीटी जनतेच्या साक्षीने तपासणे, शक्य त्या अडचणी दूर करून ती सिस्टिम प्रभावी करणे, असे अपेक्षित असताना विनाकारण अधिकाऱ्यांना "अरे-तुरे करणे, पूर्वीचा राग मनात धरून सरंजामी वृत्तीने त्याचा पाणउतारा करणे म्हणजे आमसभा, असा गैरसमज आमदारांना झालेला दिसतो. अधिकाऱ्यांना त्यांच्या व्यक्ति स्वातंत्र्याचा संकोच होईल इतक्या उद्धटपणे त्याचा पाणउतारा करण्याचा अधिकार आमदारांना कोणत्या संविधानाने मिळाला? हे त्यांनी जनतेला सांगितले पाहिजे, अशी मागणी भाजपे खरमरे यांनी केली.
आमदार उद्विग्न झालेले आहेत. राज्य पातळीवर प्रतिमा उंचावण्याच्या प्रयत्नात त्यांच्या बोलघेवडेपणामुळे त्यांना आता गांभीर्याने कोणी घेत नाही. मतदार संघातही त्यांच्या मल्टीलेवल मार्केटिंगच्या समाज माध्यमांवरील विकास कामांच्या जाहिरातींना लोक आता कंटाळले आहेत. त्यांच्या बाबतीत लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे, असे सांगताना, विधान परिषदेचे सभापती प्रा . राम शिंदे हे मतदार संघात सक्रिय असतात आणि त्यांचा जनतेत सहज वावरतात, जनतेच्या प्रती आत्मियता, प्रश्नाच्या सोडवणुकीची तत्काळ पद्धत आणि मुख्य म्हणजे मोठी जबाबदारी असताना मतदार संघासाठी त्यांची उपलब्धतता याकडे शेखर खरमरे यांनी लक्ष वेधले.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीनिमित्ताने कार्यकर्ता उदात्तीकरण करणे हाच हेतू आमसभेचा होता की काय? अशी शंका यावी इथपर्यंत पातळी सोडून 'आवसभा' झाली, त्यामुळे ती जनतेच्या प्रश्नाची आमसभा न ठरता कार्यकर्त्यांच्या रडगाण्याची 'बोंबसभा' ठरली, अशी जळजळीत टिका शेखर खरमरे यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.