
Karjat Nagar Panchayat -कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी तथा समन्वयकास भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या समर्थकांनी अपशब्द वापरत, दमदाटी करून मारहाण केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून भाजपचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांचा राजकीय संघर्ष आता वेगळ्या वळणावर पोहोचल्याचे दिसत आहे.
तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार (Sharad Pawar) पक्षाकडून या घटनेचा निषेध नोंदवला गेला आहे आणि पदाधिकाऱ्यांनी कर्जत पोलिसांकडे तक्रार देत मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये पदाधिकाऱ्यांची सर्वसाधारण बैठक झाली. यावेळी भाजप (BJP) नगराध्यक्षा रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे आणि इतर नगरसेवक-नगरसेविका हजर होते. याशिवाय काही महिला नगरसेविकांचे पती व एका नगरसेवकेचा भाऊ देखील बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होता.
ही बैठक सुरू असताना आमदार रोहित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी आणि समन्वयक हे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या ठिकाणी हजर का? असा सवाल सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी पुढे आणला. या प्रकरणात दोन्ही बाजूने शाब्दिक चकमक घडत असताना अचानक नगराध्यक्षा रोहिणी घुले समर्थकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आमदार पवार यांच्या दोन्ही प्रतिनिधींना अपशब्द वापरत, दमदाटी करून मारहाण केल्याचे दिसले.
यामुळे काहीकाळ नव्या नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीच्या आत आणि बाहेर तणावपूर्ण वातावरण बनले होते. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला. तसेच संबंधित घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
यासह कर्जत नगरपंचायतीमध्ये महिला पदाधिकाऱ्यांच्या नावाआड त्यांचे नातेवाईक पदाचा गैरवापर करीत मनमानी कारभार पाहत आहे, याची प्रशासकीय चौकशी व्हावी. तसेच बैठकीत झालेल्या गोंधळाची लेखी नोंद घेत वरिष्ठ प्रशासनाने त्याची योग्य ती चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी. सभेचे नियम, प्रतिनिधीची उपस्थिती आणि कोणाचा सहभाग असावा याबाबत स्पष्ट धोरण आणि त्याची नियमावली जाहीर करावी जेणेकरून भविष्यात सदरील घटनेची पुनरावृत्ती होणार याची खबरदारी घ्यावी, असे पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवर पक्षाचे नगरसेवक नामदेव राऊत, डॉ. राजेंद्र पवार, युवकचे नितीन धांडे, दीपक शहाणे, ऋषीकेश धांडे, सोमनाथ यादव, नवनाथ शिंदे यांनीही पोलिसांकडे तक्रार केली आहे.
कर्जत नगरपंचायतीमध्ये नुकतेच आमदार रोहित पवार गटातून 11 नगरसेवकांनी बाहेर पडत, भाजप आमदार व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याबरोबर घरोबा करून सत्तांतर घडवले. या सत्तांतरनंतरची ही पहिलीच बैठक नूतन प्रशासकीय इमारतीमध्ये घेण्यात आली. मात्र त्या पहिल्याच बैठकीत वादंग घडले. ज्या नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन कोणी करावे? या श्रेयात रखडली असताना, कालच्या मारहाणीच्या घटनेने ती चर्चेत आली. या वास्तूच्या पायगुणाविषयी दबक्या आवाजात राजकीय चर्चा मात्र नक्की घडली.
कर्जत नगरपंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत पदाधिकारी यांच्यासह सर्व नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. याच बरोबर काही महिला नगरसेवकांचे पती आणि एका नगरसेविकेचा भाऊ त्याच ठिकाणी हजर होते. आमदार रोहित पवार या भागाचे लोकप्रतिनिधी असून त्यांचे प्रतिनिधी म्हणून दोन जनसंपर्क अधिकारी देखील बैठकीच्या वेळी उपस्थित होते. त्याच माणसांनी आमदार पवार यांचे माणसे उपस्थित का? असा सवाल उपस्थित करणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा होय. आमदार पवारांशी गद्दारी करून सत्ता मिळवली असताना त्या पदाची त्यांनी गरिमा राखावी. अन्यथा पुढील वेळेस अशा घटनांना जशास तसे उत्तर निश्चित देण्यात येईल, असा इशारा नामदेव राऊत यांनी दिला.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.