
Sudhakar Badgujar, Babanrao Gholap join BJP -शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कधीकाळी नाशिकमधील प्रमुख नेते राहिलेले सुधाकर बडगुजर आणि माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप यांच्यासह अनेकांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण, गिरीश महाजन आदींची प्रमुख उपस्थिती होती. बडगुजर आणि घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करताना बावनकुळे यांनी काहींना उपदेश केले तर काहींवर निशाणाही साधला. एवढंच नाहीतर यावेळी बावनकुळेंनी आता हे एक ट्रेलर आहे, पुढचा पिक्चर बाकी आहे, असं सूचक वक्तव्यही केलं ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं, 'आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकसीत महाराष्ट्राचा संकल्प झाला आहे. देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकसीत देशाचा संकल्प झाला आहे. सुधाकर बगजुर आणि बबनराव घोलप यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्वांमुळे पक्षाला अधिक बळकटी मिळाली आहे आणि भविष्यातही नक्कीच मोठं यश मिळेल. खऱ्या अर्थाने नाशिकच्या भाजपच्या संघटनेत अधिक मजबुतीने आपल्याला पुढे जाता येईल.'
तसेच 'खरंतर कुठलाही पक्षप्रवेश होतो, तो भाजपमध्ये विकासासाठी होतो. सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप आणि गिरीश महाजन हे जेव्हा आमच्याशी बोलले तेव्हा, कुठलीही आशा अपेक्षा न ठेवता. केवळ देवेंद्र फडणवीसांच्या सरकारच्या कार्यकाळात नाशिक शहराचा विकास व्हावा, यासाठी त्यांनी पक्षप्रवेश केला आहे. मला आधी वाटलं होतं, उद्य किंवा पक्षप्रवेश केला जाईल. परंतु गिरीश महाजनांनी आज पक्षप्रवेश ठरवला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत अडकल्याने मला व रविंद्र चव्हाण यांना येण्यास उशीर झाला.' असं बावनकुळे म्हणाले.
याशिवाय 'आता पक्षप्रवेश झाला आहे, जेव्हा पक्षप्रवेश होतो तेव्हा आपल्याल नव्या आणि जुन्या संघटनेचा समन्वय साधावा लागतो. कोणतेही मनभेद नक्कीच नाहीत काही मतभेद हे विचारांचे असतात. ते दूर करणे ही खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. शेवटी ज्या पक्षात आपण असतो तेव्हा आपल्याला त्या पक्षाची भूमिका मांडायची असते. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर टीका, टिप्पणी होत असते, परंतु आता पक्षप्रवेश झाल्यानंतर सुधाकर बडगुजर, बबनराव घोलप आणि त्यांच्या संपूर्ण टीमची ही जबाबदारी आहे की, आपल्या सर्व नवीन आणि जुन्या टीमला सोबत घेवून, भाजपची संघटना ही ५१ टक्क्यांच्यावर मताची झाली पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचे आहे आणि पुढील काळात सर्व मतभेद दूर करायचे आहेत.' असं बावनकुळे म्हणाले.
एवढच नाहीतर 'भाजप तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होवू देणार नाही. भाजपमध्ये प्रवेशामुळे तुम्हाला मान, सन्मान मिळेल. पक्षातही तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की आपण नवीन घरी गेलो आहोत, हा संपूर्ण परिवार आहे. काही काळापुरते मतभेद असतील, काही मनभेद असतील तर आपण ते सर्व दूर करण्याचा प्रयत्न करूयात. यासाठी सर्व नवीन, जुन्या कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षात रहावं.' असंही प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'जोपर्यंत न्यायालय कोणाला दोषी ठरवत नाही तोपर्यंत कुठलाही आरोपी हा दोषी नसतो. कुठलाही आरोप सुद्धा जोपर्यंत न्यायालय अंतिम करत नाही, तोपर्यंत कधीही कुणावर आपण टीका करू नये. अनेक लोक जेलमध्ये जावून आले आहेत, आज जे स्वत: सकाळी ९ वाजता बोलतात तेही जेलमध्ये जावून आले आहेत. टीका करणारेही जेलमध्ये जाऊन आले आहेत. एकच सांगेन जोपर्यंत न्यायालय कुठलीही शिक्षा देत नाही, तोपर्यंत कुणावर आरोप होवू शकतो परंतु आरोपावर निर्णय मात्र न्यायालय घेईन.' असं म्हणत बावनकुळे यांनी एकप्रकारे बडगुजर यांची बाजूच मांडल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.