
MVA vs Mahayuti Ahilyanagar : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महायुती की, महाविकास आघाडी, असा सामना होण्याची शक्यता धूसर आहे. अहिल्यानगर महापालिकेत नेहमीच वेगळी राजकीय समीकरण उदयास आलीत.
या निवडणुकीत देखील तसंच काही चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचनेत ते वाढ होण्याची शक्यता असल्याचे भाकीत वर्तवले जात आहे. यात भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची असणार असून, महापौर खुर्चीचा कोणाला? याचा निर्णय या तिघांपासून जाणार आहे. त्यामुळे नगरचा महापौर कोण? याचीच सर्वाधिक उत्सुकता आहे.
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक प्रभागांमध्ये तळ ठोकून आहेत. छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना, सत्कारांना, कामांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात आहे. एका-एका प्रभागात इच्छुकांची संख्या तीन डझनच्या पुढं गेल्यानं महायुतीला (Mahayuti) आणि महाविकास आघाडीची दमछाक होणार, हे मात्र निश्चित!
2003 मध्ये महापालिका स्थापन झाली. तेव्हापासून पूर्वीची शिवसेना (Shivsena) अन् राष्ट्रवादी या दोन पक्षांचेच प्राबल्य राहिले आहे. परंतु आता त्यांचेच दोनाचे चार (पक्ष) झाले आहेत. शिवसेना खिळखिळी झाल्याने हिंदुत्ववादी संघटनेच्या जोरावर भाजपने शहरात चांगले पाय रोवले आहेत. हेच हेरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील हिंदुत्वाचा मुद्दा घेत आक्रमक झाले आहे.
महायुती विरोधात महाविकास आघाडी, अशी सरळ लढत झाली, तरी महापौरपदाची खुर्ची नेमकी कुणाची? याकडे नगरकरांचे आतापासूनच लक्ष लागले आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक चार महापौर झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीला तीन वेळा, तर काँग्रेस व भाजपला एकदा संधी मिळाली. आता शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटले आहेत. त्यात सर्वाधिक नगरसेवक राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाकडे आहेत. शिवसेना फुटल्यानंतर, ठाकरेंकडून शिंदे गटाकडे नगरसेवक गेल्यान त्यांचे संख्याबळ अधिक दिसते.
भाजप तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रत्येक पक्षाचा स्थानिक पदाधिकारी सत्तेवर दावा करत आहे. महायुती व महाविकास आघाडी होणार की नाही? यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत. सद्य परिस्थितीत मात्र सर्व पक्षीयांचा महापौरपदावर डोळा आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्ष कामाला लागलेला आहे. दरम्यान, या पक्षांनी स्वतंत्र अथवा एकत्र येऊन ही निवडणूक लढविली, तरी महापौरपदाच्या खूर्चीवर कोणत्या पक्षाची वर्णी लागणार? याचे गणित पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व भाजप आमदार शिवाजी कर्डिले हेच सोडवणार आहे.
शिवसेना (एकत्रित)- 23, राष्ट्रवादी (एकत्रित)- 19, भाजप- 15, काँग्रेस- 05, बसप- 04, सपा- 01, अपक्ष- 01, असे एकूण- 68 नगरसेवक आहेत. अहिल्यानगर शहरात एकूण 17 प्रभाग असून, त्यात एका प्रभागात चार नगरसेवक आहेत. स्वीकृत नगरसेवक पाच असून, यंदा प्रभागाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ही संख्या दोन किंवा तीनने वाढेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
प्रभागाची रचना, तसेच प्रभागातील नगरसेवकांची संख्या निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. एका प्रभागात चार नगरसेवक असावेत, अशी सत्ताधारी भाजपची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. त्यामुळे मागील निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीसाठी देखील एका प्रभागात चार नगरसेवक राहण्याची शक्यता आहे, तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाढलेल्या मतदारांचा विचार झाल्यास शहरात आणखी दोन ते तीन नवीन प्रभाग तयार होण्याची शक्यता आहे.
भगवान फुलसौंदर (शिवसेना)- 2003
संदीप कोतकर (काँग्रेस)- 2006
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)- 2008
शीला शिंदे (शिवसेना)- 2011
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)- 2013
अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी)- 2015
सुरेखा कदम (शिवसेना)- 2016
बाबासाहेब वाकळे (भाजप)- 2018
रोहिणी शेंडगे (शिवसेना)- 2021
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.