

OBC reservation decision : नगरपालिकांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. यानंतर जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होतील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाकडे सर्वांचच लक्ष असते.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू झालं आहे. यातून कुणीबी प्रमाणपत्रांचे वितरण देखील झाले आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना डावलून नये, अशी कणखर भूमिका सर्व पक्षातील ओबीसी पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
अहिल्यानगरच्या राहुरी तालुक्यात सर्व पक्षातील ओबीसी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसींना (OBC) डावलू नये असा ठराव घेण्यात आला. राजकीय पक्षांनी मूळ ओबीसींना डावलण्याची भूमिका घेतल्यास, अन् तसं निर्दशनास आल्यास संबंधित पक्षाला मतदानातून उत्तर दिलं जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
राहुरी इथं झालेल्या बैठकीला दोन्ही शिवसेना, भारतीय जनता पक्ष (BJP), राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, वंचित बहुजन आघाडी, आदिवासी एकलव्य संघटना, तसंच काँग्रेस पक्षासह ओबीसी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी ओबीसींच्या आरक्षित जागांवर मूळ ओबीसींमधील 374 जातींपैकी कोणत्याही जातीस प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी. मूळ ओबीसींना संधी डावलली, तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या मतदारांना बरोबर घेऊन सर्वपक्षीय ओबीसी समाजातर्फे संबंधित राजकीय पक्षांच्या विरोधात मतदानातून उत्तर देण्यात यावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
यापुढे कोणत्याही निवडणुकीत राजकीय पक्षांनी मूळ ओबीसींना डावलून आरक्षित जागांवर उमेदवार दिल्यास त्याला सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करायचा. संबंधित राजकीय पक्षांच्या विरोधात भूमिका घेऊन मतदानातून उत्तर द्यायचे, असा एकमुखी ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, शिवसेना ओबीसी-व्हीजेएनटी तालुका प्रमुख प्रशांत खळेकर, आदिवासी एकलव्य संघटनेचे बाबासाहेब शिंदे यांची यावेळी जोरदार भाषणं झाली. सचिन मेहेत्रे, मच्छिंद्र गुलदगड, सतीश फुलसौंदर, किरण अत्रे यांच्यासह ओबीसी समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.