
Ahilyanagar road corruption case : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महापालिकेत सुमारे 776 रस्त्यांच्या कामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळाच्या आरोप आणि चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावर उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली.
"'ईडी'चा प्रसाद मिळालेल्यांना सर्वच भ्रष्टाचारी दिसत आहे. रोज सकाळी येऊन फक्त मनोरंजन करत आहे. राज्यातील अनेकांवर असे आरोप करून, खासदार राऊत यांना तोंडघशी पडायची भारीच हौस आहे", असा टोला आमदार जगताप यांनी लगावला.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अहिल्यानगर महापालिकेत रस्त्याच्या कामात 300 ते 400 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करत चौकशीची मागणी केली. यावर महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया समोर आली.
आमदार जगताप म्हणाले, "खासदार संयज राऊत त्यांच्या पक्षाचे स्वयंघोषित नेते आहे. त्यांना कुठूनही प्रसिद्धी मिळत नाही. ते स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वादग्रस्त विधान करतात. त्यातून ते फक्त मनोरंजन करतात. ज्यांचे हात भ्रष्टाचाराने (Corruption) बरबटलेले आहेत, असे खासदार राऊत यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपात 'ईडी'चा प्रसाद घेत अनेक महिने जेलमध्ये काढले आहेत". त्यामुळेच सर्वजण त्यांना भ्रष्टाचारीच दिसत आहेत, असेही जगताप यांनी म्हटले.
'संजय राऊत रोज सकाळी येत असे राज्यातील अनेक नेत्यांवर फालतू अन् खोटे आरोप करतात. त्यांना माहिती देणारे अनेकदा तोंडघशी पडलेत. त्यांच्या अशा खोट्या आरोपांना भिक न घालता अहिल्यानगरचा विकास हा, असाच वेगाने चालू ठेवणार आहोत. त्यांनी कितीही खोटे आरोप करून विकासकामांमध्ये खोडा घालून थांबवण्याचा प्रयत्न केला, तरी कामे थांबणार नाहीत. अशांना जशासतसे उत्तर दिले जाईल', असा इशारा आमदार जगताप यांनी दिला.
'आमच्या माता-भगिनींसाठी टीव्हीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहायला मिळतात, तसे खासदार राऊत यांची सकळाची विधानं म्हणजे, सर्वांसाठी मनोरंजनच आहे. त्यांना फार कोणी गांभीर्याने घेत नाही. सत्तेत असताना त्यांना कोणताच विकास करता आला नाही. आताही कोठूनच प्रसिद्धी मिळत नसल्याने ते आमच्यासारख्या काम करणाऱ्यांवर, असे खोटे आरोप करतात', असा घणाघात देखील आमदार जगताप यांनी केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी ही घोटाळ्याची फाइल, पुढं केली. आमदार जगताप यांनी त्यांचे नाव न घेता, 'अहिल्यानगरला बदनाम करण्यासाठी शहरातील काही ब्लॅकमेलर लोकं, त्यांना अशा स्वरुपाची खोटी माहिती देत आपली दुकानदारी चालू ठेवत आहेत. अशांच्या ब्लॅकमेलिंगमुळे अहिल्यानगरमध्ये काहींनी आत्महत्या देखील केल्या आहेत. अशा ब्लॅकमेलरांच्या आरोपांकडे नगरकर कायमच दुर्लक्ष करतात, यातून ते अनेकदा तोंडघशी पडले आहेत'.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे किरण काळे यांनी पत्रकार परिषद, या घोटाळ्याची अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "स्वतः आमदारांनी सांगितले आहे की निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या कामाशी त्यांचा थेट संबंध असल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे. सर्व ठेकेदार हे त्यांचेच कार्यकर्ते आहेत. जनतेच्या तिजोरीतील निधी हे मंत्रालयातून आणतात. मनपात जनता कर भरून कोट्यवधी रुपये जमा करते. यातून गरजेपेक्षा खूप अधिक वाढीव रकमांचे इस्टिमेट राजकीय दबावातून अधिकाऱ्यांशी संगनमत करून तयार करून घेतले जातात. या सगळ्यांमध्ये 10 ते 40 पर्यंतची टक्केवारी आमदार आधी जमा करून घेतात. कारण ते खोक्यांच्या सरकारचे आमदार आहेत".
'या वरदहस्ताशिवाय एवढा मोठा घोटाळा होऊच शकत नाही. आमदार, मनपा अधिकारी, ठेकेदार यांची नार्को टेस्ट, करा अशी मागणी काळे यांनी केली. संजय राऊत हे शिवसेनेचे राष्ट्रीय 'फायर ब्रँड' नेते आहेत. 'ईडी'च्या दहशतीला न जुमानता कोणताही गुन्हा न करता देखील तुरूंगवास भोगून आलेले क्रांतिकारक आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची पात्रता आमदारांची नाही. त्यांची ती उंचीही नाही. यापूर्वी ज्या नितेश राणेंना त्यांची उंची नाही, असं म्हणणारे आज त्याच राणेंच्या बाजूला जाऊन ते बसले आहेत. भगव्याच्या, हिंदुत्वाच्या नावाने भ्रष्टाचार करत आहेत', असा टोला देखील काळे यांनी आमदार जगतापांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.