
Ahilyanagar temple fraud news : अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर इथल्या श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांसह नोकर भरती घोटाळा अन् आणि बनावट ॲपद्वारे शनिभक्तांच्या फसवणूकप्रकरणी मुंबई धर्मादाय कार्यालयाचा चौकशीचा फेरा सुरू आहे.
विश्वस्तांना नोटिसा आल्या असून, त्यावर शुक्रवारी (ता. 25) म्हणणे मांडायचे आहे. हे म्हणणे काय मांडायचे, यावर विश्वस्तांनी तीन वकिलांची फौज नेमली असली, तरी तारीख जशी जवळ येत आहे, तशी विश्वस्तांची धाकधूक वाढली आहे. तसेच या गैरव्यवहाराच्या चौकशीमुळे नेहमीच गजबजले असलेले देवस्थानच्या कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे. कार्यालयात अलीकडच्या काळात 'पिन ड्रॉप साइलेंस' अनुभवायला येत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आले आहे.
शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये गरज नसताना करण्यात आलेली नोकरभरती, कारभारातील अनियमितता व प्रथमदर्शनी दिसत असलेला भ्रष्टाचार लक्षात घेऊन मुंबई (Mumbai) येथील धर्मादाय आयुक्तांनी म्हणणे मांडण्यास दिलेला अवधी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने विश्वस्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक कार्यकारी अधिकारी व नऊ विश्वस्तांची धाकधूक वाढली आहे.
अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखेचे पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम ऑनलाईन अॅप घोटाळ्याचा तपास करीत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानभवनात शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर ताशेरे ओढल्यानंतर धर्मदाय आयुक्त अमोघ कलोती चौकशी करत आहेत.
विश्वस्त मंडळावर चौकशीचा दुतर्फा फेरा सुरू असल्याने सर्वांचीच त्रेधातिरपीट उडाली असल्याचे दिसते. वरील दोन्ही प्रकरणांमुळे गावाची व देवस्थानची बदनामी झाल्याचा सूर परिसरात उमटत आहे. तक्रारदार व्यक्ती अॅप घोटाळ्याची चौकशी होऊन त्यातील सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, याकरीता ठाम आहेत. विश्वस्त मंडळाने चार वर्षे व सात महिन्यांत भाविकांच्या हिताचे काही निर्णय घेतले असले, तरी अॅप घोटाळा व नोकर भरतीतील संशयास्पद स्थितीने चांगल्या कामावर पाणी फिरल्याचे बोलले जात आहे.
शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्षांनी मागील आठवड्यात आवश्यक माहिती देण्यापासून मौन धारण केले आहे. धर्मादाय कार्यालयातून भेटणारी प्रमाणित नक्कल मिळाली की नाही, यावर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. मागील शुक्रवारी प्रमाणित नक्कल विषयी अर्ज मंजूर झाल्यानंतर आज नक्कल भेटणार होती. मात्र नक्कल भेटली की नाही याबाबत संबंधित वकिलांनी देवस्थानला अजून कळविले नाही. शुक्रवारी (ता.25) म्हणणे देण्याची तारीख आहे, असे ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.