Bhanudas Murkute Vs Ajit Kale : 'अशोक'च्या सभेत गोंधळ; मुरकुटेंसह समर्थक धावून गेले, बचावासाठी काळेंभोवती 'शेतकरी'च्या कार्यकर्त्यांचे 'संरक्षण कडे'

Ahilyanagar Shrirampur Ashok Sugar Factory Meeting Chaos: श्रीरामपूर अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत पहिल्यादांच अभुतपूर्व गोंधळ झाल्याने माजी आमदार भानुदास मुरकुटे संतापले.
Bhanudas Murkute Vs Ajit Kale
Bhanudas Murkute Vs Ajit KaleSarkarnama
Published on
Updated on

Ahilyanagar Shrirampur politics news : श्रीरामपूर इथल्या अशोक साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत पहिल्यादांच अभुतपूर्व गोंधळ झाला. माजी आमदार भानुदास मुरकुटे, साईसंस्थानचे माजी विश्वस्त प्रताप भोसले अन् शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अजित काळे यांच्यात ऊस भावावरून घमासान झालं.

प्रताप भोसले यांचे मुद्दे खोडून काढताना, अजित काळे यांनी कारखाना व्यवस्थापनाच्या उणिवांवर थेट बोट ठेवले. यामुळे मुरकुटे अन् त्यांच्या समर्थकांनी काळे यांना मज्जाव केल्याने मोठा गोंधळ उडाला. शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांच्याभोवती कडे करत त्यांना संरक्षण दिले. यानंतर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला.

श्रीरामपूरमधील (Shrirampur) अशोक कारखान्याची 67 वी सर्वसाधारण सभा झाली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष बाबासाहेब आदिक, गिरीधर आसने, दीपक पटारे, श्रीधर आदिक, कार्यकारी संचालक संतोष देवकर, वंदना मुरकुटे, हिराबाई साळुंखे, मंजुश्री मुरकुटे, सुनीता गायकवाड अन् संचालक उपस्थित होते. गेल्यावेळी 2700 रूपये भाव, त्यावरून असलेली नाराजी आणि चालू हंगामातील भाव, यावरून ही सभा वादळी ठरली. अहवाल वाचन, सभेपुढील विषय आणि इतिवृत्त वाचण्यातच सुमारे एक ते दीड तास घालविण्यात आला.

प्रताप भोसले यांनी डेफर्ड टॅक्स अ‍ॅसेटसवरून भानुदास मुरकुटेंना (Bhanudas Murkute) खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांनी कारखान्याची बाजू मांडली, त्याने भोसले यांचे समाधान होवू शकले नाही. भोसले यांनी मुरकुटेंच्या व्यवस्थापनावरच बोट ठेवत 3500 रूपये भाव देण्याची मागणी केली. मुरकुटे यांनी हस्तक्षेप करत 3500 सोडा तुम्ही 3300 रूपये भाव द्यावा, माझ्यासह संचालक मंडळ आता इथेच राजीनामे देतील, असे आव्हान दिले.

Bhanudas Murkute Vs Ajit Kale
Nilesh Ghaiwal Passport : पासपोर्टसाठी 'चिटिंग'? कुख्यात गुंडाने आडनाव घायवळचं 'गायवळ' केलं, कागदपत्रांचा तपशील समोर...

भोसले यांनीही मी 12 गावचे नाही, तर 12 देशांचे पाणी पिलेलो आहे, 16 देशात माझा व्यवसाय आहे. कारखान्यासाठी माझ्या वडिलांचेही मोठे योगदान आहे. वेळ पडली, तर माझ्या संपत्तीतून पैसे देईल. पण कामगारांचे पगार व ऊसाला भाव देवून दाखवेल असे, प्रतिआव्हान दिले. यावर मुरकुटे यांनी तुमची संपत्ती किती आहे, त्याने कारखाना चालणार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला असता भ्रष्टाचाराने कमाविलेल्या संपत्तीपेक्षा जास्त टॅक्स भरत असल्याचे सांगून व्यवस्थापन ताब्यात देण्याची मागणी केली. आता नाहीतर जानेवारी 2027 साली निवडणुकीच्या रिंगणात राहणार, असल्याचेही यावेळी भोसले यांनी जाहीर केले.

Bhanudas Murkute Vs Ajit Kale
Top 10 News: व्हेअर इज धंगेकर? घायवळ लंडनला नाही, तर 'या' देशात, ठाकरे बंधूंच्या 'युती' आधीच राजकीय 'बॉम्ब',उदयनराजेंचा मोठा निर्णय

कारखान्याच्या व्यवहारांवर काळेंची शंका

यानंतर अ‍ॅड. अजित काळे बोलण्यास उभे राहिले. कारखाना कार्यक्षेत्रात 7 ते 8 लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध असताना बाहेरून ऊस आणण्याची आवश्यकता का भासते? कारखाना ऊस घेवून बाहेरील कारखान्याला तो पुरवितो. या व्यवहाराबद्दल आम्हाला काही समजत नाही. कारखान्याला 20 ते 22 कोटी रूपयांचा तोटा दिसतो आहे. असे असताना तुम्हाला गाळप क्षमतेत वाढ कशाला करायची आहे? आहे त्या क्षमतेत कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करावे, अशी मागणी केली.

मुरकुटे अन् काळे भिडले; समर्थकही...

कारखान्याची पत नसल्याने जिल्हा बँकही कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. ऊसाला 3300 रूपये भाव जाहीर करावा, तुमच्यासोबत राहू, असे आव्हान त्यांनी मुरकुटे यांना देताच, मुरकुटे आणि त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली. मुरकुटे यांनीही पाच मिनिटे संपली आता बोलता येणार नाही, असा पवित्रा घेत मज्जाव केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. मुरकुटे व काळे समर्थक व्यासपीठाच्या दिशेने धावले. काळे यांच्याभोवती कार्यकर्त्यांनी संरक्षक कडे उभे केले.

पोलिसांचा हस्तक्षेप अन् आक्षेप

पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व सहाकऱ्यानी हस्तक्षेप केला. मात्र, मुरकुटे यांनी पोलिसांना मध्ये पडू नका, असा आक्षेप नोंदविला. पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखत तिथेच थांबणे पसंत केले. हा गोंधळ बराच काळ सुरू होता. काळे यांना बोलू न दिल्याने त्यांच्यासह समर्थकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सभागृहात मुरकुटे यांनी ज्ञानेश्वर, मुळा, गणेश कारखान्यांनी दिलेल्या भावाशी तुलना करत यावेळी कारखाना व्यवस्थापनावर करण्यात आलेले आरोप खोडून काढले.

काळे अन् भोसलेंची निषेध सभा

दरम्यान, काळे व भोसले यांनी सभागृहाशेजारील रस्त्यावर निषेध सभा घेत कारखाना व्यवस्थापनातील त्रुटींवर बोट ठेवले. यातून पुढे त्यांनी साखर संचालकांकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले. कारखान्यात चोरी झालेल्या भंगारप्रकरणी केवळ 50 हजाराची गुन्ह्यात नोंद करण्यात आली आहे, ही रक्कम लाखात असल्याचा आरोप केला. यापूर्वी शेतकरी तुमचे ऐकत होते. आता सर्वांना हिशोब कळायला लागला आहे. 2027मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

मुरकुटेंचा सर्वपक्षीय नेत्यांचा धावा

दीपक पटारे यांच्यासह गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे हे विखे समर्थक सभेच्या व्यासपाठीवर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मुरकुटे यांनी बोलताना दीपक पटारे यांच्या आपण पाठीशी होते. त्यावेळी ते स्वकर्तृत्वावर सभापती झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ते फार जवळचे आहेत. भोसले यांचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. या दोघांनीही सोबत आल्यास त्यांचा निश्चित फायदा होईल. कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी फडणवीस यांना भेटायचे आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोबत आहेत, अजितदादाही आपले आहेत, असे मुरकुटे यांनी यावेळी सांगितले.

भानुदास मुरकुटेंचा विरोधकांवर निशाणा...

विरोधक उत्तरेतील बड्या नेत्यांकडून सुपारी घेऊन 'अशोक'ला बदनाम करत आहेत. अशोक बंद पाडण्याचा त्यांचा डाव आहे, असा आरोप करत कर्ज घेतल्याशिवाय कोणताच कारखाना चालू शकत नाही. आपली कामधेनू वाचवायची असेल, तर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस बाहेरच्या कारखान्यांना देऊ नये, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com