

Ahilyanagar voter list issue : अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेतील गंभीर त्रुटींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने आपेक्ष घेतला.
घरपोच पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असून अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता नावांची पडताळणी केल्याचे दाखवले जात आहे. तसेच अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार यादीतील श्रीगोंदा-नगर तसेच राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील बोगस नावे वगळावी, अशी मागणी केली आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या मतदार यादी पुनरावलोकन मोहिमेच्या (एसआयआर) अंमलबजावणीतील गंभीर त्रुटींवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने बोट ठेवत जिल्हा प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत थेट तक्रार करण्यात आली.
शिवसेना ठाकरे सेनेचे (ShivSenaUBT) महानगर प्रमुख किरण काळे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, विलास उबाळे यांनी ही तक्रार केली. मतदार यादी अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट असले, तरी प्रत्यक्षात अनेक अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे सेनेने केला.
घरपोच पडताळणी प्रक्रिया अपूर्ण असून, अनेक ठिकाणी प्रत्यक्ष भेट न देता नावांची पडताळणी केली जात आहे. तशी मतदार याद्यांमध्ये ती दाखवली जात आहे. यातून बोगस नावे मतदार यादीत कायम राहण्याची आणि खऱ्या मतदारांची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे सेनेने केला.
याशिवाय, डेटा एन्ट्री दरम्यान नाव, वय आणि पत्त्यात मोठ्या प्रमाणात चुका होत आहेत. अभियानाबाबत जनजागृतीचा अभाव ही देखील गंभीर बाब आहे. अनेक मतदारांना या प्रक्रियेची माहितीच नाही. तसेच नागरिकांनी दिलेल्या तक्रारींवर वेळेत निर्णय होत नसल्याने पारदर्शकतेवर शिवसेना ठाकरे सेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कर्मचाऱ्यांवर दुहेरी जबाबदाऱ्या टाकल्यामुळे कामावर ताण वाढून अंमलबजावणीवर परिणाम होत आहे. स्थलांतरित कामगार व भाडेकरू मतदारांच्या नोंदीत ही विसंगती दिसते. यातून एसआयआर अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचा घणाघात किरण काळे यांनी केला.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठीची अंतिम मतदार यादी जाहीर करताना श्रीगोंदा-नगर तसेच राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील हजारो नावांचा समावेश निवडणूक यंत्रणा हाताशी धरून, राजकीय हस्तक्षेपातून अहिल्यानगर शहराच्या यादीत करण्यात आला आहे. त्या वेळेस देखील हरकत घेण्यात आली होती. बोगस नावे वगळण्याची मागणी केली होती. मात्र त्याची दखल घेतली नाही. आता एसआयआरमध्ये अहिल्यानगर शहरा बाहेरील ती बोगस नावे वगळावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे सेनेने केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.