Ahmednagar News : राज्यातील शेतकऱ्यांचे गेल्या 10 ते 15 वर्षांपासून असलेले सातबारावरील कर्ज सरकारचे पाप आहे. हा विषय चिंताजनक असल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करताना सांगितले.
अहमदनगर जिल्हा शेतकरी (Farmer) संघटनेच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन शेतकरी प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, औरंगाबाद उच्च न्यायालयाचे अॅड. प्रकाश गायकवाड, अॅड.पोखरकर, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे उपस्थित होते. मनोज जरांगे यांच्या संपर्कात ही शेतकरी संघटना असल्याचे समोर आल्याने आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या 15 वर्षापासून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघेल इतकाही भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या सातबारावरील सहकारी व राष्ट्रीय बँकांचे (Bank) कर्ज पिढ्यानपिढ्या तसेच आहे. केंद्र व राज्य शासनाने पंधरा वर्षांपासून तीनवेळा कर्जमाफी आणूनही त्यामध्ये तारखेची, रकमेची व क्षेत्राची अट लावल्यामुळे सातत्याने 60 टक्के शेतकऱ्यांना या योजनांचा फायदा झालेला नाही.
10 नोव्हेंबर 2013 रोजी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे राज्य सरकारने दुष्काळ घोषित केला. 70 टक्के शेतकऱ्यांची कर्ज सहकारी व राष्ट्रीय बँकेमध्ये एनपीए झाले आहे. यामुळे आज शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्जही मिळत नाही. तेरा वर्षांपूर्वी असलेल्या शेतमालाचे भाव आजही त्याच पातळीवर आहे. 2009 मध्ये सोयाबीन 3 हजार 800 रुपये क्विंटल होती. आजही सोयाबीनचे दर तेच आहेत. तेरा वर्षांपूर्वी उसाचे दर दोन हजार रुपये होते, तर दुधाचे दर बारा वर्षांपूर्वी 22 रूपये असताना आज 25 रुपये प्रति लिटर दूध विकत आहे.
पिक विमा योजनेतील शेतकऱ्यांची सरकारकडूनच फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने सरकारे बदलली, परंतु सरकारमधील घराणी तीच असल्याने शेतकरी लुटीच्या व्यवस्थेतील बदल झाला नाही. दुर्दैवाने आज महाराष्ट्रात दररोज किमान पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी सातत्याने शेतकरी आंदोलने छेडली जातात. परंतु सरकार शेतकऱ्यांसह शेतकरी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.