Ajit Pawar News: नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाची मदत अपेक्षित आहे. मात्र राज्य शासनाकडून मदत मिळण्याऐवजी व्याजमाफीवर चर्चा सुरू होती. त्यामुळे बँकेच्या कामकाज प्रभावीत झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत दोन वेळा बैठका झाल्या. या बैठकीत राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी विविध सूचना केल्या होत्या. त्याच झालेल्या बैठकीत कर्ज वसुलीवर भर द्यावा आणि व्याज सवलती देण्याच्या सूचना केल्या होत्या.
राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकांनी केलेल्या सूचनांबाबत अनेकांचे मतभेद आहेत. जिल्हा बँकेने व्याजमाफी केल्यास 900 कोटी रुपयांचा आर्थिक भार सोसावा लागेल. आजची स्थिती हा भार सहन करील अशी नाही. त्यामुळेच प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे.
बँकेचे प्रशासक चव्हाण यांनी २४ एप्रिलला ईमेल द्वारे राजीनामा पाठविल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता राज्य सहकारी बँकेकडून नवीन प्रशासकांची नियुक्ती अपेक्षित आहे. त्या एक-दोन दिवसात नवी प्रशासक कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. त्यानंतर बँकेच्या पुढील कामकाजाची दिशा ठरेल.
जिल्हा बँकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींची बैठक उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाली होती. यामध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते. यावेळी बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत सादरीकरण करण्यात आले होते.
सध्या जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असल्याने बँकेचा बँकिंग परवाना रद्द होण्याची भीती आहे. बँकेकडे सध्या २२०० कोटींच्या ठेवी, २१०० कोटिंचे कर्ज आहे. राज्य सहकारी बँकेने सूचना केल्याप्रमाणे व्याजात सवलती दिल्यास कर्जावरील ९०० कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागेल. तसे झाल्यास नव्या समस्या निर्माण होतील.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकला राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. त्यात बँकेच्या कर्ज वसुलीला तीन आठवड्यांची स्थगिती दिली होती. त्यानंतर बँकेच्या कामकाजाला शिथिलता आली आहे. कर्जवसुलीचे काम ठप्प आहे. अशा स्थितीत सरकारच्या धडसोड वृत्तीमुळे जिल्हा बँकेचा पाय आणखी खोलात गेल्याची स्थिती आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.