
Rahuri Ajit Pawar news : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरच्या राहुरी इथला अन् कार्यकर्ता मेळाव्यानंतर माजी खासदार प्रसाद तनपुरे आणि त्यांचे पुत्र माजी मंत्री प्राजक्त यांची भेट घेतली. अजितदादांनी या भेटीनं अनेक गोष्टी साध्य केल्याची चर्चा आहे.
शरद पवार यांच्या एकनिष्ठ असलेले आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे प्राजक्त तनपुरे हे भाचे आहेत. अजितदादांनी तनपुरेंची ही भेट वरकरणी साधी वाटत असली, तरी त्यात आगामी काळातील मोठा राजकीय हेतू दटलेला आहे. या भेटीत तनपुरे पिता-पुत्रांना राष्ट्रवादीत संधी असल्याचे सांगून पक्षात काम करण्याचा ऑफर दिल्याची चर्चेने जोर धरला आहे.
तनपुरे पिता-पुत्र अजितदादांच्या (Ajit Pawar) संपर्कात असल्याची पहिल्यापासून चर्चा आहे. तनपुरे सहकारी साखर कारखान्यानिमित्ताने ही चर्चा अधिकच उफाळली होती. याच निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी लवकरच गोड बातमी देऊ, असे संकेत दिले होते. यानंतर अरुण तनपुरे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण तनपुरे पिता-पुत्रांच्या निर्णयाच्या गोड बातमीचा अजूनही मुहुर्त लागला नाही.
जयंतमामा (जयंतराव पाटील) प्राजक्त तनपुरे यांचे राजकीय गुरू. आणि ते शरद पवारांशी (Sharad Pawar) एकनिष्ठ आहेत. या निर्णयाला त्यांच्यामुळेच दिरंगाई होत असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जवळपास साडेसात वर्षे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद संभाळले. आता पक्षात बदल झाले असल्याने जयंत पाटील कोणता निर्णय घेतात अन् त्यांचा भाचा त्यांच्या निर्णयासोबत जाणार का? अशी चर्चा आहे.
या राजकीय उलथापालथीवर आज अजितदादांनी राहुरी दौरा केला. अरुण तनपुरे यांच्या पुढाकारातून कार्यकर्ता मेळावा झाला. यानंतर अजितदादांनी अरुण तनपुरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला हजेरी लावली. तिथं तनपुरे वाड्यात अजितदादांनी 83 वर्षांचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे देखील उपस्थित होते.
अजितदादांनी प्रसादर तनपुरे यांच्या तब्येतीची विचारपूस करताच, काळजी घेण्याचा सल्ला दिला. प्रसाद तनपुरेंनी साहेबांच्या तब्येची विचारपूस अजितदादांकडे केली. याशिवाय दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देखील दिला. यानंतर अजितदादांनी तनपुरे कुटुंबासमवेत स्नेहभोजन घेतले. याच वेळी तनपुरे कुटुंबियांना राष्ट्रवादीत मोठी संधी असल्याचे सूचक संकेत दिले. अजितदादांची ही थेट पक्षात येण्याची ऑफर असल्याचे सांगितले जात आहे.
जयंतमामा कोणता निर्णय घेतात, यावर तनपुरेंचा निर्णय अवलंबून असेल, असे दिसते. परंतु अजितदादांनी तनपुरे पिता-पुत्रांची अरुण तनपुरे यांच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्ताने भेटीचं टायमिंग साधलं. तनपुरेंना गोड बातमी देण्यासाठी अजितदादांना आणखी दाराजवळ आणलं, अशी स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.